Palm Tree: ताड वृक्ष: निसर्गाचा बहुपयोगी खजिना!

Palm Tree Types: ताड वृक्ष केवळ शोभेपुरते मर्यादित नाहीत, तर औषधी गुणधर्म, शेतीसाठी उपयोगी, तसेच पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. राजशाही ताड, चायनीज पाम, सायकस आणि खजूर हे विविध प्रकार आपल्या उपयुक्ततेमुळे विशेष महत्त्व राखतात.
Palm Tree
Palm TreeAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनुराधा वाटाणे-सावरकर, डॉ. सुधीर दलाल

Tree Conservation: संस्कृत वाङ्‌मयात ‘ताड’ ही संज्ञा ताड, माड, खजूर, पोफळी (सुपारी) या झाडांसाठी वापरली जाते. या वृक्षांचे उल्लेख, वर्णने व उपयोग विविध ग्रंथामध्ये नमूद आहेत. ताडापासून बनविलेल्या धनुष्याचा उल्लेख महाभारत आणि काशिकावृत्तीमध्ये आढळतो. चरकसंहितेत व सुश्रुतसंहितेत खजूर, नारळ, ताड व त्यांच्या विविध औषधी गुणधर्मांविषयी निर्देश केलेला दिसतो. या झाडांची पाने हाताच्या पसरलेल्या बोटांसारखी दिसत असल्यामुळे या झाडांना इंग्रजीमध्ये पाम वृक्ष म्हणतात. हा अ‍ॅरॅकेसी कुळातील एकदलीय वृक्ष असून, या झाडाची फळे, पाने व अन्य भाग उपयुक्त आहेत. कोरडवाहू शेतामध्ये वाढणारे झाड जमिनीतील पाणी टिकविण्यास आधार देते. त्यांच्या राजशाही, तळी वृक्ष, सायकस, नारळ, तेल ताड, खजूर, चायनीज ताड असे विविध प्रकार दिसतात.

राजशाही ताड

वैशिष्ट्ये : राजशाही ताड (Royal palm) हा अतिशय देखणा वृक्ष असून, त्याचे मूळ क्यूबा, वेस्ट इंडीज या परिसरातील सांगितले जाते. देखणेपणामुळे प्रसार झाल्याने संपूर्ण जगभरातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात तो आढळतो. शास्त्रीय नाव रॉयस्टोनिया रेजिआ हे प्रसिद्ध अमेरिकन सेनानी जनरल रॉयस्टोन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेले आहे.

रचना व आकार : उंची साधारण ५०-६० फूट, खोड गुळगुळीत, राखाडी रंगाचे सरळ शिस्तीत वाढलेले आणि त्यावर छत्री प्रमाणे हिरवागार पर्णसंभार. खोडमधून आणि मुळाजवळ फुगीर झालेले असल्याने वृक्षाची बाह्याकृती काहीशी बाटलीसारखी दिसते.

लागवड : बियांद्वारे.

उपयोग : जगभरातील उद्यान तज्ज्ञांचे हे लाडके झाड असून, कोणत्याही मुख्य इमारतीकडे नेणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रॉयल पाम लावल्यास शाही स्वागत झाल्याची भावना होते. मात्र एकट्या झाडापेक्षाही रांगेत असलेल्या या झाडांचा देखणेपणा अधिक उठून दिसतो.

Palm Tree
Tree Plantation: माळरानावर लावणार ३० हजार देशी वृक्ष

चायनीज पाम

वैशिष्ट्ये : उद्यानांचे व घराभोवतीच्या बागा व उद्यानांच्या सौंदर्य वाढीसाठी उपयुक्त. या वृक्षाचे इंग्रजी नाव चायनीय फॅन पाम असून,शास्त्रीय नाव लिव्हिस्टोना चिनेन्सिस हे इंग्लिश उद्यानविद्या तज्ज्ञ पेट्रिक मुरे, बैरन ऑफ लिव्हीस्टोन यांच्या सन्मानार्थ दिले आहे.

रचना व आकार : सामान्यतः या वृक्षाची उंची ३० फूट असली तरी तैवान आणि दक्षिण चीनच्या सागरी बेटांवर यांची उंची ५० फुटांपेक्षा जास्त आढळली आहे. खोड फिकट तपकिरी आहेत. पाने फिकट हिरवी, पंख्याच्या आकाराची साधारण ५ फुटांपर्यंत व्यासाची व लांब देठांची असतात. पानांच्या देठांवर करवतीसारखे काटे असतात. संपूर्ण पाने वृक्षांच्या टोकांवर आणि काहीशी खाली लोंबकळणारी असतात. या वृक्षाची वाढ अतिशय हळू होते. फुले पांढरी, अप्रिय वासाची असून, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुलतात. फळे बोराच्या आकाराची, लंबगोल सुरुवातीला हिरवी, पिकल्यावर जांभळ्या रंगाची असून भरभरून लागतात.

लागवड : बियांद्वारे.

उपयोग : पानांचे पंखे तयार केले जातात. काही पक्षी त्यात घरटी करतात. उगविण्यासाठी जागेबाबत फारसे नखरे नसलेले हे वृक्ष बहुतांश सर्व उद्यानामध्ये आढळतात.

तळी वृक्ष

वैशिष्ट्य : हा सुपारी कुळातील वृक्ष असून, घेर गोलाकार छत्रीसारखा असतो. त्याचे इंग्रजी नाव तालीपॉट पाम असून, शास्त्रीय नाव कोरिफा उंब्राकुलिफेरा आहे. ‘कोरिफा’ या प्रजातीच्या ८ जाती ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडात विशेषतः श्रीलंकेत सापडतात. त्यातील ४ जाती भारतात आढळतात. महाराष्ट्रात तळीवृक्षाच्या ‘कोरिफा गरबांग’ आणि कोरिफा ईलाटा या दोन उपजाती आढळतात. यातील कोरिफा ईलाटा ही उपजात बंगालमध्ये नैसर्गिकरीत्या सापडते. या दोन्ही जाती उद्यानातून शोभेसाठी म्हणून लावल्या जातात.

रचना व आकार : बुंध्याचा घेर तीन फुटांपर्यंत असून, खोड सरळसोट वाढते. त्यावर गढलेल्या पानांच्या वर्तुळाकार खुणा असतात. याची पाने पंख्याच्या आकाराची आणि वजनदार असतात. या प्रचंड पानांच्या आसऱ्याखाली दहा-बारा माणसे सहज बसू शकतात. वृक्षाचे आयुष्य साधारणतः आठ वर्षांचे असून, याला आयुष्यात एकदाच फुले येतात. याच्या फुलोऱ्यात हजारो फुले असून, त्यांना आंबट दह्यासारखा उग्र दर्प असतो.

लागवड : बियांपासून.

उपयोग : याच्या पानाचा उपयोग ताडाच्या इतर जातींप्रमाणेच घरे शाकारणे, चटया, पंखे, टोपल्या इ. साठी होतो. कागद बनविण्याची कला अस्तित्वात येण्यापूर्वी ताडपत्रावरच प्राचीन ग्रंथ लिहिले गेले आहेत. श्रीलंकेत अजूनही जन्मनोंदी, कुंडल्या ताडपत्रावर केल्या जातात. याच्या कोवळ्या पानाच्या चिंचोळ्या पट्ट्यांना ‘ओलास’ म्हणतात. या पट्ट्यातील मध्य शीर काढून उकळल्या पाण्यात काही वेळ ठेवून त्यांना झिलई देतात. या झिलईदार पट्ट्या कलाकुसरीच्या कामासाठी वापरतात. फळांच्या गराचा उपयोग पाण्यातील माशांना भूल देण्यासाठी करतात.

Palm Tree
Hirda Tree : हिरडा झाडांची सात-बारा उताऱ्यावर होणार नोंद

सायकस पाम (Sago palm)

वैशिष्ट्ये : सायकस हे उष्ण कटिबंधातील झाड आहे. याचे शास्त्रीय नाव सायकास रेव्होल्युटा आहे. हे अत्यंत पुरातन वनस्पतींपैकी एक असून त्याची उत्पत्तीची मुळे अपर ट्रायासिअकमध्ये व सुमारे वीस कोटी वर्षापर्यंत पोहोचतात. सायकसच्या गुणधर्माच्या जपणुकीमुळे त्यांना जिवंत जीवाश्म (लिव्हिंग फॉसिल) म्हणतात. सायकस हे ऑस्ट्रे‌लियात निर्माण झाले असले तरी त्याचा प्रसार दक्षिण जपान, चीन, मादागास्कर व भारत असा झाल्याचे मानले जाते.

रचना व आकार : या द्विलिंगी झाडांचा विस्तार कमी असतो. यांचा बुंधा अडीच ते तीन फूट व्यासाचा असतो. खालच्या फांद्या लांबीला जास्त असतात. जसेजसे वर वर जाऊ लागते तसतशी फांद्यांची लांबी कमी होत जाते.

लागवड : बियांद्वारे.

उपयोग : या वृक्षांच्या खोडात व बियांत पिठूळ पदार्थ आढळतो. त्यापासून साबुदाणा काढत असल्याने याच्या काही जातींना इंग्रजीत ‘सागो पाम’ म्हणतात. बियांत सुमारे ३१ टक्के स्टार्चशिवाय काही विषारी पदार्थही असतात. त्यामुळे त्याचे पीठ पुन्हा-पुन्हा धुऊन विषारीपणा घालवला जातो. बागेत शोभिवंत वृक्ष म्हणूनही लागवड केली जाते.

खजूर

शास्त्रीय नाव : फिनिक्स डेक्टाइलेफेरा.

वाळवंटी प्रदेशासह सर्वत्र खजूर वृक्षांची लागवड वर्षानुवर्षे केली जाते.

रचना व आकार : या मध्यम आकाराच्या वृक्षाची उंची १५ ते २५ मीटरपर्यंत असते. ज्या काही वृक्षाची मुळे एकत्रच वाढतात, त्यात खजूर एक आहे. उष्णता सहन करणारे व द्विलिंगी फळझाड आहे. म्हणजेच यात नर फुलांची व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. साधारण १०० मादी झाडांसाठी २ ते ३ नर झाडे पुरेशी ठरतात. भारतीय हवामानात एका झाडावर ८ ते १० घड असतात. एका झाडावर १३०० ते १६०० खारीक फळे नियंत्रित ठेवली जातात. वाळलेल्या खजुरास खारीक म्हणतात.

लागवड : बियांद्वारे.

उपयोग : या वृक्षाचे व त्यापासूनच्या विविध उत्पादनांचे गुणधर्म व उल्लेख आयुर्वेदासह अनेक ठिकाणी येतात. याची फळे खाण्यासाठी वापरतात. खजुराच्या झाडास चीर देऊन निघणारा चीक लोखंडी कढईत (काहिलीत) खजुराचा गूळ तयार करतात. खजुरात लोह मुबलक असल्याने रक्तवाढीस मदत होते. त्यातील खारकेमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यवर्धक असून, त्याचा सुदृढ शरीरासाठी आहार सांगितला जातो. विशेषतः हिवाळ्यात खारीकयुक्त पदार्थांचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. या झाडांची खोडांपासून फळ्या तयार करतात. पानांच्या तंतुमय पदार्थांपासून टोपल्या बनविल्या जातात. अलीकडे महाराष्ट्रातही अनेक जण खजूर लागवडीकडे वळत आहेत. लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनी फळे सुरू होत असली तरी पुढे वर्षानुवर्षे उत्पादन मिळत राहते.

डॉ. अनुराधा अरुण वाटाणे - सावरकर, ७०२०५३५२४१ (आचार्य पदवीधर , पुष्पशास्त्र आणि प्रांगणशास्त्र विभाग, उद्यानविद्या, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com