
डॉ. सुरेश दोडके, डॉ. अरविंद तोत्रे आणि डॉ. अमोल लांघी
Pulses Importance : ‘कडधान्य: कृषी खाद्य प्रणाली मध्ये विविधता आणत आहे’ ही यंदाच्या वर्षीची संकल्पना अशी आहे.अन्नसुरक्षा, पोषण आणि शाश्वत शेतीसाठी असणारे कडधान्य पिके महत्त्वाची आहेत. कडधान्य पिकांची पाण्याची गरज ही इतर पिकांपेक्षा अतिशय कमी असते. कमी पाण्यात देखील ही पिके चांगले उत्पादन देतात, त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रात लागवडीसाठी ही पिके अतिशय उपयुक्त आहेत.
कडधान्य पिकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २०१९ पासून संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानुसार १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून जगभरात साजरा झाला. दर वर्षी उपासमार आणि कुपोषण या मुळे खूप सारे मृत्यू होतात. कडधान्य पिकामध्ये असलेली पोषण मूल्ये हे कमी करायला मदत करतात. त्या सोबतच दारिद्र्य कमी करणे, पर्यावरणीय स्थिरता या उदिष्टांसह विविध शाश्वत विकास उदिष्टे पूर्ण करण्यासाठी कडधान्य पिकांची मदत होते. कडधान्य पिके ही मानवी पोषण तसेच शाश्वत शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आपल्याकडे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात कडधान्य पिके घेतली जातात. खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, कुळथी, मटकी, राजमा, वाटाणा, चवळी आणि रब्बी हंगामात हरभरा तसेच उन्हाळी हंगामात मूग ही प्रमुख कडधान्य पिके घेतली जातात.
कडधान्य पिकाचे शेतीतील महत्त्व:
१) कडधान्य त्यांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणूमार्फत हवेतील १२० ते १३० किलो नत्र / हेक्टरी शोषून त्यांच्या मुळावरील ग्रंथीमध्ये स्थिरीकरण करतात. यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. जमिनीची सुपीकता वाढते.
२) कडधान्य पिके ही पक्व होत असताना त्याचा पालापाचोळा पिकापरत्वे १.५ ते ४ टन प्रति हेक्टर एवढा शेतात गाडला जाऊन जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याचा पिकांचे उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा होतो.
३) बदलत्या हवामानामध्ये जमिनीचे शाश्वत व्यवस्थापन हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरत आहे, कडधान्य पिकांची पाण्याची गरज ही इतर पिकांपेक्षा अतिशय कमी असते. कमी पाण्यात देखील ही पिके चांगले उत्पादन देतात, त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रात लागवडीसाठी ही पिके अतिशय उपयुक्त आहेत.
४) कडधान्य पिके ही विविध प्रकारच्या हवामान परिस्थितीत तग धरण्यास सक्षम असतात इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून कडधान्य पीक घेता येते. ज्यामुळे जैवविविधता आणि मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कडधान्य उत्पादनातील अडचणी:
१) एकूण कडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २० टक्के शेतकरी आपल्या घरचे बियाणे दरवर्षी वापरतात, त्यामुळे कडधान्य सारख्या पिकांचे उत्पादन कमी मिळते.
२) कडधान्य पिके ही कोरडवाहू भागात मोठ्या प्रमाणात घेतली जातात, त्यामुळे उत्पादनात घट मिळते.
३) बदलते हवामान, अवकाळी पडणारा पाऊस, वातावरण बदल आणि कमी हमी भाव हे सुद्धा कडधान्य उत्पादनातील अडसर आहेत.
कडधान्यांची स्थिती ः
१) देशात २०२३-२४ मध्ये कडधान्य पिकाखालील क्षेत्र २७० लाख हेक्टर. त्यापासून २४५ लाख टन उत्पादन झाले.
२) महाराष्ट्र हे महत्त्वाचे कडधान्य पिकवणारे देशातील अग्रगण्य राज्य. २०२३-२४ मध्ये एकूण कडधान्य पिकांखाली ५२ लाख हेक्टर क्षेत्र, त्यापासून ४६ लाख टन उत्पादन.
३) हरभरा, तूर, मूग आणि उडीद हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिके. राज्याच्या कडधान्य उत्पन्नात हरभरा व तूर पिकांचा मोठा वाटा.
४) देशाची कडधान्य आयात २०१९ पासून वाढत आहे.२०२३-२४ मध्ये ४७.३ लाख टन कडधान्य आयात झाली. ५.९४ लाख मेट्रिक टन एवढी आपली निर्यात झाली. आपल्याकडे मुगाची आयात म्यानमार, चीन, ऑस्ट्रोलियातून होते. उडिदाची आयात ब्राझिलमधून होते. तुरीची आयात टांझानिया, म्यानमार, मोझांबिकमधून होते. कॅनडामधून वाटाणा आणि ऑस्ट्रेलिया, इथिओपियामधून काबुली हरभरा आयात करतो. राजमाची आयात चीन आणि चवळीची आयात अमेरिकेतून होते. मसुराची आयात कॅनडा, ऑस्ट्रेलियातून होते.
५) कडधान्य पिकाच्या संभाव्य मागणीचा विचार केला तर २०२५ मध्ये २७५ लाख टन एवढी मागणी आहे, भविष्याचा विचार करताना २०३० मध्ये हीच मागणी ३२५ लाख टन आणि २०५० विचार करता ही मागणी ३९० लाख टन एवढी होईल.
कडधान्य डाळीचे आहारातील महत्त्व:
१) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार प्रति वर्षी प्रती माणसी कमीत कमी १७ ते २५ किलो कडधान्य आहारात वापरणे आवश्यक आहे. म्हणजे ७० ते ८० ग्रॅम कडधान्य प्रती दिन प्रति माणसी वापरणे आवश्यक आहे.
२) मानवी आहारामध्ये कडधान्य हे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. विशेषत: ज्या प्रदेशात मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत किंवा लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशा ठिकाणी कडधान्य हे प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून कार्य करतात.
३) कडधान्यामध्ये प्रामुख्याने २१ ते २५ टक्के प्रथिनांचे प्रमाण असून डाळीमध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण जास्त असते, जे पचनास व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
४) कडधान्य पिके ही जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. लोह, जस्त, फोलेट आणि मॅग्नेशिअम मिळते. मोड आलेली कडधान्य पचायला सोपी आहेत. यात जीवनसत्त्वांचे प्रमाण देखील वाढते. ‘क’ जीवनसत्त्व मोड आल्यावरच तयार होते. लोह व कॅल्शिअमचे शोषण चांगले होते.
५) प्रथिने आणि इतर अन्नघटकांचा सर्व आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारा व सहज उपलब्ध होणारा घटक असल्यामुळे अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी कडधान्ये महत्त्वाची आहेत.
कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना:
१) कृषी विद्यापीठ आणि देशातील विविध इतर संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या विविध कडधान्य पिकांच्या सुधारित जातींच्या लागवडीतून उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचा पुरवठा कसा करता येईल या बद्दल धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ज्या कडधान्य पिकांची कमी प्रमाणात लागवड केली जाते त्यासाठी विशेष धोरण राबवून त्या पिकाचे क्षेत्र वाढवावे लागेल.
२) २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात कडधान्य उत्पादन वाढीसाठी १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढील सहा वर्ष यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. तसेच बदलत्या हवामान परिस्थिती तग धरणाऱ्या जाती विकसित होत आहेत. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ, राष्ट्रीय ग्राहक सहकारी संस्थांमार्फत पुढील चार वर्ष तूर, उडीद आणि मसूर पिकाची खरेदी केली जाणार आहे.
३) कडधान्य पिकामध्ये एवढी विविधता आहे की, शेतकरी वर्षभर विविध कडधान्य पिकांची लागवड करू शकतात. कडधान्य पिकात एकल पीक पद्धती न राबवता पीक विविधता आणली पाहिजे. खरीप हंगामात पीक विविधता असावी. कडधान्य पिकानंतर तृणधान्य पिकांची लागवड करावी जेणेकरून पिकाची फेरपालट होईल, कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. जमिनीची सुपीकता टिकून राहील.
कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध जाती ः
महात्मा फुले कृषी विद्यापीठ ः
हरभरा ः विजय,दिग्विजय,विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत, फुले विश्वराज, विराट, कृपा
तूर ः फुले राजेश्वरी, विपुला, फुले दमयंती, फुले तृप्ती, फुले कावेरी, फुले पल्लवी
मूग ः वैभव, फुले चेतक, फुले सुवर्ण
उडीद ः फुले वसू, फुले राजन
राजमा ः वरूण, फुले राजमा, फुले विराज
चवळी ः फुले विठाई, फुले रुक्मिणी, फुले सोनाली
कुळीथ ः सीना, माण, फुले सकस
मटकी ः एम.बी.एस. २७, फुले सरिता
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ः
हरभरा ः पी.डी.के.व्ही. कांचन, पी.डी.के.व्ही. कनक, जाकी-९२१८, पी.के.व्ही.-२, पी.के.व्ही.-४
तूर ः एकेटी-८८११, पी.के.व्ही. तारा, पी.डी. के. व्ही. आश्लेषा
मूग ः पी.के.व्ही. ए.के. म.४, पी.के.व्ही. ग्रीन गोल्ड
उडीद ः पी.डी. के. व्ही. ब्लॅक गोल्ड, टी.अे.यु-१
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ः
हरभरा ः बी.डी.एन.जी.-७९७, परभणी चना १६, बी.डी.एन.जी.-७९८
तूर ः बी.एस.एम.आर. ७३६, बी.डी.एन. ७११, बी.डी.एन. ७१६, बी.डी.एन. २०१३-४१ (गोदावरी), बी.डी.एन. २०१३-२ (रेणुका)
मूग ः बी.एम. २००३-२, बी. पी. एम. आर-१४५
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ः
चवळी ः कोकण सदाबहार (व्ही. सी.एम.-८), कोकण सफेद
संपर्क: डॉ. सुरेश दोडके, ८३२९९८४५८०
(प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.