Amravati News : दर्यापूर, जि. अमरावती : आधीच संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूची पाने खाणारी अळी) या किडीने भर टाकली आहे. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यांत कपाशीचे पीक सर्वाधिक बाधित असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अंजनगाव दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड क्षेत्र आहे.
या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने आधीच शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च दुप्पट झाला. त्यामुळे खर्चसुद्धा निघेल किंवा नाही अशी चिंता शेतकऱ्यांना आता भेडसावत आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील कपाशी पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखुची पाने खाणारी अळी) या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे .
प्रकोप सुरुवातीला अकोट तालुक्यातील शेतशिवारात दिसून आल्याने कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या चमूने प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर दर्यापूर तालुक्यात सुद्धा या अळीने प्रवेश केल्याचे निदर्शनात आल्याने या चमूने तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. महत्त्वाचे म्हणजे ही अळी दिवसा पिकावर दिसून येत नाही. मात्र रात्रीच्या सुमारास पिकाचे नुकसान करते.
ही अळी बहुभक्षी असल्याने तूर तसेच हरभरा पिकावरही सुद्धा येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांकडून पाहणी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ सुरेंद्र देशमुख, कीटकशास्त्रज्ञ प्रशांत पाटील, प्रकल्प सहाय्यक श्रीकांत सरप तसेच तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, मंडळ कृषी अधिकारी मनोज कुमावत, कृषी सहाय्यक अशोक मोहोरकर, इटकी येथील कृषी सहाय्यक अंकिता पखान यांनी प्रादुर्भावग्रस्त शिवाराची पाहणी केली व उपायोजनांची शिफारस करण्यात आली.
या किडीचे सामूहिक रितीने नियंत्रण करणे व कीटकनाशक फवारणी करीत असताना वेगवेगळ्या रसायनांचे मिश्रण करणे टाळणे गरजेचे आहे. कोषावस्था नियंत्रित करण्यासाठी पीक निघाल्यावर शेताची खोल नांगरणी करणे देखील गरजेचे आहे.
- विश्वास तराळे, शेतकरी, इटकी
माझ्या शेतात स्पोडोप्टेरा अळीने सर्व पाने खाल्ली आहेत. तीनदा फवारणी केली आहे. हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. शासनाने ताबडतोब याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- वसंत कडू, शेतकरी, इटकी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.