Maharashtra Government : मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम

Maharashtra CM : राज्यात अपक्षांसह १३७ जागा मिळविलेल्या भाजपमध्ये दोन दिवसांनंतरही मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे.
Maharashtra government
Maharashtra government Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Devendra Fadnavis : मुंबई : राज्यात अपक्षांसह १३७ जागा मिळविलेल्या भाजपमध्ये दोन दिवसांनंतरही मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. २६ नोव्हेंबर रोजी १४ व्या विधानसभेची मुदत संपत असली तरीही भाजपने सध्या मुख्यमंत्रिपाची निवड चर्चेच्या फेरीत ठेवली आहे.

दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गटनेतेपदाची निवड केली आहे. तर भाजपने अद्याप विधीमंडळ पक्षाची बैठकच बोलविलेली नाही. गटनेता निवड ही विधीमंडळ पक्षांच्या बैठकीत नव्हे तर दिल्लीत होणार असून वरिष्ठ पातळीवरून आलेल्या नावावर बैठकीत औपचारिक शिक्कामोर्तब केले जाईल. गटनेता निवडीची प्रक्रिया लांबल्याने देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.

Maharashtra government
Maharashtra Government: महायुती सरकारवर शेतकरी खुष ?

निवडणुकांदरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर जाहीर केला जाईल. तसेच आश्चर्यकारक चेहराही समोर येऊ शकतो असे सांगितले होते. हरियाना आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर कुणाचेही नाव घोषित होऊ शकते असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठे बहुमत मिळूनही तीनही पक्षांत शांतता आहे. भाजपमधील एका गटाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर एका गटाने त्याबाबत फारशी अनुकूलता दर्शविली नाही असेही समजते. त्यामुळे या नावावर खल सुरू आहे. निकाल लागल्यानंतर राज्यातील बहुतांश आमदारांनी फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर हजेरी लावली.

विधानभवनात अधिवेशनाची तयारी
निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना रविवारी (ता. २४) राजभवनात निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत सादर केली. त्यामुळे १५ वी विधानसभा अस्तित्वात आली. विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाईल. यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड होणार आहे. वडाळा मतदार संघातून निवडून आलेले कालिदास कोळंबकर हे सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.


गटनेता निवडीची प्रतीक्षा
भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलविलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर गटनेता निवडीची औपचारिकता पूर्ण होणार आहे. ती झाल्यानंतर घटक पक्षांसह आमदारांच्या यादीबरोबर सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला जाईल. नव्या सरकारचा शपथविधी भव्यदिव्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रमुख नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, आरएसएस आणि अन्य धार्मिक संघटनांचे प्रमुख, धर्मगुरुंना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे हा शपथविधी चार ते पाच दिवसांनी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे
शिवसेनेच्या ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीत प्रचंड पिछेहाट झाली. त्यानंतर विचारमंथन करण्यासाठी आमदारांची मातोश्री निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे तर गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली. ठाकरे गटाने २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्रेही लिहून घेतली आहेत. पक्षफुटीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाने ही काळजी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com