Groundnut Disease : भुईमूग पिकावरील ‘तांबेरा रोग’

Groundnut Tambera Disease : भुईमूग लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकामध्ये टिक्का रोग, तांबेरा, अँथ्रॅकनोज, मर रोग, जिवाणूजन्य मर रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
Groundnut Disease
Groundnut DiseaseAgrowon
Published on
Updated on

राहुल वडघुले

Groundnut Disease Management : भुईमूग लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकामध्ये टिक्का रोग, तांबेरा, अँथ्रॅकनोज, मर रोग, जिवाणूजन्य मर रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रोगाला पानावरील तांबेरा असेही म्हणतात. आजच्या लेखात या रोगाविषयी माहिती घेऊ.

लक्षणे

या रोगाची लक्षणे पाने, देठ आणि खोडावर देखील दिसून येतात.

पानाच्या खालच्या बाजूने सुरुवातीला पिवळ्या रंगाचे गोल किंवा अंडाकार पुळी आकारासारखे ठिपके दिसू लागतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन त्यात बुरशीचे बीजाणू तयार होतात. हे ठिपके, पुळी मोठी झाल्यासारखे फुगतात व नंतर फुटतात. आतील बीजाणू त्यातून बाहेर येतात.

हे ठिपके अगोदर पिवळे, भगवे व नंतर तपकिरी रंगाची पानावर गंज आल्यासारखी दिसू लागतात.

हे ठिपके पानाच्या वरील बाजूने पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. यामुळे संपूर्ण पान वरच्या बाजूने पिवळसर, तर खालच्या बाजूने तपकिरी रंगाचे दिसते.

या ठिपक्यांच्या मागील बाजूने पाहिल्यास तपकिरी रंगाचे लहान बीजाणू पुळी सारखे ठिपक्यातून बाहेर आलेली दिसते.

या रोगामुळे पाने पिवळी होतात. गोळा होतात, मात्र गळून पडत नाही.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : तांबेरा रोग

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीची डिव्हिजन : Basidiomycota

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव : पक्सिनिया ॲराचीड्स (Puccinia arachidus)

आढळ : सर्व भुईमूग उत्पादक राज्यांमध्ये प्रादुर्भाव आढळून येतो.

नुकसान : या रोगामुळे पिकाचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तसेच शेंगदाण्यामधील तेलाचे प्रमाणदेखील रोगामुळे कमी होते.

यजमान पिके : गहू, ऊस, द्राक्ष, मका इत्यादी. परंतु पक्सिनिया ॲराचीड्स या बुरशीमुळे हा रोग फक्त भुईमूग पिकावरच येतो.

Groundnut Disease
Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

रोग कसा निर्माण होतो

हा रोग अतिशय वेगाने पसरतो. टिक्का रोगापेक्षा जास्त वेगाने रोगाचा प्रसार होतो. या रोगाची बुरशी मागील वर्षीच्या जुन्या पानांवर, फांद्यांवर, बियाणांवर किंवा इतर पिकांवर सुप्त अवस्थेत असते. वातावरणात ७० टक्के आर्द्रता आणि २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात ही बुरशी युरेडोस्पोर (Urediospores) बीजाणू तयार करते. हे बीजाणू पर्णरंध्राच्या मधून जर्मटुबच्या साह्याने झाडामध्ये प्रवेश करते. या बीजाणूपासून प्राथमिक लागण होते. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी लक्षणे दिसून येण्यास सुरुवात होते. सुरुवातीला पांढऱ्या रंगाची पुळी सारखी लक्षणे पानाच्या खालून दिसतात. यामध्ये बुरशीचे बीजाणू (Urediospores) तयार होतात. हे बीजाणूपुढील रोगप्रसार करतात. याला दुय्यम लागण असे म्हणतात. हे बीजाणूंचा प्रसार वारा, पाऊस आणि किड्यांच्या मार्फत होतो.

Groundnut Disease
Groundnut Crop Disease: भुईमूग पिकातील ‘पानावरील टिक्का रोग’

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. हे बीजाणू पिवळसर भगव्या रंगाचे गोलाकार असतात.

नियंत्रणाचे उपाय

आधीचे पीक भुईमूग नसावे. पीक फेरपालट करावी.

लागवडीसाठी चांगल्या, रोगमुक्त बियाण्यांची निवड करावी.

लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणांची निवड करावी.

पिकाची पाने ओली असताना पिकामध्ये कोणतीही काम करू नयेत.

वेळीच तणनियंत्रण करावे.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके (लेबल क्लेमयुक्त)

क्लोरोथॅलोनील (७५ टक्के डब्ल्यूपी)

डायफेनोकोनॅझोल (२५ टक्के इसी)

हेक्झाकोनॅझोल (७५ टक्के डब्ल्यूजी)

प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के इसी)

टेब्यूकोनॅझोल (२५.९ टक्के इसी)

फ्ल्यूबेन्डायमाइड (३.५ टक्के) अधिक हेक्झाकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यूजी)(संयुक्त बुरशीनाशक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com