Amravati News : जिल्ह्यात यावर्षी काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर केली आहे.
अमरावती, तिवसा, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्यांतील ४९४ गावांमध्ये ५० पैशांच्या आत, तर उर्वरित दहा तालुक्यांत ५० पैशांच्या वर पैसेवारी दाखविण्यात आलेली आहे. यामुळे दहा तालुक्यांतील १४९६ गावांवर अन्याय झाल्याची भावना आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमध्ये खरिपातील लागवडीयोग्य १९९० गावांचा समावेश आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेने दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. सध्या सोयाबीनची कापणी सुरू आहे. सोयाबीनची उत्पादकता कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असताना दहा तालुक्यांत पैसेवारी ५० पेक्षा जास्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
दहा तालुक्यांमध्ये सुधारित नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केल्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याची मोहर पैसेवारीने लागली आहे. परंतु वास्तविकता वेगळी आहे. खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो.
या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.
तालुकानिहाय पैसेवारी
जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी ही ६०.२९ इतकी होती. त्यात घसरण झाली असली तरी भातकुली (५३ पैसे), धामणगावरेल्वे (५५ पैसे), मोर्शी (६२ पैसे), वरुड (६३ पैसे), अचलपूर (५६ पैसे), चांदूरबाजार (५५ पैसे), दर्यापूर (५८ पैसे), अंजनगावसुर्जी (५६ पैसे) आणि चिखलदरा तालुक्याची पैसेवारी ५५ पैसे इतकी दर्शविण्यात आली आहे. केवळ अमरावती (४६ पैसे), तिवसा (४८ पैसे), चांदूररेल्वे (४७ पैसे), नांदगाव खंडेश्वर (४८ पैसे), या चार तालुक्यांमध्ये पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.