
Nashik News : सटाणा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने दणका दिला. तालुक्यातील जुनी शेमळी परिसरात मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपिटीने चांगलेच झोडपले. अनेकांचे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आला. वीज कंपनीचे खांब कोसळले.
शेळ्या, गाई मृत्युमुखी पडल्या असून, शेतातील झाडे उन्मळून पडली. तसेच चाळीत कांदा भरत असताना उघड्यावर पडलेल्या कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले. तालुक्यात यासह ब्राह्मणगाव, आराई परिसर वादळी पावसाने झोडपून काढला.
जुनी शेमळी, नवी शेमळी, नागझरी, किरातवाडी, कॅनाल चौफुली आदी ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये जुनी शेमळी येथील शेतकरी राजेंद्र खैरनार यांची गाय मृत्युमुखी पडली, तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले.
वसंत खैरनार यांची पाचटाची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला. नवी शेमळी येथील बाबूलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडून जमिनीवर पडले. तर विजेचे खांब जमिनीवर कोसळले. शेळ्या-मेंढ्या, गाई मृत्युमुखी पडल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी चाळीत कांदा भरत असताना उघड्यावरील कांदा पावसात भिजल्याने व प्लॅस्टिकचे कागद उडाल्याने अतोनात नुकसान झाले. जनावरांचा चाराही भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.
आराई परिसरात प्रचंड वादळी वारे व पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली. तर, काही ठिकाणी घरांचे व जनावरांसाठी बांधलेल्या शेडवरील पत्रे उडाले.
काही ठीकाणी शेड व घरांवर झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. गावातील अनेक शेतकऱ्यांचे गुरांचे शेड, कांदाचाळी तुफानी वादळाच्या तडाख्याने नेस्तनाबूत झाल्या. त्याचबरोबर चिंचकसाड येथील दहा ते बारा घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले. विजेचे खांब, झाडे कोसळून विजतारा तुटल्या व विद्युत पुरवठा खंडित झाला.
तांदूळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी पंडितराव भामरे यांच्या पॉलिहाऊस, शेडनेट, तसेच पत्र्याच्या शेडचे अचानक आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले. पॉलिहाऊसचा प्लॅस्टिक पेपर उडून गेल्यामुळे सुमारे तीन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला.
पंचनामा करून मदत देण्याची मागणी
यंदा उन्हाळ कांद्यासह, भाजीपाला, शेतीमालाचे कमालीचे घसरलेले बाजारभाव, अस्मानी संकटांची मालिका, बाजार समित्यांमध्ये होणारी लूट, अवकाळी पाऊस, गारपीट अशा एकामागून एक येणाऱ्या संकटांच्या मालिकांमुळे शेतकरी अधिक होरपळून निघाला आहे. नुकसानीची नोंद घेऊन त्वरित पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.