Parbhani News : परभणी बाजार समितीअंतर्गत कापूस हमालीदरात १२.५ टक्के व गठाण वराईच्या दरात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी (ता. २९) घेण्यात आला. हमाली दरवाढीचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्यामुळे मंगळवारपासून (ता. ३०) बाजार समितीच्या टी.एम.सी. मार्केट यार्डावरील कापूस खरेदी सुरू झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन यांच्यातील जिनिंग आवारातील हमाल दरवाढी वारंवार बैठका होऊनही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे कापूस खरेदी बंद होती. जिनिंग आवारातील प्रलंबित हमाली दरवाढप्रश्नी तोडगा काढण्यासाठी परभणी जिनिग प्रेसिंग कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व परभणी मजदूर हमाल युनियन (लाल बावटा), मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा) यांच्या प्रतिनिधींची सभापती पंढरीनाथ घुले यांच्या अध्यक्षेखाली सोमवारी (ता. २९) बाजार समिती सभागृहात बैठक आयोजित केली होती.
कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व जिनिंग मालक हरिश कत्रुवार, अजय सरिया, बाळूसेठ शर्मा, कमलनारायण मानधने, बलविंदर सिंह, मराठवाडा हमाल युनियनचे सचिव शेख अब्दुल, परभणी मजदूर युनियनचे सचिव रामराजे महाडीक, हमाल मुकादम शेख शब्बीर, गौतम कांबळे, मो. शरीफ, शिवाजी सावळे, संजय गायकवाड, लक्ष्मण कदम, शिवाजी मूंजळ, रोहिदास नेटके, इतर हमाल, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहायक सचिव भगवान सोनुले उपस्थित होते.
या बैठकीत हमाली दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली. सभापती घुले, संचालक गणेश घाटगे, विलास बाबर, सोपान मोरे, अरविंद देशमुख, फैजुल्ला खान यांच्या मध्यस्थीने हमालीचा प्रश्न निकाली काढण्यात आला. हमाली दरात १२.५ टक्के व गठाण वराईच्या दरात ६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे टीएमसी मार्केट यार्डावर मंगळवारपासून (ता. ३०) खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदी पूर्ववत सुरू झाली.
शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावावीत. जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्या बाबतची सौदापट्टी घेऊनच संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत. जिनिंग आवारात परस्पर वाहने घेऊन न जाता दुपारी १२ वाजेपर्यंत टी.एम.सी. मार्केट यार्डात आणावीत.
उशिराने येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परभणी बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी ओला न आणता स्वच्छ स्वरूपात विक्रीस आणावा.
चांगल्या प्रतीचा कापूस वेगळा व खराब प्रतीचा वेगळा करून आणल्यास बाजारभावाबाबत तक्रार उद्भवणार नाही. कापसास जास्तीत जास्त भाव मिळेल. शेतकऱ्यांनी कापूस टी.एम.सी. मार्केट यार्डात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.