Water Conservation : जलसंधारणाच्या उपायांद्वारे झाले तासमवाडा जलयुक्‍त

Jalyukt Shivar : कधीकाळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दुर्गम आणि आदिवासीबहूल तामसवाडा (ता. सेलू, जि. वर्धा) गावाने जलसंधारणाच्या कामांच्या बळावर पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल केली आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

विनोद इंगोले

Conservation Measures : कधीकाळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दुर्गम आणि आदिवासीबहूल तामसवाडा (ता. सेलू, जि. वर्धा) गावाने जलसंधारणाच्या कामांच्या बळावर पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल केली आहे. शास्त्रीय व अभियांत्रिकी पध्दतीने विविध कामांची पूर्तता झाली. पाणी उपलब्ध झाल्याने शेती, पीकबदल व पूरक व्यवसयांना मोठी चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे.
.
वर्धा जिल्ह्यात (ता. सेलू) तामसवाडा हे दुर्गम आणि डोंगरदऱ्यात वसलेले गाव. गवळी समाज व आदिवासीबहूल असलेल्या या गावची लोकसंख्या अवघी ३५० च्या घरात आहे. तामसवाडा, रिधोरा, रायपूर (जंगली), आमगाव अशा चार गावांचा समावेश रिधोरा गटग्रामपंचायत अंतर्गत आहे. त्यानुसार एकूण लोकसंख्या १४४५ आहे. शेती हाच तामसवाडा ग्रामस्थांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. पशुपालनही आहे. पूर्वी रब्बी व उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासायची. मग पशुपालकांना स्थलांतर करावे लागे. गावाला पाण्याची शाश्‍वत सोय करण्यासाठी तसेच शेती व एकूण ग्रामविकास साधण्यासाठी गाव व स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला.

नाल्याचे खोली-रुंदीकरण

गावापासून उगम पावलेला नाला तब्बल १२ किलोमीटर वाहायचा. पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. परिसरात झाडेझुडपे वाढली होती. वर्धा येथील पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने नाल्याचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले. जलसिंचनाची कार्ये करून त्या माध्यमातून गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावीत या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपाध्यक्ष भय्यासाहेब मुंडले, तर संस्थापक सचिव माधव कोटस्थाने आहेत. संस्थेने चार एप्रिल, २०११ मध्ये कामांना सुरुवात केली. तामसवाडा ते बाभूळगाव, बाबापूरपर्यंत अशा उगम ते संगम नाल्यावर पावसाच्या पाण्याचे संधारण, संवर्धन, भूजल पुनर्भरण अशा उद्देशाने कामे झाली.

विविध कंपन्यांचे सामाजिक दायित्व, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य लोकप्रतिनिधी आदींच्या निधींची मदत झाली. मृत नाल्यावर गाळ मुक्‍तीकरण, रुंदी- खोलीकरण झाले. नऊ मातीबांध, एक दगडीबांध व अस्तित्वातील सहा जुन्या सहा बांधांचे मजबुतीकरण, सात सिमेंट साठवण बांध अशी कामे पार पडली. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नवी वृक्ष लागवड नाल्याच्या दुतर्फा करण्यात आली. यातील साहित्याचा वापर पांदण रस्त्यांच्या कामातही झाला. परिणामी, आठ किलोमीटर लांबीचे रस्ते शेतीमाल वाहतुकीसाठी वापरण्यायोग्य झाले.

Water Conservation
Water Conservation Planning : मृद्‍, जलसंधारणाच्या कामांचे कसे करावे नियोजन?

विज्ञान, अभियांत्रिकीची फलश्रुती

‘वॉटरशेड’, ‘टोपोग्राफी’, ‘हायड्रोजीऑलॉजी (भूजल विज्ञान), जिऑग्राफी, स्थापत्य अभियांत्रिकी
(सिव्हील इंजिनिअरिंग) आदी सर्व शास्त्रीय पद्धतीने व शासकीय विभाग यांच्या समन्वयातून कामे झाली. जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांचे मोठे सहकार्य झाले. झालेल्या कामांची फलश्रुती म्हणजे मृत नाल्याच्या जलसाठवण क्षमतेत दहापटीने वाढ झाली.

मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय जलसाठे व समृद्ध भूजलसाठे १२ किलोमीटरच्या माथा ते पायथा लांबीत प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाले. सन २०१३ मध्ये २० ते ४० फूट असलेली भूजलपातळी जलसंधारण उपचारांनंतर सहा ते १० फुटांवर आली. सुमारे १४ ते २४ फुटांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. उगम ते संगमापर्यंतच्या मार्गातील पाण्याची गती संथ करणे, त्याआधारे होणारे घर्षण थांबून माती घसरण्याची प्रक्रिया नियंत्रित करणे शक्‍य झाले.

Water Conservation
Water Conservation : चंद्रावर पाणी शोधण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे संवर्धन करा

शेती, पूरक व्यवसायांना चालना

पूर्वी गावात खरिपाखाली क्षेत्र १९५ हेक्‍टर होते. आता ते ३०५ हेक्टरपर्यंत असून, अल्पसे रब्बी क्षेत्र ४० हेक्‍टरवर पोहोचले आहे. पूरबाधित २४ हेक्‍टर क्षेत्र शून्यावर आले असून, हे क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. फळबागा क्षेत्र सहा हेक्‍टरवर आहे. काही लाभक्षेत्रात मेपर्यंत पाणी असल्याने ऊस, भुईमूग, भाजीपाला आदींची लागवड सुरू झाली. आहे. दुधाळ जनावरांची ७० वरून ४०८ वर पोहोचली आहे. चारा व पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेळीपालनाला चालना मिळाली आहे. गावात चार ट्रॅक्‍टर्स आहेत. प्रति कुटुंब प्रति महिना उत्पन्न १७,२१७ रुपयांवर पोहोचले आहे.

अर्थकारण उंचावले
सुमारे २२ एकर शेती असलेल्या गावातील मयूर अडसड बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे आता ऊस, कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, उन्हाळी हंगामात तीळ, उन्हाळी सोयाबीन, हिरवा चारा
घेतात. मयूर गीर, जर्सी, गवळाऊ गाईंचे संगोपन करतात. दररोज ५५ ते ६० लिटर दूधसंकलन होते.
गावालगतच्या म्हसाळा येथील खासगी कंपनीच्या संकलन केंद्राला दूधपुरवठा होतो. याशिवाय सुमारे २२ शेळ्या, तर ६० गावरान कोंबड्या त्यांच्याकडे आहेत. दररोज सुमारे २० अंडी मिळतात. त्यांना
प्रति नग १५ रुपये दर मिळतो. या सर्वांमधून मयूर यांचे अर्थकारण उंचावले आहे.

स्थलांतर थांबले

चंदू सुरेश काळे यांच्याकडे गायी, म्हशींसहित २० जनावरे आहेत. गवळी समाजाचे असल्याने त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. चारा व पाण्याअभावी मध्यंतरी त्यांनी जनावरांची संख्या कमी केला होती.
उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने स्थलांतरही करावे लागे. आता प्रकल्पाच्या कामांनंतर त्यांच्या या साऱ्या समस्या दूर झाल्या असून, स्थलांतर थांबले आहे.

तामसवाडा प्रकल्पाची प्रशंसा

२०२१ मध्ये केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्‍ती मंत्रालयाने तासमवाडा पॅटर्नविषयीचे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, जलशक्‍ती मंत्रालयाचे अध्यक्ष ओ. पी. सिंह यांच्या उपस्थित झाले. केंद्रीय भूजल मंडळाचे तत्कालीन संचालक डॉ. पी. के. जैन यांनी प्रकल्पाचे परीक्षण करून सविस्तर अहवाल तयार केला. निती आयोगाकडून प्रकल्पाची प्रशंसा झाली आहे. ‘पूर्ती’ संस्थेला २०२० मध्ये ‘ग्लोबल ॲवॉर्ड मिळाला. ऑस्ट्रेलियाचे जलसंपदामंत्री व भारतीय राजदूत यांची सोहळ्याला ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती होती. २०१५ मध्ये वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचा (मुंबई) पुरस्कारही संस्थेला जलसंवर्धन क्षेत्रासाठी मिळाला आहे.

तामसवाडा नावा परिसरातील जलसंधारण उपचारांमुळे गावशिवारातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्याचा फायदा शेतीला होत असून दुग्ध, शेळी व कुक्‍कुटपालनास चालना मिळाली आहे.
-साक्षी ईश्‍वर भगत
सरपंच, गटग्रामपंचायत रिधोरा
७६२००४९८६१
-
माधव कोटस्थाने, ९४२२१४२७८१
(सचिव, पूर्ती सिंचन संस्था, वर्धा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com