Dr. M. S. Swaminathan : थोर कृषी शास्त्रज्ञाचा सर्वोच्च सन्मान

Article by Dr. Nagesh Tekale : या वर्षी पाच पैकी दोन भारतरत्न पुरस्कार (सर्वोच्च सन्मान) कृषी क्षेत्रातील दोन थोर व्यक्तींना दिले गेले. त्यातील एक माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंह, तर दुसरे हरित क्रांतीचे प्रणेत डॉ. एम. एस. स्वामिनाथन हे होत. सत्तर वर्षांपूर्वीची भारतीय कृषी पद्धती पूर्णपणे बदलण्याचे सर्व श्रेय डॉ. स्वामिनाथन यांना जाते.
Dr. M. S. Swaminathan
Dr. M. S. Swaminathan Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

Honors of Agricultural Scientist : भारत सरकारने या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्‍य साधत ‘पंचरत्न’ म्हणजे पाच भारतरत्न पुरस्कार जाहीर केले. त्यातील दोन पुरस्कार कृषी क्षेत्रामधील थोर व्यक्तींना दिले गेले. त्यातील एक म्हणजे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंह आणि दुसरे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ कृषी शास्त्रज्ञ हरित क्रांतीचे प्रणेते स्व. डॉ. एम. एस. स्वामिनाथन.

शेतकरी त्याच्या पारंपरिक पद्धतीने शेती करतो, धान्य उत्पादन घेतो आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबरच जगाचा पोशिंदा होतो. जेव्हा शेती आणि निसर्ग यांचे घनिष्ठ नाते होते तेव्हा हे शक्य होते. पुढे काळ बदलला, देशात विकास गंगा वाहू लागली यात पहिला बळी सुदृढ जंगलाचा गेला नंतर शेत जमिनीचा! अन्न कमी पडू लागले, लोकसंख्या वाढू लागली आणि येथेच हरितक्रांतीचा जन्म झाला.

गहू, तांदळाच्या हजारो मॅक्सिकन वाणांना पंजाब भूमीत आसरा मिळाला. संकरित वाणांना रासायनिक खते मिळाली आणि आपल्या मायभूमीपासून हजारो कोस दूरवरून आलेली ही बाळे जमिनीत व्यवस्थित रुजली आणि भारतात हरितक्रांतीची मुहूर्त मेढ रोवली गेली. या मेढीला ज्या शास्त्रज्ञांच्या पवित्र हातांचा स्पर्श झाला त्यामध्ये एक होते डॉ. एम. एस. स्वामिनाथन. त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर होणे हे सर्व शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

ज्याप्रमाणे चौधरी चरणसिंह यांना शेतकऱ्यांचा तारणहार म्हणतात, त्याचप्रमाणे डॉ. स्वामिनाथन यांना अन्न सुरक्षेचा प्रणेता म्हणून संबोधिले जाते. दुष्काळात अमेरिकन मिलो ज्वारीवर दिवस कंठणाऱ्‍या गरीब भारतीय लोकांना, शेतकऱ्‍यांना डॉ. स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीद्वारे खऱ्‍या अर्थाने अन्न सुरक्षा दिली.

Dr. M. S. Swaminathan
Supriya Sule : ईपीएस पेन्शन धारकांच्या कष्टाचा पैसा मिळवून देणार

त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि कृषी क्षेत्रामधील उच्च शिक्षण भारतीय शेती आणि येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी समर्पित केले. आज आपली ओळख तांदूळ, गहू यांचा अतिरिक्त साठा असलेले राष्ट्र अशी आहे; ती केवळ या दूरदर्शी ज्येष्ठ कृषी वैज्ञानिकामुळेच. सत्तर वर्षांपूर्वीची भारतीय कृषी पद्धती पूर्णपणे बदलण्याचे सर्व श्रेय या शास्त्रज्ञास जाते.

भारतीय कृषीमध्ये जनुकीय वाणांचा प्रवेश, त्यांना ताकद देण्यासाठी रासायनिक खते, कीडनाशके हे सर्व त्यांच्यामुळेच, पण विदेशी वाणांना आपल्या मातीत रुजविण्यापुरतेच त्यांचा उपयोग करा, हे त्यांचे मत त्यांनी आग्रहानेच मांडले होते. रासायनिक खते, कीडनाशके यांचा अतिरेक, संकरित वाणामध्ये शेतकऱ्‍यांची होणारी फसवणूक, यामुळे ते अनेक वेळा व्यथित होत.

रासायनिक खतांचा एवढा अतिरेक होईल, हे त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा वाटले नव्हते. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वेळा आपली ही खंत व्यक्त केली होती. मोठ्या शेतकऱ्‍यांनी मर्यादित स्वरूपात रासायनिक खते वापरावीत, पण लहान शेतकऱ्‍यांनी सेंद्रिय शेतीस प्राधान्य देऊन विविध पारंपरिक पिकांची शेती करून आपले प्राचीन कृषी वैभव टिकवून ठेवावे, यासाठी त्याची धडपड कायम होती.

भारतामधील प्राचीन कृषी वाणांचा प्रचंड मोठा संग्रह आज कोइमतूर येथील जनुकीय संस्थेत सुरक्षित आहे आणि शेतकऱ्‍यांना तो सहज उपलब्ध आहे हे फार मोठे कार्य सुद्धा डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रोत्साहनामुळेच होऊ शकले.

काही ठरावीक नगदी पिके घेऊन कर्जबाजारी होत जीवन संपवणाऱ्‍या शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात कायम करुणा दाटलेली होती. त्यांना मिळालेल्या पहिल्या जागतिक अन्न पुरस्काराच्या निधीमधून त्यांनी १९८८ मध्ये एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आणि या माध्यमातून सहा लाख शेतकऱ्‍यांना त्यांचे जीवनमान बदलण्यास मदत केली.

कुपोषण हा त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आदिवासी भागामधील बालकांचे कुपोषण दूर करण्याच्या माझ्या प्रयत्नांना त्यांची मोठी मदत झाली होती. त्यांचा एकच कानमंत्र होता ‘‘आदिवासीची देशी वृक्षांची जंगले श्रीमंत करा, त्यांच्या रानभाज्या त्यांनाच खाऊ द्या, त्यांची वरई, नाचणी, खुरासणी, तीळ, तूर, राजगिरा यांची शेती जास्त उत्पादित करा, बालकांचे कुपोषण तुम्हास तेथे औषधास सुद्धा आढळणार नाही. त्यांनी प्रत्यक्ष भेटीत मला सुचवलेले अनेक प्रयोग मी आदिवासी भागामधील शेतीमध्ये यशस्वीरीत्या केले.

Dr. M. S. Swaminathan
M. S. Swaminathan : स्वामिनाथन यांचे काम म्हणजे क्रांतिकार्यच...

कृषी संशोधन हे प्रयोग शाळेपुरतेच सीमित न राहता ते प्रत्यक्ष शेतावर येणे जास्त गरजेचे आहे, असे ते कायम म्हणत. १९४२ च्या बंगाल दुष्काळात लाखो लोक अन्न अन्न करून मरण पावले आणि या थोर शास्त्रज्ञाने वैद्यकीय शिक्षणास झिडकारून कृषी शिक्षण घेऊन प्रत्येक भारतीयाच्या मुखी अन्न देण्याचा वसा घेतला. उत्कृष्ट कृषी वाणांचा जन्म याच ध्येयामधून झाला.

डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची मुलगी आणि जागतिक आरोग्य संघटनेबरोबर जोडलेल्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणतात, ‘‘मला माझ्या बाबांना मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार पाहून मनस्वी आनंद झाला, पण बाबांनी कोट्यवधी शेतकऱ्‍यांची केलेली ही वैज्ञानिक सेवा कधीही कोणत्याही अपेक्षेपोटी केली नव्हती. ते हजारो शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या समूहात, त्यांच्या संशोधनात एवढे गुंतून जात की अनेक दिवस त्यांची माझी मुलगी असून भेट होत नसे. ते खरे कर्मयोगी होते.

त्यांची दुसरी कन्या डॉ. मधुरा ही केंद्र शासनास डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना मिळालेल्या भारतरत्न सन्मानाच्या पार्श्‍वभूमीवर म्हणते, की दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्‍यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका. देशामधील २० प्रमुख पिकांना किमान आधारभूत मूल्याची कायदेशीर खात्री देणे आवश्यक आहे.

डॉ. स्वामिनाथन यांचा कृषी अहवाल शेतकऱ्‍यांचे कृषी उत्पादन दुप्पट होण्याबद्दल बोलतो, पण आजही आम्ही या थोर शास्त्रज्ञाचे शब्द कृतीमध्ये आणू शकलो नाही. स्वामिनाथन यांच्या भारतरत्नाच्या पिंपळपानास सोनेरी किनार सजविण्यासाठी या थोर शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी जे काही केले त्यास स्वीकारणे, ही काळाची गरज आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com