Jowar Production : सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात ज्वारी हुरडा उत्पादन व विक्रीचे ‘क्लस्टर’ विकसित झाले आहे. शहरे, पर्यटन केंद्रे, हुरडा पार्टी व थेट ग्राहक असा स्वरूपात बाजारपेठा तयार झाल्या आहेत.
ही संधी ओळखून या भागातील शेतकऱ्यांनी हुरडा ज्वारी उत्पादन तंत्र आत्मसात केले आहे. त्यातून दर्जेदार उत्पादन घेत त्यांनी हुरड्यातून कमी कालावधीत चांगला नफा मिळविण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूर-बार्शी महामार्गावर वैराग हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. परिसरातील २० ते २५ खेड्यांचा या गावाशी रोजचा संपर्क आहे. सीना नदीचा काठ या भागातील काही गावांना लाभल्याने पूर्वी या भागात मोठ्या
प्रमाणात कांदा, ऊस शेती व्हायची. मात्र अलीकडील काही वर्षांत पाणीटंचाई आणि अन्य समस्यांमुळे ऊस क्षेत्र घटले. कांदा व भाजीपाला मात्र मोठ्या प्रमाणात घेतला जातो. रब्बी ज्वारीचा समावेश त्यात पूर्वीपासूनच आहे, अलीकडील काळात ग्राहकांकडून हुरड्याला मागणी वाढत आहे.
ती लक्षात घेऊन वैराग परिसरातील पिंपरी (पा), ढोराळे, काळेगाव, सासुरे, इर्ले, इर्लेवाडी, साकत, तडवळ या भागांतील शेतकरी हुरडा उत्पादक झाले आहेत. गटाने एकत्र येत उत्पादन तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले आहे. ऊस, कांद्याचा पट्टा आता ‘हुरड्याचा क्लस्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
हुरडा उत्पादनाचे गवसले तंत्र
पिंपरी (पा) येथील संतोष काटमोरे, काळेगाव येथील हनुमंत घायतिडक, ढोराळे येथील अमोल काकडे हे नावाजलेले हुरडा उत्पादक म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी हुरड्याचे स्वतःचे मार्केटही तयार केले आहे. काटमोरे यांना मागील वर्षीच्या राज्य शासनाच्या पीकस्पर्धेत ज्वारीच्या सर्वाधिक उत्पादनासाठी पुरस्कारही
मिळाला आहे. आज हे शेतकरी अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने हुरडा ज्वारी तंत्रज्ञान विकासाला चालना मिळाली आहे.
हुरडा उत्पादन तंत्रातील ठळक बाबी
बार्शी तालुक्यातील जमीन दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचा ताण सहन करू शकणारी आहे, साहजिकच ज्वारी उत्पादन व गुणवत्ताही चांगली मिळते. अन्य पिकांच्या तुलनेत एक-दोन पाणी मिळाले तरी ज्वारी चांगली येते. दुष्काळ असो वा चांगला पाऊस होवो बार्शी भागात ज्वारीचे क्षेत्र टिकून आहे, ज्वारीचे कोठार असणाऱ्या जिल्ह्यातील मंगळवेढ्यानंतर बार्शीचीच ज्वारी उत्पादनात आघाडीवर आहे.
हुरडा ज्वारीची संपूर्ण पेरणी शेतकरी एकाचवेळी करीत नाहीत. तर प्रत्येक दहा दिवसांच्या अंतराने प्रत्येकी दहा गुंठ्यांचे ‘प्लॅाट’ तयार करून लागवड होते. त्यामुळे संपूर्ण हंगामभर हुरडा नियमित उपलब्ध होत राहून बाजार व दर चांगले मिळत राहतात.
उसातून सहज काढता येणारे दाणे, खायला खुसखुशीत, चविष्ट अशा फुले मधुरा, सुरती आणि परभणी वसंत या वाणांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे. या वाणांची टिकवण क्षमताही उत्तम आहे.
वाणाची निवड, लागवड पद्धती आणि व्यवस्थापन हे प्रत्येकाचे थोड्याफार फरकाने वेगवेगळे राहते. परंतु एकरी सरासरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतो. शिवाय कडबा शिल्लक राहतो. त्याचीही चाऱ्यासाठी विक्री होते. काही जण बियाण्याची विक्री करतात.
प्रातिनिधिक पीक व्यवस्थापन तंत्र
प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर ढोराळे (ता. बार्शी) येथील अमोल काकडे पाच-सहा वर्षांपासून हुरडा ज्वारी घेतात. दरवर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र असते. ते सांगतात की पेरणीसाठी अधिक म्हणजे एकरी दोन ते अडीच किलोपर्यंत, तर टोकणीसाठी दीड ते दोन किलोच्या दरम्यान बियाणे लागते.
१८ इंची बैलचलित तिफणीच्या साह्याने पेरणी करतो. पेरणीनंतर दीड महिन्यांनी व कणीस तयार होताना फुलोरा अवस्था अशा संवेदनशील अवस्थांमध्ये दोन पाण्यात पीक येते. दोन वर्षांतून एकदा दोन ट्रॉली शेणखत देतो. फुले मधुरा हे वाण निवडतो. याचा हुरडा हिरवा, प्रथिनयुक्त, खुसखुशीत असतो. वयस्कर माणसांनाही तो चावून खाता येतो.
उत्पादन, उत्पन्न
अमोल सांगतात, की लागवडीनंतर सुमारे तीन महिन्यांत पीक हुरड्यात येते. एकरी सुमारे १० ते १२ क्विंटलपर्यंत उतारा मिळतो, हुरडा व्यावसायिक, हुरडा पार्टी व्यावसायिक, मॉल यांना पुरवठा करतो. कणसांना किलोला १२० रुपये, तर तयार हुरड्याला २०० रुपये दर मिळतो. गरजेनुसार बियाण्याची किलोला १०० रुपये दराने विक्री होते. त्यातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. कृषी विज्ञान केंद्रातून पहिल्या वर्षी एक किलो बियाणे मिळाले होते. त्यातून पीक घेत पुढील बियाणे तयार करीत गेलो. यंत्राद्वारे मळणी करतो. त्यामुळे बियाण्याची प्रत चांगली मिळते.
हॅाटेल्ससह कृषी पर्यटन केंद्रांकडून मागणी
सोलापूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, हैदराबाद, विजापूर, छत्रपती संभाजीनगर असे महत्त्वाच्या शहरांचे महामार्ग जातात. त्या मार्गावर हॅाटेल्स आणि कृषी पर्यटन केंद्रे आहेत. तेथून नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत हुरड्याला मोठी मागणी असते. या सर्व ठिकाणी दररोज किमान १०० ते २०० ग्राहक हुरड्याचा आस्वाद घेतात. त्यामुळे या काळात मोठी उलाढाल हुरड्यातून होते.
काही शेतकरी कणसाचे दाणे सोलून किंवा थेट कणसांचाही विक्री करतात. कणसांना प्रति किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकरी उत्पादन खर्च सुमारे ८ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत येतो. एकूण खर्चाच्या तुलनेत अवघ्या ३ ते ४ महिन्यांत नफा चांगला मिळतो हे या पिकातील महत्त्वाचे आर्थिक गणित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.