Agricultural Ai: शेतीत ‘एआय’ वापराची व्यवहार्यता तपासावी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Ajit Pawar: वातावरणीय बदल, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनिवार्य ठरणार आहे.
DCM Ajit Pawar
DCM Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: वातावरणीय बदल, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनिवार्य ठरणार आहे. याबाबत सहकार विभागाबरोबर समन्वय ठेवून तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते, तर सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

DCM Ajit Pawar
Agriculture AI : भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार

बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या धर्तीवर राज्यात सरकारच्या वतीने ‘एआय’ वापरासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केले होते.

त्यानुसार या प्रकल्पाची आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही.’’

DCM Ajit Pawar
AI Technology : अचूक शेतीसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल ; परडयू विद्यापीठाचे डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांचे प्रतिपादन

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे ‘एआय’च्या वापरातून शक्य होणार आहे, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले.

‘एआय’ वापरामुळे उसाचे ३० ते ४० टक्के उत्पादन वाढते, पाण्याची ५० टक्के आणि खतांची ४० टक्के बचत होते. या प्रयोगाचे सादरीकरण या बैठकीत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. नीलेश नलावडे यांनी केले. बैठकीला कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. नीलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे हेही उपस्थित होते.

धोरणात्मक निर्णयासाठी तयारी

काही दिवसांपूर्वी बारामती येथे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनात ‘एआय’चा कृषी क्षेत्रातील वापरासंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी प्रतापराव पवार यांनी राज्यातील कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादन वाढीला चालना मिळेल, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com