Pune News : राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून चार टप्प्यांसाठी प्रचाराने जोर धरला आहे. राज्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेवरून निवडणूक आयोग देखील अलर्ट मोडवर आले आहे. आयोगाने थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका देताना, त्यांच्या मशाल गीतातील ‘हिंदू’ शब्दासह आणखी एक शब्द काढण्याच्या सूचना केल्या आहेत. यावरून राज्यातील राजकारण तापले असून ठाकरे यांनी थेट आयोगावरच निशाना साधला आहे. तसेच 'महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान सहन करणार नाही', असा दमच ठाकरेंनी रविवारी (ता.२१) मातोश्रीवरून दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आले आहे. यानंतर लोकसभा निवडणुकांच्या रणधूमाळीत ठाकरेंनी आपल्या पक्षाचे प्रेरणा गीत लाँच केले होते. जे निवडणूक आयोगाकडे देखील पाठवण्यात आले होते. यावरून आयोगाने ठाकरेंना पत्र पाठवत दोन शब्द काढण्याच्या सूचना केल्या होत्या. आयोगाने हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द काढा असे म्हटले होते. यावरून ठाकरे यांनी थेट आयोगावर टीका केली आहे. तसेच 'हे शब्द काढणार नाही', असा पवित्रा घेतला आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले, 'मागील १० वर्षात काय केले यावर न बोलता भाजपवाले आणि मोदी मुळ प्रश्नांना बगल देत आहेत. ते दुसऱ्याच विषयाला हात घालून लोकांना भूलवत आहेत. तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारात मंदिरचा मुद्दा घेता येणार नसताना अमित शाह प्रचार सभेत अयोध्येत राम मंदिराचं दर्शन करायचं ना असा सवाल मतदारांना करत आहेत. ते रामलल्लाच्या दर्शनाला कोणताच खर्च होणार नाही. फक्त ३ डिसेंबरला मध्यप्रदेशात भाजपचं सरकार बनवा आम्ही तुम्हाला दर्शन घडवू असे म्हणत होते. यावरून आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती'.
'याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने आयोगाने सहा वर्षांसाठी त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला होता. पण आता भाजप उघड उघड धार्मिक आधार घेत प्रचार करत आहे. यावरून आम्ही आयोगाला विचारणा केली होती. आयोगाने आपल्याच कायद्यात काही बदल केलाय का हे विचारले होते. बजरंग बली की जय बोलून मतदान करा असे मोदी म्हणत आहेत. हे चालतं का? हे आचारसंहितेत बसते का?, अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांना स्मरण पत्रे पाठवली होती. मात्र यावर उत्तर आलेलं नाही'.
'उलट आम्हाला प्रेम पत्र पाठवावे असे पत्र पाठवत आमच्या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द काढण्याच्या सूचना केल्या आहेत. हे आम्ही करणार नाही. कारण तुम्ही तुमच्या नियमांत बदल केला नसेल तर आधी मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई करा. अन्यथा तुमच्या नियमांत बदल झाला आहे असे गृहीत धरून आम्हीही तसा प्रचार करू. मग आमच्यावर कारवाई करू नये', असा इशारा आयोगाला ठाकरे यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.