जगाच्या भविष्यकालीन शेतीबाबत परिषद घेण्यामागे काय हेतू आहे?
२०४७ मध्ये स्वातंत्र्याचा शतकपूर्ती सोहळा भारत साजरा करीत असेल. त्या वेळी देशाची लोकसंख्या साधारण १६६ कोटी, तर जगाची ९७० कोटी असेल, असा अंदाज आहे. मी हे याकरिता सांगत आहे, की त्या वेळी तयार होणाऱ्या लोकसंख्येला लागणारे पुरेसे अन्नधान्य कसे पिकवायचे हे सर्वांत मोठे आव्हान आपल्यासमोर आणि जगातील कृषी शास्त्रज्ञांसमोर देखील उभे असेल. जग त्याबाबत काय करेल हे मला माहीत नाही;
मात्र माझ्या देशातील कृषिशास्त्रज्ञ ते आव्हान पेलण्यासाठी कुठेही मागे राहू नयेत, त्यांनी भविष्यातील आव्हानांचा वेध घ्यावा, नियोजन-संशोधन-प्रयोग करावेत आणि या साऱ्या आव्हानांना झेलत जगाच्या अन्नधान्याचे कोठार म्हणून देश नावारूपाला यावा, अशी आमची धारणा आहे. त्यासाठी विचारमंथन करण्यासाठी ‘फ्यूचरिस्टिक फार्मिंग २०२३’ परिषद घेण्यात आली.
भविष्याच्या शेतीबाबत एकाचवेळी विविध विषयांवर देशविदेशातील शास्त्रज्ञांना पाचारण करीत आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचा देशातील सर्व विद्यापीठांमध्ये हा पहिलाच प्रयत्न होता. तो यशस्वी ठरला आहे. अर्थात, त्यामागे भारतीय कृषी संशोधन परिषद व तेथील राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्पाचे पदाधिकारी आणि आमच्या विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे परिश्रम कारणीभूत आहेत.
या परिषदेतून हे स्पष्ट झाले, की जगाची अन्न सुरक्षा आता पारंपरिक किंवा सध्याच्या आधुनिक साधनांच्याही हातात नसून ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स, रोबोट्स अशी अतिप्रगत शेती तंत्रव्यवस्थाच आता कळीची ठरणार आहे. या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या प्रवाहात सामील न होणारी शेती व्यवस्था कुचकामी ठरेल हेदेखील या परिषदेतून अधोरेखित झाले. अतिप्रगत शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे, त्यातील संधी, आव्हाने कोणती, नेमके काय ध्येय ठेवायला हवे हे सारे जाणून घेण्यासाठी ही परिषद घेतली गेली.
ही आव्हानं कशी पेलणार?
त्यासाठीच तर ही परिषद घेण्यात आली. आपल्याला शाश्वत कृषिव्यवस्थेकडे जावे लागेल. ही व्यवस्था नवतंत्रज्ञानावरच उभी असेल. उदाहरणार्थ ड्रोनचा वापर. सध्या केवळ युध्दांमध्ये ड्रोन्स मोठ्या प्रमाणावर आणि व्यावसायिक रितीने वापरले जात आहेत. परंतु भविष्यात शेताचे सर्वेक्षण, कीडनाशकांची फवारणी, अन्नद्रव्य फवारणी, शेतात बियाणे किंवा दाणेदार खतांची धुरळणी ही सारी कामे ड्रोनकडे जाणार आहेत.
शेतीमधील वेळ, पैसा आणि मानवी मनुष्यबळाची बचत ड्रोन्स करतील. ड्रोन्स ही कामे एकसारखी व जलद करू शकतात. फवारणीवेळी कीडनाशकांच्या संपर्कात आल्याने मानवी शरीरास इजा होण्याचे प्रकार ड्रोनच्या वापरामुळे थांबतील. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ड्रोन हवी ती कामे कार्यक्षमतेने करू शकतील. त्याशिवाय ड्रोन आता हायपर स्पेक्टरलइमेजिंग तंत्र वापरण्यात वाकबदार झालेले आहे.
राज्याच्या सोयाबीन शेतीला तर हे तंत्र वरदान ठरेल. या तंत्रात सूर्यप्रकाशाच्या तरंगांचे विश्लेषण केले जाते. कोणत्या पिकावर कीड किंवा रोग आहे हे ओळखून नेमक्या ठिकाणीच कीडनाशकांची फवारणी करणारे ड्रोन्स भविष्यात शेतशिवारात दिसू लागतील. सध्या मुजरांची टंचाई ही सर्वांत मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे.
त्याला पर्याय रोबोटिक शेतीचा आहे. ते दिवस दूर नाहीत की बहुतेक शेतांमध्ये छोटे-मोठे रोबोट शेतमजूर म्हणून काम करताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतमजुरांऐवजी भविष्यात ड्रोन पायलटला मागणी वाढणार आहे. ते विचारात घेत आम्ही विद्यापीठात आतापासूनच ड्रोन पायलट तयार करणारी शाळा सुरु केली आहे.
त्यातून आपल्या शेतकऱ्यांचीच मुले मोठ्या संख्येने ड्रोन पायलट होत आहेत. त्यामुळे आता पाठीवर पंप बांधून भर उन्हातान्हात शेतमजूर कीडनाशकाची फावरणी करतोय आणि त्याच्या अंगावर कीडनाशक उडून त्याला पुन्हा व्याधी होत आहेत, हे असे जे वर्षानुवर्षे दिसत आलेले चित्र कायमचे मिटणार आहे.
अत्याधुनिक शेतीत आता खूप सारी कामे दूरस्थ (रिमोट) प्रणालीने होतील. तुमच्या एक लक्षात आले असेल की आता वीजपंप चालू बंद करण्यासाठी अंधारात शेतशिवारात धडपडत जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आता वीजपंप घर बसल्या रिमोटने चालू बंद करण्यास शेतकरी पसंती देतात. शेतीमधील नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी यंत्रमानवाची शेती, स्वयंचलनयुक्त शेती, सेन्सर आधारित शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेची शेती आकाराला येते आहे. त्याचा वेध घेण्यात आमचे शास्त्रज्ञ गुंतले आहेत. हा सर्वंकष प्रयत्न असून त्यात आम्ही प्रयोगशील शेतकरी, माध्यमे, कृषी विज्ञान केंद्रे, चांगल्या संस्था, कृषी खाते या साऱ्यांनाच सामील करून घेत आहोत.
शेतीमधील नवतंत्रज्ञानाचे तोटे काय आहेत?
तोटे असे काही मला वाटत नाहीत. हे बघा, जे मनुष्यबळ शेतीत नाही ते याकरीता बाहेर जात आहे, की त्याला पर्याय मिळाला आहे. शेतीत येणारे प्रत्येक तंत्रज्ञान मनुष्यासाठी दुसरे काही तरी काम उपलब्ध करून देत आहे. ड्रोन पायलट भविष्यात लागतील. सेन्सर दुरुस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे अभ्यासक, रोबोटची देखभाल दुरुस्ती करणारे सेवक हे सारे मनुष्यबळ आधुनिक शेतीत नव्याने तयार होईल.
माणूस जोपर्यंत अन्नधान्यावर जगतो आहे तोपर्यंत त्याची मदत घेतल्याशिवाय शेती करता येणार नाही. कुठे तरी मनुष्यबळ कमी झाले की कुठे तरी ते वाढेल. पण तोट्यापेक्षाही फायदे भरपूर होतील. अन्नधान्याचे उत्पादन वाढेल, उत्पादकतेचा आलेख वर जाईल, कीड-रोग नियंत्रण कमी खर्चाचे व जलद होईल, पर्यावरणाची हानी टळेल, भरमसाट खते-बियाणे व कीडनाशकांचा वापर थांबेल, शेतकऱ्यांना काटेकोर शेती करणे शक्य होईल.
उच्च तंत्रज्ञानाचा वापरामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांची माहिती मिळणे, त्याचे विश्लेषण करणे व त्या आधारित निर्णय घेणे सोपे होणार आहे. प्रक्रिया क्षेत्राला नवतंत्रज्ञानामुळे गरुडझेप घेता येईल. माझ्या दृष्टीने सर्वांत आनंदाची बाब म्हणजे या देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचा शेतीतील अनावश्यक खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढविण्याची क्षमता भविष्यकालीन शेतीत आहे. त्यासाठी केंद्र शासन खूप चांगले धोरणात्मक निर्णय घेते आहे.
त्याला पोषक असे प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून अंमलात आणले जात आहेत. हरितक्रांतीनंतरची एक मोठी क्रांती आता देशाच्या कृषी व्यवस्थेत येऊ पाहत आहे. या क्रांतीचे स्वागत करण्यासाठी आमच्या विद्यापीठामधील शास्त्रज्ञ सज्ज आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना पाठिंबा-प्रोत्साहन मिळावे, आवश्यक ते निर्णय तातडीने व्हावेत यासाठी माझे प्रयत्न चालू असतात.
कृषी व्यवस्थेसमोरील नेमकी आव्हाने कोणती?
हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी नाही, जमीन नापीक बनतेय, शेतीला मजूर मिळत नाहीत आणि या साऱ्या निराशाजनक चित्रामुळे शेतीमध्ये नवी पिढी येण्यास तयार नाही. हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होत असलेले हवामान बदल इतके धोकादायक आहेत की त्याचा बारकाईने विचार करीत योग्य पावले न टाकल्यास मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल.
दुसऱ्या बाजूला मी आधी नमुद केल्याप्रमाणे लोकसंख्या झपाट्याने वाढणार असल्याने आजच्या अन्नधान्य उत्पादनात किमान ७० टक्के वाढ करण्याचे आव्हान उभे असेल. कृषिशास्त्रज्ञांचे अहोरात्र संशोधन, देशातील शेतकऱ्यांचे कष्ट, सरकारी धोरणांची जोड असे सारे जुळून आल्यामुळे सध्या भारतात ३२९ दशलक्ष टन अन्नधान्य पिकवले जाते.
परंतु आपल्याला ते साडेपाचशे दशलक्ष टनांपर्यंत न्यावे लागेल. तसेच फलोत्पादन ३२० दशलक्ष टनावरुन सव्वापाचशे दशलक्ष टनापर्यंत नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते आपण पेलणार आहोतच; आम्ही अजिबात मागे घटणार नाही. परंतु त्यासाठी नवतंत्राची कास हाती धरावी लागेल.
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,राहुरी ०२४२६ - २४३८६१)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.