
ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नाशिक : ‘नाफेड’ने यावर्षी नाशिक जिल्ह्यातून ४.७० लाख टन उन्हाळ कांदा खरेदी केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र त्यातील ५० टक्के देखील बफर स्टॉकमध्ये उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत गेल्या ६-७ महिन्यांपासून ‘नाफेड’च्या भ्रष्टाचाराबाबत भूमिका स्पष्ट करत आहे.
याबाबतचे निवेदन ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही सादर केले होते. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे त्यामुळे ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या ४ लाख ७० हजार टन कांद्याची चौकशी करून भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघर्ष सभेने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली.
ग्राहकांसाठी कांदा स्वस्त व वाजवी किमतीत उपलब्ध होण्यासाठी नाफेडने हमी भावात खरेदी केलेला कांदा विक्रीस उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, सध्या बाजारात ५०-८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री होत आहे. हे नाफेडच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक आहे. ५ डिसेंबर रोजी लासलगाव येथून नाफेडमार्फत विक्रीसाठी पाठवण्यात येणाऱ्या कांद्याची पाहणी केली असता, उन्हाळ कांद्याऐवजी सुमार दर्जाचा नवीन खरीप लाल कांदा पाठवला जात असल्याचे आढळून आले. हे नाफेडच्या बफर स्टॉकमध्ये असलेल्या कांद्याच्या अभावाचे आणि नियमबाह्य खरेदीचे स्पष्ट उदाहरण आहे.
ही परिस्थिती नाफेडचे अधिकारी, एफपीओ कंपन्या आणि भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमतामुळे झालेल्या मोठ्या घोटाळ्याकडे निर्देश करते. यामुळे, जनतेचा पैसा लुबाडला गेला असून, यावर त्वरित कारवाई आवश्यक आहे. संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यास नकार देत आहेत आणि धमक्या देत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे जनआंदोलन
नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी व्हावी. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर शेतकरी संघर्ष सभेसह सर्व शेतकरी संघटनांना एकत्र घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला. या वेळी सुनील मालुसरे, सचिन मालेगावकर, प्रभाकर धात्रक, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, किरण सानप, विजय पाटील, नवनाथ शिंदे, धर्मराज शिंदे, अशोक गायधनी, मिलिंद वाघ, वैभव दळवी आणि अन्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
...या आहेत मागण्या
‘नाफेड’च्या बफर स्टॉकचे पुन्हा ऑडिट करावे
नाफेड, एफपीओ कंपन्या आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध करून द्यावा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.