Kolhapur News : ऑगस्ट पूर्वार्धापर्यंतच्या मोठ्या मागणीनंतर आता ऊस रोपांच्या मागणीत घट झाली आहे. पंधरा दिवसांतील पावसाने शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे नियोजन पुढे ढकलावे लागले. याचा परिणाम रोपांच्या मागणीवर झाला. त्यामुळे सध्या मागणी बघूनच रोपवाटिका चालकांकडून रोपे तयार करण्यात येत आहेत.
यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने मृग लावणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. पावसाअभावी मे अखेरपर्यंत मागणी नसल्याने रोपवाटिका चालकांनी अगदी माफक रोपेच तयार करून ठेवली होती. पण चांगला पाऊस झाल्याने पंधरा दिवसांतच चित्र पालटले. जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून जुलै अखेरपर्यंत मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
अनेक रोपवाटिका चालकांकडील रोपे पहिल्या पंधरवड्यातच संपून गेली. यानंतर मात्र रोपांसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. हीच स्थिती रोपवाटिका चालकांचीही बनली. मागणीनुसार रोपे तयार होत नसल्याने रोपवाटिका चालकांनी बियाण्यांसाठी उसाची खरेदी ४००० रुपये टनांपर्यंत केली. जादा मागणीमुळे रोपवाटिका चालकांनी टनाला १००० रुपये जादा देऊन बियाणे प्लॉटची खरेदी केली.
साधारणतः ऑगस्टच्या मध्यापर्यंत दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्यभरातून मागणी होती. दक्षिण महाराष्ट्रात पुराच्या शक्यतेने आडसाली लागवडी लांबणीवर टाकण्यात आल्या. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाने जोर पकडला. ऊस पट्ट्यांमध्ये दररोज एक ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतात वाफसा आलाच नाही. पाणी साचून राहिल्याने ऊसलागवड करणे अशक्य बनल्याने आता आडसाली लागवडी होणार नसल्याचे चित्र आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.