Automatic Farming Machinery : स्वयंचलित यांत्रिकीकरणाची वाढवावी लागेल गती

Farming Equipment's : माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित काटेकोर यंत्रांचे संशोधन जगभरात होत आहे व त्याचा वापरही सुरू झाला आहे. भारतातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता स्वयंचलित लहान कृषियंत्रे ही काळाची गरज ठरणार आहे.
Automatic Agriculture Implement
Automatic Agriculture ImplementAgrowon

Agriculture Machinery and Technology : मागील चार-पाच वर्षांपासून केंद्र सरकारकडून किसान ड्रोनचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार केला जात आहे. जगातील उत्तम तंत्रज्ञान देशात प्रचलित केले जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे पण यावर स्थानिक संशोधन झालेले नसताना याचा प्रसार होत आहे.

कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांना हे तंत्रज्ञान परिपक्व करण्यासाठी व आर्थिक दृष्टीने परवडणारे होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. फवारणीसाठी ड्रोनचा वापर यावर संशोधन पूर्ण झाल्यास यातून काही तरी नक्कीच चांगले निघेल व पीक संरक्षण सुलभ व परवडणारे होईल, असा आशावाद आहे.

माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित स्वयंचलित काटेकोर यंत्रांचे संशोधन जगभरात होत आहे व त्याचा वापरही सुरू झाला आहे. सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा वेध घेतल्यास लक्षात येते की स्वयंचलित काटेकोर यांत्रिकीकरण याला देशात फार मोठी संधी उपलब्ध आहे. अनेक संस्था व स्टार्ट अप कंपन्या प्रयोग करत असून याला थोडासा वेळ लागू शकतो.

परंतु येत्या काळात शेतीची स्थिरता व टिकाऊपणा कायम ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची निकडीची गरज आहे. भारतातील लहान शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित लहान कृषी यंत्र ही काळाची गरज आहे. सध्या ट्रॅक्टरचलित अवजारांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात चालू असून, शेतकऱ्यांचा कल विकत घेण्या व्यतिरिक्त भाडेतत्त्वावर अवजारांचा वापर याकडेही आहे.

राज्यातील महत्त्वाची कोरडवाहू पिके जसे कापूस, सोयाबीन, तेलबिया व डाळवर्गीय पिके तसेच फळे, भाजीपाला, पशू व्यवस्थापन यांचे काटेकोर नियोजन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्राशिवाय शक्य नाही, हे लक्षात आले आहे.

त्यात खूप मोठ्या संधी दडलेल्या आहेत. देशामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे व तज्ज्ञांचाही अभाव नाही. फक्त याचा वापर कृषी क्षेत्रात झाला पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. यापुढे कृषी यांत्रिकीकरण शास्त्रज्ञ व माहिती तंत्रज्ञान शास्त्रज्ञ यांना एकत्रित काम करावे लागेल, याची सुरुवात देखील झाली आहे.

Automatic Agriculture Implement
Agriculture Technology : अचूक पेरणीसाठी काटेकोर पेरणी यंत्र

यांत्रिकीकरणांमध्ये देशाला अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कृषी यांत्रिकीकरणाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी नवीन संशोधन केंद्र निर्माण करणे, पीकनिहाय स्वयंचलित यंत्रे निर्माण करणे, यासाठी लागणारे मनुष्यबळ निर्मितीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नवीन अभ्यासक्रम तयार करणे, स्वयंचलित यंत्रासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी कौशल्यवान मनुष्यबळाचे प्रशिक्षण केंद्र याची सुरुवात करावी लागेल.

माहिती तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर कृषी यांत्रिकीकरणांसाठी अनेक देशांत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सॉर टेक्नॉलॉजीचा वापर करून कृषियंत्र मानव निर्मिती व त्याचा वापर उद्योग क्षेत्रात होत आहे, तसाच तो कृषी क्षेत्रातही वाढवला पाहिजे.

अनेक देशांमध्ये शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी यंत्र मानव तयार करण्यावर संशोधन होत असून, भारतामध्ये अशा प्रकारच्या संशोधनाची सुरुवात मागील तीन-चार वर्षांपासून झालेली आहे. याला थोडी वाट पाहावी लागेल, पण निश्‍चितपणे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यास शेती करणे खूप सुलभ होऊ शकते.

यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कृषी यंत्रमानव संशोधन केंद्र, किसान ड्रोन संशोधन केंद्र, स्वयंचलित कृषी यंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत.

काटेकोर शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, हरितगृह शेती हे संपूर्णतः स्वयंचलित यंत्रावर होणे शक्य आहे. यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागेल. कारण शेती टिकविण्यासाठी हा फार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

देशातील लहान शेतकऱ्‍यांची संख्या ८५ टक्क्यांवर असून, मनुष्यबळाच्या अभावामुळे भविष्यात शेती करणे जिकिरीचे होणार आहे. वेगवेगळ्या कामासाठी लहान लहान स्वयंचलित यंत्राची निर्मिती शक्य आहे, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, आयओटी तंत्रज्ञान, यंत्रमानव निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ भारतामध्ये उपलब्ध असून, माहिती तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी काम करण्याची गरज आहे.

Automatic Agriculture Implement
Agriculture Technology : पेरणी यंत्राचे समायोजन कसे करावे?

बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये असे प्रयोग मायक्रोसॉफ्ट या नामवंत कंपनीच्या व ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी यासारख्या संस्थांबरोबर करार करून सुरू झालेले आहेत. अशा तंत्रज्ञान युक्त स्वयंचलित शेतीचे मॉडेल येत्या काळामध्ये उभी करून लहान शेतकऱ्यांना परवडेल अशा दरामध्ये ते उपलब्ध करण्यासाठी फार मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार असून ग्रामीण युवकांना, शिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या प्रयोगाला पाठबळ देण्याची गरज आहे.

भविष्यात शेती टिकवायची असेल तर अशा प्रकारच्या माहिती तंत्रज्ञानावर आधारित यांत्रिकीकरणाचा वेग वाढवावा लागेल. नवीन कृषी क्रांतीच्या संधी स्वयंचलित यांत्रिकीकरणांमध्ये दडलेल्या आहेत. भारतामध्ये अनेक स्टार्टअप कंपन्या या विषयावर काम करीत असून, येत्या काळामध्ये त्यांचे प्रॉडक्ट बाजारात उतरतील, अशी अपेक्षा आहे.

या क्षेत्रात काम करण्यासाठी अजूनही फार मोठ्या नवनवीन कंपन्या सुरू करण्याची गरज असून, भारतात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याची गरज आहे.

सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये सुद्धा कृषी विभाग स्थापन करण्याची वेळ आली असून, यामुळे स्वयंचलित कृषी यांत्रिकीकरणास गती मिळेल. भारतीय कृषी संशोधन परिषद व कृषी विद्यापीठे यावर काही प्रमाणात संशोधन करत आहेत.

परंतु माहिती तंत्रज्ञान शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाची जोड नसल्याने हे संशोधन संथ गतीने चालत आहे. येत्या काळात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे सहकार्य घ्यावे लागेल. भारत सरकारचा कृषी विभाग व राज्य सरकारच्या कृषी विभाग यांना मोठे पाऊल उचलावे लागणार आहे.

येत्या दहा वर्षांमध्ये भारतामध्ये किसान ड्रोन, कृषी कामासाठी यंत्रमानव शेतीमध्ये दिसेल असे चिन्ह दिसत आहेत. त्या दिशेने खासगी व शासकीय माध्यमातून प्रयत्न सुरू असून, त्याचे फलित येत्या काही वर्षांत दिसून येईल. भारतासारख्या कृषिप्रधान देशांमध्ये भविष्यात शेती टिकवायची असेल, तर आपल्याला स्वयंचलित शेतीच्या दिशेने वाटचाल करावीच लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com