
Pune News : गेल्या हंगामातील अपुरा पाऊस व दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याचे ऊस क्षेत्र यंदा दोन लाख हेक्टरने घटू शकते, असा अंदाज ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन’ने (विस्मा) जाहीर केला आहे.
साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इस्मा’चे अध्यक्ष प्रभाकर राव व ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक गेल्या आठवड्यात पुण्यात झाली. या वेळी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले उपस्थित होते. सरत्या २०२३-२४ मधील साखर हंगामात ११० लाख टन साखर उत्पादन घेत महाराष्ट्राने देशात बाजी मारली आहे. तसेच, ३० जूनअखेर राज्याने इथेनॉल पुरवठा ५८ कोटी लिटरपर्यंत नेला आहे.
या बैठकीनंतर जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्याचे ऊस लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ लाख हेक्टरवरून यंदा १२ लाख हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ऊस क्षेत्रात २५ टक्के; तर सोलापूर जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस क्षेत्रात पाच टक्के घट गृहीत धरली जात आहे. त्यामुळेच राज्याचे यंदाचे साखर उत्पादन १०० लाख टनाच्या आसपास राहू शकते.
साखर कारखान्यांना साखर विक्रीत तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ४१.६६ रुपये करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. इथेनॉल निर्मिती थांबल्यामुळे कारखान्यांना कर्जाचे हप्ते फेडणे अवघड होत असून इथेनॉलच्या किमती वाढवाव्यात, २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी तसेच साखर कारखान्यांना विविध स्त्रोतांमार्फत मिळालेल्या सर्व प्रकारच्या कर्जांचे पुनर्गठन करावे, कर्जवसुली दोन वर्षे थांबवून कर्जफेडीची प्रक्रिया दहा वर्षांच्या हप्त्यांमध्ये राबवावी, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इथेनॉलचे पुरवठा धोरण जाहीर करा
केंद्राने गेल्या हंगामात घेतलेल्या निर्णयांमुळे इथेनॉल पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. आसवनी प्रकल्पदेखील अडचणीत आले. त्यामुळे केंद्र शासनाने यंदाचे इथेनॉल पुरवठा धोरण १५ ऑगस्टपूर्वीच जाहीर करावे, अशी आग्रही मागणी ‘विस्मा’ व ‘इस्मा’ या संघटनांनी केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे...
ऊस लागवड क्षेत्र १४ वरून यंदा १२ लाख हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता
मराठवाड्यात ऊस क्षेत्रात २५ टक्के; तर सोलापूर जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस क्षेत्रात पाच टक्के घट गृहीत
राज्याचे यंदाचे साखर उत्पादन १०० लाख टनाच्या आसपास राहण्याचा अंदाज
साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ४१.६६ रुपये करण्याची मागणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.