Water Shortage
Water ShortageAgrowon

Water Shortage : पाणीटंचाईचे संकट मराठवाड्यात गहिरे

Marathwada Water Shortage : ११२ लघु मध्यम प्रकल्प आटले; घागरभर पाण्यासाठी हाल

ॲग्रोवन वृत्तसेवा
Marathwada News : छत्रपती संभाजीनगर : जसजशी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, तसतसे मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे. त्यामुळे कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. तब्बल ११२ लघु, मध्यम प्रकल्प पूर्णपणे आटले आहेत. ३०८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे तर दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. या शिवाय आणखी तीन प्रकल्प जवळपास मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहेत.

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. या चार प्रकल्पांत बीडमधील दोन तसेच जालना व धाराशिवमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११ प्रकल्प धाराशिवमधील असून त्या पाठोपाठ बीडमधील ६, लातूर व जालन्यातील प्रत्येकी ३ तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे.

७५० लघु प्रकल्पांपैकी तब्बल १०८ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५० प्रकल्प धाराशिवमधील असून त्या पाठोपाठ बीडमधील ३६, छत्रपती संभाजीनगरमधील १२ व लातूरमधील १० प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी धाराशिवमधील सीना कोळेगाव व बीड मधील माजलगाव आधीच मृतसाठ्यात गेले आहेत. दुसरीकडे धाराशिवमधीलच निम्न तेरणा, परभणीतील निम्न दुधना, बीड मधील मांजरा प्रकल्प मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहे.

Water Shortage
Water Shortage : वसईत पाणीटंचाईचे संकट गंभीर

जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांत तर उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. म्हणजे ही सर्व प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. शिवाय परभणी, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांतील लघु प्रकल्प झपाट्याने मृत साठ्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात मराठवाड्यावर मोठे पाणीसंकट येईल, अशी स्थिती आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
- ३०८ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली
- दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात
- आणखी तीन मोठे प्रकल्प मृतसाठाच्या उंबरठ्यावर
- धाराशिवमधील सर्वाधिक ५० लघू प्रकल्प कोरडे, ११ मध्यम प्रकल्प उंबरठ्यावर

जिल्हानिहाय मध्यम प्रकल्प व उपयुक्त पाणीसाठाचा टक्का
जिल्हा...प्रकल्प संख्या...टक्केवारी

छ. संभाजीनगर...१६...८
जालना...७...६
बीड...१६...१९
लातूर...८...९
धाराशिव...१७...४
नांदेड...९...२१
परभणी...२...२

लघु प्रकल्प संख्या व उपयुक्त पाण्याची टक्केवारी
जिल्हा...प्रकल्प संख्या...टक्केवारी

छ. संभाजीनगर...९८...१३
जालना...५७...०
बीड...१२६...९
लातूर...१३४...११
धाराशिव...२०६...९
नांदेड...८०...३४
परभणी...२२...६
हिंगोली...२७...१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com