Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते बंद आहे. यामुळे या योजनेचा निधी शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. आता बँक खाते सुरू केलेले लाभार्थी शासनाकडे परत गेलेल्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
प्राप्त माहितीनुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीककर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. या योजनेकरिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पीक कर्जाच्या ५७ हजार ३५७ खातेदारांचा समावेश करण्यात आला होता.
त्यापैकी २२ हजार ३५० खातेदार अपात्र ठरले. ३६ हजार ६०८ लाभार्थी पात्र ठरले होते. त्यातील आधार प्रमाणिकीकरण केलेल्या ३६ हजार १५२ लाभार्थ्यांकरिता १४५ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर होऊन त्याचे वितरणसुद्धा करण्यात आले. परंतु या पात्र लाभार्थ्यांपैकी २० लाभार्थ्यांचे बँक खाते काही कारणास्तव बंद पडले होते.
अशा खातेदारांच्या खात्यात हा निधी जमा करण्यास अडचण निर्माण झाली. तो निधी शासनाकडे परत गेला. जिल्हा उपनिबंधकांनी बंद पडलेल्या परंतु नव्याने सुरू केलेल्या २० खातेदारांची माहिती शासनाकडे पाठवून निधीची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, निधी न मिळाल्यामुळे या योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित आहे. शासनाकडे परत गेलेल्या निधीची त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.
सहकार मंत्र्यांना निवेदन
योजनेच्या लाभार्थ्यांचे बॅंक खाते बंद असल्याने निधी शासनाकडे परत गेल्याची बाब राजुऱ्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या लक्षात आली. त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत गेलेला निधी त्वरित मिळवून देण्याची मागणी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.