Shivar Pheri : शिवारफेरीच्या माध्यमातून संशोधन शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न : कुलगुरू डॉ. गडाख

Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth : अकोला कृषी विद्यापीठात आयोजित शिवारफेरीची तयारी जोरात सुरू आहे. मंगळवारी (ता. २६) कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी प्रक्षेत्रावर जात पाहणी करीत शास्त्रज्ञांसोबत संवाद साधला.
Shivar Pheri
Shivar Pheri Agrowon
Published on
Updated on

Akola News : विद्यापीठांनी संशोधित केलेले तंत्रज्ञान, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत जावे या उद्देशाने सर्व पीकवाण, तंत्र एकाच ठिकाणी दाखविण्याचा व त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. तसेच अभिनव असलेल्या या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांना पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे, असेही ते म्हणाले.

शुक्रवार (ता. २९)पासून होत असलेल्या तीनदिवसीय शिवारफेरीच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी मंगळवारी (ता. २६) विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

शिवारफेरीदरम्यान आलेल्या शेतकऱ्यांना एकाच प्रक्षेत्रावर विविध पीक वाणांचे प्रात्यक्षिक बघता यावे यासाठी लागवड केलेली आहे. यात विद्यापीठांचे बहुतांश वाण, तंत्र आहेत. सोबतच काही खासगी कंपन्यांचेही प्रात्यक्षिक प्लॉट खासकरून ठेवण्यात आले आहेत. खरीप हंगामातील सर्व पिकांबाबत या शिवारफेरीद्वारे माहिती मिळेल. शुक्रवारी (ता. २९) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या वर्षीच्या शिवारफेरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिके प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर पाहायला मिळेल. तसेच विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाच्या ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहता येईल.

यंदा १५२९ हेक्टरवर विद्यापीठ खरीप हंगामातील विविध पिकांचे पैदासकार बियाणे बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे. यंदाच्या शिवारफेरीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार मेहनत घेत आहेत. त्यांच्यामुळे हे प्रात्यक्षिक प्लॉट उभे राहिले, असे कौतुकही कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. या शिवारफेरीचा १ ऑक्टोबरला समारोप होईल.

काय असेल प्रक्षेत्रावर?

२० एकरांत २१५ प्रगत खरीप पीक उत्पादन तंत्राचे आणि १० शिफारशी असे एकूण एकाच ठिकाणी २२५ थेट प्रात्यक्षिके पाहायला मिळणार. यात तृणधान्ये २४ वाण, कडधान्य २४, तेलबिया २६, कापूस १७, चारा पिके १४, भाजीपाला ३९, फुलपिके ७१ वाण आणि १० तंत्रज्ञान शिफारशी शेतकरी पाहू शकतील. सोबतच १६ खासगी कंपन्यांचेही पीक प्रात्यक्षिके येथे आहेत.

स्थापनादिनी वेगळे कार्यक्रम

विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी होणारी शिवारफेरी यंदा २० दिवस आधीच होत आहे. त्यामुळे स्थापनादिनी म्हणजेच २० ऑक्टोबरला वेगळे कार्यक्रम होतील. या वेळी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा सोहळा घेतला जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी संशोधकापासून तर कर्मचाऱ्यापर्यंत काहींना गौरविले जाईल. सोबतच कृषी महाविद्यालय, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र या प्रत्येक घटकामधूनही एक उत्कृष्ट म्हणून निवडले जाईल. यासाठी निवड समिती काम करीत असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com