Vermicompost : गांडूळ खत निर्मितीचे तंत्र

Vermicompost production : जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. गांडूळ खत उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे.
Vermycompost Production
Vermycompost ProductionAgrowon

डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, व्ही.आर.पवार

Vermicompost production Update : जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. गांडूळ खत उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. गांडूळ सेंद्रिय पदार्थांचे तुकडे गिळून, चर्वण व पचन करून कणीदार कणीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. या खतामध्ये गांडुळांची लहान पिल्ले व अंडकोष असतात.

गांडूळ खतासाठी घटक

१. पिकांचे अवशेष: धस्कटे, पेंढा, तूस, कोंडा, झाडांचा पालापाचोळा, गवत इ.

२. जनावरांपासून मिळणारे शेण व मूत्र इ.

३. हिरवळीची पिके: ताग, धैंचा, गिरिपुष्प व तण इ.

४. घरातील केरकचरा व भाज्यांचे अवशेष इ.

५. वन झाडांचा पालापाचोळा: ऐन, किंजळ, साग इ.

Vermycompost Production
Vermicompost Production : अल्पभूधारक शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचा आधार

गांडूळ खतासाठी बेड पद्धत:

१. गांडूळ खत तयार करण्यासाठी सर्व घटक एकत्र करावेत.

२. सेंद्रिय पदार्थ आकाराने मोठे असल्यास त्यांचे लहान तुकडे करावेत.

३. गांडूळ बेड शक्यतो सपाट जागी असावा. बेडची खोली २ फूट, रुंदी ४ फूट आणि लांबी १२ फूट असावी. बेडचा तळ आणि बाजू ठोकून टणक कराव्यात.

४. खताकरिता वापरावयाच्या सेंद्रिय पदार्थात दगड, काचा, प्लॅस्टीकच्या पिशव्यांचे तुकडे नसावेत.

५. बेडच्या तळाशी नारळ काथ्या, गवत, भाताचा तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सेंमी जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या थरावर ३ ते ५ सेंमी जाडीचा शेण किंवा बागेतील कुजलेल्या मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडूळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. साधारणत: १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून खत तयार करण्यासाठी त्यावर ७००० प्रौढ गांडुळे (आयसेनिया फेटिडा किंवा युड्रीलस युजीनी) सोडावीत.

६. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, तण, गिरिपुष्प, हिरवळीच्या झाडांची पाने यांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले ठरते. कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगाऱ्यावर झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगाऱ्यातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असे पाहावे. गांडूळ खत तयार करण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करावी.

७. गांडूळ खत २.५ ते ३ महिन्यात तयार होते. तयार झालेले खत सैल, भुसभुशीत, कणीदार, चहाच्या भुकटीसारखे आणि काळसर तपकिरी रंगाचे असते. गांडूळ खत तयार झाल्यावर त्याचा शंकूसारखा ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, पिल्ले आणि अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

Vermycompost Production
Vermicompost Production : बचत गटाने उभारला गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

फायदे

१. जमिनीचा पोत सुधारतो.बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.

२. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.

३. गांडूळे खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.

४. जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.

५. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल होतो.

६. जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.जमिनीची धूप कमी होते

७. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये लगेच उपलब्ध होतात.

संपर्क - डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, ८३९०७१७३६५, (कृषी महाविद्यालय, आचळोली, ता.महाड, जि.रायगड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com