लोकवर्गणीतून साकारला शेत ते गाव जोडणारा सेतू

पांगरी येथील शेतकऱ्यांच्या एकीचे बळ, श्रमदानातून खर्चात झाली बचत
iron pool
iron pool Agrowon

माणिक रासवे

परभणी जिल्ह्यातील पांगरी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी सन २०२२ मधील मे महिन्यात शेतात ये-जा करण्याच्या पाऊल वाटेवरील ओढ्यावर लोकवर्गणी आणि श्रमदानातून लोखंडी पूल (Iron Bridge) उभारला. त्यामुळे पावसाळ्यातील पूर परिस्थितीत ओढा ओलांडणे, डोक्यावरून, दुचाकीवरून शेतीमाल वाहतूक करणे सोपे झाले आहे. माफक खर्चात गाव आणि शेत यांना जोडणारा सेतू साकारल्याचे हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

iron pool
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘वेसाटोगो’ कंपनी

परभणी जिल्ह्यातील पांगरी (ता. जिंतूर) गावापासून पाच किलोमीटवरील जिंतूर जवळील मैनापुरीच्या माळापासून उगम पावणारा ओढा गावाच्या उत्तरेकडून पूर्वेकडे वाहत जातो. त्याच्या पात्राची रुंदी ४० ते ४५ फूट आणि खोली २० ते २२ फूट आहे. ओढ्याच्या गावाकडील बाजूने काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. पलीकडील बाजूने ६० ते ७० शेतकऱ्यांची एकूण ७०० एकरांपर्यंत जमीन आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत.

त्यामुळे बैलजोडी सांभाळणे परवडत नाही. शेतामध्ये जाणारा गाडी रस्ता दूर अंतरावरून जातो. शेतात ये- जा करण्यासाठी पाऊल वाटेने अंतर कमी येते. फळे-भाजीपाला व अन्य शेतीमाल दररोज डोक्यावरून वाहून गावात आणावा लागतो. कापूसदेखील थोडा थोडा करून शेतकरी डोक्यावरून घरी घेऊन येतात. पावसाळ्यात निसरड्या पाऊलवाटेवरून ओढ्यातून उतार-चढ करताना कसरत करावी लागे.

iron pool
जे न करी गाव, ते करी कांतराव

पाय घसरून पडल्याने महिला जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. ज्येष्ठ शेतकऱ्यांनाही अधिक त्रासदायक व्हायचे. ओढ्याला पूर आल्यास शेतकरी, महिला मजूरांना अडकून पडावे लागे. पुराच्या भीतीने शेतातील कामे अर्धवट सोडून गाव गाठावे लागे. प्रसंगी पुरात अडकून पडलेल्याला दोरखंडाच्या साह्याने ओढ्याच्या पुरातून बाहेर काढावे लागे. गेल्या काही वर्षांत पुरामुळे ओढ्याचे पात्र रुंद झाले आहे. त्यामुळे ओढा पार करण्याचे अंतर वाढल्याने अडचणीत भर पडली. या समस्येवर पाऊल वाटेच्या ठिकाणी ओढ्यावर पूल उभारणे हाच उपाय होता. अशा छोट्या कामासाठी शासकीय योजनेतून निधी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकवर्गणी हाच पर्याय होता.

iron pool
साखर उद्योग वैचारिक सेतू परिषदेचे आयोजन 

...असा निघाला समस्येतून मार्ग

आसाराम मापारी, साळोजी बुधवंत, यादवराव बुधवंत, विनायक पवार, गंगाधर बुधवंत आदी ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे ओढा ओलांडताना आलेल्या अडचणींचा अनुभव आहे. त्यांनी गजानन आंबटवार, जगन बुधवंत, युवराज क्षीरसागर, हनुमान राऊत, मेघराज क्षीरसागर आदी तरुण शेतकऱ्यांना पूल उभारणीसाठी प्रोत्साहन दिले. यंदाच्या एप्रिलमध्ये आवश्यक साहित्यासाठीच्या खर्चाचा अंदाज काढण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये वर्गणी जमा करण्याचे ठरविले. ६१ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. एकूण एक लाख २२ हजार रुपये वर्गणी जमा झाली. दरम्यान, लोखंडाचे दर वाढले.

पण शेतकऱ्यांचा उत्साह पाहून दानशूर शेतकरी मंडळींनी सढळ मदत केली. शेजारील येसेगाव येथील संदीप लकडे यांनी २१ हजार रुपये, गावातील लक्ष्मण बुधवंत यांनी ५ हजार रुपये, अशोक बुधवंत आदींनी मिळून ३० हजार रुपये, तसेच पाऊल वाटेचा वापर न करणाऱ्या काहीं शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त आर्थिक मदत केली.

श्रमदानामुळे खर्चात बचत

पुलासाठी लोखंडी खांब, पट्ट्या, सिमेंट, वाळू, गिट्टी आदी साहित्य खरेदी करण्यात आले. तरुण शेतकऱ्यांनी खड्डे खोदण्यापासून सर्व कामांसाठी यथाशक्ती श्रमदान केले. तीन मजुरांची मदत घेतली. त्यातून मजुरी खर्चात ४० ते ५० हजार रुपयांची बचत झाली. सन २०२२ च्या १५ एप्रिल ते २१ मे या कालवधीत काम पूर्ण झाले. पुलाची लांबी ५५ फूट, रुंदी ३.५ फूट तर उंची २५ फूट आहे.

शेताकडील बाजूने दगड, सिमेंटचा वापर करून पुलावर ये-जा करण्यासाठी भराव टाकला. खर्चाचा हिशेब व देणगीदार शेतकऱ्यांची यादी फलकावर सादर केली. काम पूर्ण झाल्यानंतर मेमध्ये देणगीदारांसह शेतकऱ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. मोठ्या उत्साहात पुलाचे उद्‍घाटन केले.
या उदाहरणाची अन्य गावांसाठी प्रेरणा तयार झाली आहे.
.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी गरज आणि अडचणी लक्षात घेऊन पूल उभारला. आणखी एका ओढ्यावर असाच
पूल उभारण्याचा प्रयत्न सर्व जण करीत आहोत.
गजानन आंबटवार, युवा शेतकरी, पांगरी

माझी २० गुंठे जमीन ओढ्यापलीकडे आहे. भाजीपाला उत्पादन घेतो. पूल बांधण्यासाठी दोन हजारांची वर्गणी दिली. आता पुलामुळे शेतातून शेतीमाल घेऊन येणे सोपे झाले आहे.
काशिनाथ दंडवते, ज्येष्ठ शेतकरी, पांगरी

गजानन आंबटवार, ७४९८६६४०६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com