Indigenous Cow : स्थानिक पशुधनाचे जतन, संवर्धन करूया

Livestock Improvement : आज आपण पाहतोय जो तो गीर गीर करत सुटला आहे, जणू काय गीर हीच एकमेव देशी जात, असाच त्यांचा उत्साह असतो. परंतु त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे, की बाकी गाईंच्या जाती आणि पाळीव जनावरे हे देखील त्यांच्या मूळ स्थानी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Gir Cow
Gir CowAgrowon
Published on
Updated on

Genetic Science in Livestock : महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे, विशेषतः पाळीव जनावरांच्या जाती संबंधात तर प्रत्येक भूप्रदेशाची खासियत आपल्याला दिसेल. कोकणापासून ते पूर्व विदर्भापर्यंत अनेक पशूंच्या जाती दिसतात. नोंदणी झालेल्या जातींव्यतिरिक्त अनेक जनावरांच्या जाती त्या त्या ठिकाणी शतकानुशतके तग धरून आहेत आणि थोड्याफार प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत. सध्या देशी जनावरांबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाच्या गुणांबद्दल चर्चा तसेच जागरूकता वाढली आहे.

कारण काही का असेना, परंतु शास्त्रज्ञ, सर्वसामान्य शेतकरी आणि जनमानसात देशी आणि स्थानिक जनावरांबद्दल अप्रूप आणि उत्सुकता वाढलेली दिसून येते आहे. शासन देखील स्थानिक जनावरांच्या बाबतीत संवेदनशील आणि पूरक योजना तयार करण्यासाठी, त्या अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्थानिक जातींचा उपयोग आणि संवर्धन यासाठी या सर्व गोष्टी अनुकूल आहेत. हीच जागरूकता आणि हाच उत्साह स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचा आहे. स्थानिक जनावरांच्या संवर्धनाबाबत अनेक योजना आणि प्रयोग सध्या सुरू आहेत.

महाराष्ट्राचा विचार केल्यास गाईंच्या सात, म्हशींच्या चार, शेळ्यांच्या चार आणि मेंढी तसेच घोड्याची प्रत्येकी एक अशा जातींची नोंद झालेली आहे. त्याशिवाय राज्यातील स्थानिक वातावरणात तयार झालेल्या अनेक जाती आहेत. या जाती स्थानिक परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्यूरो यांनी २०१८ ला संपूर्ण देशात गावठी पशूंचे वर्गीकरण आणि अभ्यास करून एकंदर भारतात किती जाती आणि उपजाती आहेत यावर काम करण्याचे ठरवले आहे.

Gir Cow
Gavlau Cow : गवळाऊ गोवंशाचा इतिहास आणि अस्तित्वासाठी आव्हाने

हे काम मिशन म्हणजेच चळवळ म्हणून सर्व राज्यांनी पुढे न्यायला हवे. परंतु, महाराष्ट्राने याची हवी तशी दखल घेतलेली नाही. नवीन वर्षात नवीन सरकारकडून महाराष्ट्र गावठीमुक्त होण्याची अपेक्षा करूया. हे काम करण्यासाठी काही उद्दिष्टे ठरवून दिली आहेत, ती अशी...

- लोकसहभागातून स्थानिक पशूंच्या जातींचे वर्गीकरण आणि नोंदीसाठी अभ्यास.

- स्थानिक पशुधन जातींचे संवर्धन आणि सुधारणा करण्यासाठी अधिक विकेंद्रित आणि सर्वांगीण योजना विकसित करणे. अशा जातींशी संबंधित स्थानिक समुदायांची उपजीविका वाढवणे आणि स्थानिक समुदायांना जातींचे संवर्धन करण्यात समाविष्ट करून घेणे.

- देशी जातींच्या संवर्धनाशी संबंधित स्थानिक लोकांच्या पशुपालक संघ/सोसायट्यांचा प्रचार करणे.

हे काम राज्यपातळीवर करत असताना सूत्रबद्ध कार्यक्रम आखावा लागेल. यात अनेक भागीदार आणि अनेकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. देशभरात या वर्षी पहिल्यांदाच फिरत्या पशुपालकांच्या जनावरांची गणना होते आहे. महाराष्ट्र या बाबतीत अग्रेसर राज्य आहे आणि अनेक फिरते पशुपालक समाज राज्यात असून सगळेच स्थानिक जाती ठेवणारे आहेत. असे लक्षात येते, की एखाद्या पाळीव जनावराच्या जातीचा आणि लोकसमूहांचा परस्पर संबंध आहे,

स्थानिक परिस्थितीनुसार या जाती तयार केल्या गेल्या आणि टिकल्या. या सर्व परस्परावलंबनाची सांगड लोकांच्या उपजीविकेशी घातली गेली. त्यानुसार चालीरीती ठरल्या. माणसाने पाळीव जनावरांच्या बाबतीत असे प्रयोग अनेक वर्षांपासून केले म्हणूनच संस्कृती, शेती या सर्व गोष्टींना वाव मिळाला. असे प्रयोग करणे आणि त्यातून गरज भागवणे हेच जगणे सुसह्य करण्याचे तंत्र आहे. परंतु महत्त्वाची बाब ही लक्षात घ्यायला हवी की या सर्व प्रयोगांच्या आखणी, अंमलबजावणीत स्थानिक लोकांना वाव मिळणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Gir Cow
Indigenous Cow : देशी गोवंश संवर्धनाचा आदर्श सांगणारे माळसोन्ना

स्थानिक लोकसमूह आणि त्यांची आवड असलेली, ते ज्यावर अवलंबून आहेत त्या पशुप्रजातीला सोबत घेऊन, समविचारी लोकांचे समूह यांना सोबत घेऊन त्यांना या कार्यक्रमात सहभागी करावे लागेल. लोक कुठले गुण निवडतात, कुठल्या परिस्थितीकीय स्थितींचा विचार केला जातो, हे नोंदणीप्रक्रियेत आणणे आवश्यक आहे. मुख्यतः शारीरिक ठेवण आणि त्याचे मोजमाप याचाच विचार नोंदणीप्रक्रियेत झालेला दिसतो, त्याची व्यापकता वाढायला हवी. एक विशिष्ट कार्यक्रम आखून कमी कालावधीत राज्यपातळीवर हे काम करायला हवे. या कार्यक्रमाला आखणीबद्ध करण्यासाठी काही मुद्दे सुचवावेसे वाटतात, ते असे...

१. राज्यस्तरीय समन्वय समिती ः यात पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्यूरो येथील शास्त्रज्ञ, पशुविज्ञान विद्यापीठातील अनुवंशशास्त्रज्ञ, पशुपालक प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असावेत. यांची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक व्हावी.

२. प्रकल्प समन्वयक कक्ष : याचे पशुसंवर्धन विभागात गठन व्हावे आणि या कार्यक्रमाचा समन्वय आणि देखरेख या कक्षाद्वारे व्हावे.

३. पशुपालक संघ किंवा लोकसमूहांचा सहभाग : स्थानिक जातींचे गुणधर्म आणि उपयोग याची इथंभूत माहिती गोळा होण्यासाठी स्थानिक लोकसमूहांचा सहभाग या कार्यक्रमात व्हावा.

४. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग : लोकसमूहांची याबाबत जागरूकता आणि सबलीकरण यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तसेच लोकाभिमुख दीर्घकाळ संवर्धन कार्यक्रम तयार करण्यासाठी सहभागीही होऊ शकतील.

५ कार्यक्रमासाठी आवश्यक निधीची तरतूद पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र जैवविविधता महामंडळ आणि राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग यांनी केल्यास कमी कालावधीत हे काम पूर्ण होऊन महाराष्ट्र राज्य पशुजैवविविधतेत अग्रेसर होऊ शकेल.

लोकसमूहांच्या ज्ञानाबद्दल आणि अनुभवाबद्दल परत परत सांगणे नको. परंतु आता जनुकीयशास्त्र इतके प्रगत झाले आहे की या लोकांच्या परंपरागत ज्ञानाचे मूल्यमापन हे जनुकीय तंत्र वापरून अभ्यासणे सहज शक्य आहे. त्या त्या भागातील स्थानिक जाती त्यांचे गुणधर्म आणि पाळणाऱ्‍या लोकांची उपजीविका याची सांगड घालण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरेल. पिढीजात जनावरांच्या नोंदी ठेवण्याची पद्धत युरोपात आणि अमेरिकेत विकसित झालेली दिसून येते, हे पशुपालक गट एकत्र आलेले दिसतात.

त्यानुसार त्यांचे धोरण आणि योजना देखील ठरतात. आपल्या येथील विविध जनसमूह, भौगोलिक विविधता आणि उपयोग करण्याची विविधता यात हे शक्य होताना दिसत नाही आणि युरोप अमेरिकेतील पशुपालनातले मॉडेल इथे टिकत नाही. आमच्या येथील धनगरांना, गवळ्यांना, भरवाडांना तशा प्रकारचे पशुपालन करता येत नाही, ही देखील ओरड ऐकू येते. परंतु धोरण किंवा त्याचे आयोजन हे वरून खाली वाहू न देता खालून वर गेले तर ते जास्त शाश्वत आणि टिकाऊ असते, असा जगात अनेक ठिकाणी अनुभव आहे.

(लेखक सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह, नागपूर या संस्थेचे संचालक आहेत.)

९८८१४७९२३९

rainfedmaharashtra@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com