महारुद्र मंगनाळेRural Life: मातीशी नाळ जुळलेली असेल तरच आनंददायी शेतीचं मोल कळू शकतं. मी गेल्या बारा-पंधरा वर्षांपासून ही शेती करत जगतोय. खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय याची सुस्पष्ट जाणीव मला पहिल्यांदाच शेतीत राहायला आल्यावर झाली. झाडं, पाखरं, सूर्य, चंद्र, चांदण्यांच्या सोबतीनं इथं मी जगतो. माझं जगणं समृद्ध केलंय या मातीनं. माझ्या दृष्टीने माझी ही शेती भरपूर फायद्याची आहे. हे जगणं कितीही पैसे मोजले तरी अन्यत्र लाभणं शक्य नाही. कमीत कमी जोखीम, कमीत कमी नुकसान, कमीत कमी मनस्ताप आणि निसर्गासोबत आनंददायी जगणं ही माझ्या शेतीची चतुःसूत्री आहे. .म ला आठवतंय २०१८ मध्ये सिनेनट, दिग्दर्शक (स्व.) श्रीराम गोजमगुंडे व पत्रकार मित्र दीपरत्न निलंगेकर हे दोघेजण रुद्रा हटला मला मुद्दाम भेटायला आले होते. लातूरमध्ये माझी पत्रकारिता आणि प्रकाशन बहरलेले असताना मी लातूर सोडून थेट शेतात का राहतोय, ते जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना होती. शेतातील माझं जगावेगळं जगणं बघून ते खूष झाले. असं जगण्याचं माझं स्वप्न राहून गेलं, अशी खंतही गोजमगुंडे यांनी व्यक्त केली. दोघांनी माझी एक दीर्घ मुलाखत रुद्रा हटच्या बागेत चित्रित केली. त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला, तुम्ही लातूरचं वैभव सोडून इथं रानात राहायला का आलात?.Vasubaras Diwali Article : माळरानी फुलले चैतन्य....मी त्यांना सांगितलं, की दोन मातांसाठी मी इथं आलो. एक माझी जन्मदाती आई आणि दुसरी ही काळी आई. माझ्यासाठी यापेक्षा दुसरं मोठं वैभव नाही. या मुलाखतीत मी माझ्या आनंददायी शेतीतील आनंदी जगण्याची कल्पना विस्ताराने मांडली होती. ज्यांचं पोट शेतीवर अवलंबून नाही, ज्यांच्याकडं खर्चायला पैसे आहेत, त्यांच्यासाठी लाइफस्टाइल म्हणून आनंददायी शेती करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे..शेतीत आल्यामुळं आपोआप निसर्गाची सोबत लाभते. शुद्ध हवा हा मोठा फायदा आहे. प्रदूषित हवेमुळं होणाऱ्या रोगांपासून आपोआप सुटका होते. क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग अनुभवणं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. शेतीत रिकामपणाला जागा नाही. पण शेतीत आलं म्हणजे रात्रंदिवस शारीरिक कष्ट केले पाहिजेत, त्रास सहन केला पाहिजे, असं समजण्याचंही काहीच कारण नाही. पैसे मिळवणं हा हेतू नसला तर याची गरजच उरत नाही..Dhananjay Munde : ‘ॲग्रोवन’शी माझे भावनिक नाते.माझं हे काही केवळ बोलणं नाही तर ते जगणं आहे. या मातीनंच माझं मन विश्वव्यापी बनवलंय. या अवकाशात मी एक टिंब आहे, याची जाणीव झालीय. या मातीत राहायला आल्यापासून मी निसर्ग होऊन जगतोय..मी या मातीकडं का आकर्षित झालो याचा शोध घेताना मला माझं बालपण आठवतं. माझ्या खेळांमध्ये माती, चिखल आणि पाण्याचा संबंध अधिक होता. माझं हे चिखला-मातीत खेळणं मायीसाठी दररोजचं होतं. मी माती तोंडात घातल्याचं बघितलं, की, ती माझ्या पाठीत एक धपाटा देऊन.. थूक..थूक.. एवढं म्हणायची. मी थुंकून टाकायचो. पण संधी मिळालं, की पुन्हा माती खाणं सुरूच राहायचं..या बालपणीच्या आठवणी मनावर कोरल्या गेल्यात. पुढे शाळेत गेलो तरी हा चिखला-मातीचा संबंध कायम राहिला. शेतीमुळं मातीत हात घातला नाही, असा एकही दिवस गेला नसावा. हाताला माती, चिखल लागला तरी हात धुण्यासाठी फक्त पाणी पुरेसं ठरे. साबणानं हात धुतल्याचं मला आठवत नाही. शेतीतील कुठलंही काम म्हटलं, की मातीशी संपर्क आलाच. पदवीचं शिक्षण होईपर्यंत हा मातीशी थेट संबंध कायम होता. माझी प्रतिकारशक्ती प्रभावी बनायला कदाचित ही मातीची जवळीकच कारणीभूत ठरली असावी..तो काळ माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. शेतात जगतानाचा माती हा एक अविभाज्य भाग होता. मातीत बसणं, मातीवर झोपणं. मग ते रान नांगरटीचं असो, की पाळी घालून भुसभुशीत केलेलं. रानावर बसताना, झोपताना खाली काही अंथरून टाकल्याचंही फारसं आठवत नाही. याच मातीत विंचू, सापही निघायचे पण त्याचीही कधी भीती वाटली नाही. दिवसाउजेडीच नाही तर रात्रीही मातीवर वावरणं सहज होतं. पावसाळ्यात याच मातीच्या चिखलात चालावं लागायचं. रात्रीच्या अंधारातही असंच बिनधास्त फिरायचो. अंधाराला डोळे सरावले होते..तसंही मला पैसे, मालमत्ता कमावणे यात कधीच रस नव्हता. चांगलं, स्वाभिमानाने जगण्यापुरते पैसे हवेत ही भूमिका होती. शाळेपासून उमेदीपर्यंतचा सगळा काळ सतत पुस्तकांसोबत घालविण्याचाही हा परिणाम असावा. पुन्हा थेट मातीशी नातं जोडल्यानंतर तर खऱ्या अर्थाने मी निर्मोही बनलोय. मला कोणाच्याच पैशाचं, मालमत्तेचं आकर्षण राहिलेलं नाही. कोणी माझ्याकडं त्याच्या मिळकतीच्या बढाया मारू लागला, की मी त्याला विचारतो, तुझ्याकडं कोणकोणती फुलांची झाडं आहेत? तो काहीच बोलत नाही. तोंडाकडं बघत राहतो नुसता.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.