Agriculture In Sweden : औद्योगिकीकरण, कृषी क्षेत्रामध्ये स्वीडनची आघाडी

Industrialization And Agriculture Sector : स्वीडनच्या आर्क्टिक उत्तरेला ‘मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी‘ म्हटले जाते, कारण उन्हाळ्याच्या महिन्यांत सूर्य कधीही मावळत नाही.
Agriculture In Sweden
Agriculture In SwedenAgrowon

- डॉ. राजेंद्र सरकाळे

स्वीडन देशामध्ये कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भाग आणि सांस्कृतिक परंपरा राखण्यातही कृषिक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि विकासासाठी स्वीडन देश ओळखला जातो. वनीकरण, जलविद्युत आणि लोह खनिजावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योगांनी देशाच्या समृद्धीचा पाया रचला आहे.

स्कॅन्डिनेव्हियन देशांपैकी क्षेत्रफळाने सर्वांत मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला स्वीडन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि विकासासाठी स्वीडन देश ओळखला जातो. वनीकरण, जलविद्युत आणि लोह खनिजावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योगांनी देशाच्या समृद्धीचा पाया रचला आहे. शिक्षण, आयुर्मान आणि जीवनमानाच्या दर्जाबाबत स्वीडन जगातील पहिल्या दहा देशांमध्ये आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे १६०० किलोमीटर पसरलेल्या देशाच्या पृष्ठभागाचा दोन तृतीयांश भाग जंगलांनी व्यापलेला आहे. स्वीडिश ही राष्ट्रभाषा आहे. स्वीडनच्या आर्क्टिक उत्तरेला ‘मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी‘ म्हटले जाते, कारण उन्हाळ्याच्या महिन्यांत सूर्य कधीही मावळत नाही. स्टॉकहोम या राजधानीच्या शहरात उन्हाळ्यात फक्त चार तास रात्र असते आणि आकाशात संध्याकाळपेक्षा जादा काळोख होत नाही. हिवाळा हंगाम मे महिन्यापर्यंत असतो. रात्र मोठी व दिवस लहान असतो.

ऐतिहासिकदृष्ट्या औद्योगिक क्रांतीनंतर स्वीडन प्रगत कल्याणकारी देश म्हणून उदयास आला. येथील जीवनमान आणि आयुर्मान जगात सर्वोच्च स्थानावर आहे. स्टॉकहोम हे नॉर्डिक देशांमधील सर्वांत मोठे व स्वीडनमधील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोक राजधानी स्टॉकहोममध्ये राहतात. हे शहर चौदा बेटांवर वसलेले असून, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक केंद्र आहे. युरोपमधील काही मानांकित विद्यापीठे या शहरात आहेत. स्टॉकहोम कॉन्सर्ट हॉल आणि स्टॉकहोम सिटी हॉलमध्ये वार्षिक नोबेल पारितोषिक समारंभ आयोजित केला जातो. शांततेचे नोबेल पारितोषिक नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे देण्यात येते.

Agriculture In Sweden
How India achieved USD 50 billion export in agriculture sector? भारताच्या विक्रमी AgriExport कारण?

जंगलाचे मोठे क्षेत्र :

१) हा देश भौगोलिकदृष्ट्या तीन प्रदेशांत विभागलेला आहे. उत्तरेकडील विशाल पर्वत आणि जंगल प्रदेशास नॉरलँड म्हणतात, मध्य भागातील सखल प्रदेश आणि उंच प्रदेश असलेल्या भागास स्वीलँड म्हणतात. दक्षिणेस समृद्ध मैदान असलेल्या भागास गोतालँड म्हणतात. नॉरलँड हा सर्वांत मोठा आणि विरळ लोकसंख्या असलेला प्रदेश असून, त्याने देशाचा तीन-पंचमांश भाग व्यापला आहे. या प्रदेशात गोलाकार टेकड्या आणि पर्वत, मोठे तलाव आणि विस्तीर्ण नदी खोऱ्यांचा पृष्ठभाग आहे.

२) देशातील बहुतेक भाग फिर, पाइन आणि बर्चच्या जंगलांनी व्यापलेला आहे. दक्षिण स्वीडनमध्ये अधिक मिश्र जंगली पट्टे आहेत. जंगलामध्ये लिंगोनबेरी, ब्लूबेरी आणि मशरूम मोठ्या प्रमाणात आढळतात. स्वीडनमध्ये कोणालाही जंगलात मुक्त फिरण्याचा अधिकार आहे. युरेशियन एल्क (मूस) हा स्वीडनचा राष्ट्रीय प्राणी आहे. हा येथील हरिण कुटुंबातील सर्वांत जास्त संख्येने आढळणारा प्राणी आहे.

समाज जीवन :

१) स्वीडनमध्ये सुमारे ८७ टक्के लोक शहरांमध्ये राहतात. फक्त १३ टक्के लोक ग्रामीण भागात राहून दुग्ध व्यवसाय, शेती, मासेमारी आदी व्यवसाय करतात. येथील लोकांचे राहणीमान अत्यंत प्रगत आहे. स्वीडनमध्ये काम करणाऱ्या वयोगटातील ९० टक्के महिला नोकरी करतात. हा दर जगातील सर्वाधिक आहे. स्वीडनमध्ये वेतनातील तफावत जगात सर्वांत कमी आहे. त्यांच्या मते, कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. वेतनातील फरक कमी असल्याने गरीब-श्रीमंत दरी खूप कमी आहे.

२) उदारमतवादी कर्मचारी लाभ योजनांसाठी स्वीडन प्रसिद्ध आहे. येथे आठवड्यात ३७ तास काम करण्याची प्रथा आहे. सुमारे ८० टक्के कामगार विविध संघटनांशी जोडले गेले आहेत.

३) येथील राज्यांना कराच्या माध्यमातून महसुलाचा मोठा भाग प्राप्त होतो. त्याचा वापर नागरिकांना उच्च दर्जाच्या सेवा पुरवण्यासाठी केला जातो. सार्वजनिक सेवा आणि समाजकल्याण उपक्रमांच्या विस्तृत सुविधा दिल्या जातात. सर्व रहिवाशांना काउंटीद्वारे प्रशासित राष्ट्रीय आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते.

४) स्वीडनमधील आरोग्य स्थिती जगात सर्वोत्तम आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील वयस्कर लोकांची सर्वांत जास्त संख्या येथे पाहावयास मिळते. या देशात ३०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र सर्वत्र उपलब्ध आहेत. पालकांना त्यांच्या मुलाच्या १६ व्या वाढदिवसापर्यंत प्रत्येकासाठी समान, करमुक्त चाइल्ड अलाउन्स मिळतो. जे विद्यार्थी त्यांचे शिक्षण सुरू ठेवतात त्यांना स्टडी अलाउन्स दिला जातो. विद्यापीठ स्तरावर बहुतेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. राष्ट्रीय अपघात विमा योजनेद्वारे नोकरीतील अपघातांच्या वेळी सर्व वैद्यकीय खर्च दिला जातो. वयाच्या ६५ व्या वर्षापासून प्रत्येकासाठी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन उपलब्ध आहे.

खेळांसाठी प्रसिद्ध :

१) स्वीडिश जवळपास निम्मे रहिवासी कोणत्या तरी स्पोर्ट्स क्लबचे सदस्य असल्याने नागरिक तंदुरुस्त आहेत. बाल्टिकमधील विंडसर्फिंग आणि यस्टाड रिसॉर्ट शहर येथे दर उन्हाळ्यात समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांची गर्दी असते. यस्टाड हे स्वीडनमधील सर्वांत आरामदायक किनारी शहर आहे.

२) समुद्र, निसर्ग, समुद्रकिनारे आणि रमणीय शहरांमध्ये जगभरातील पर्यटक येतात. हिवाळी खेळांमध्ये स्वीडन अग्रगण्य देश आहे. स्कीइंगसाठी सुविधा वेगाने विकसित झाल्या आहेत. स्पर्धात्मक खेळांमध्ये हिवाळी स्पर्धांच्या व्यतिरिक्त फुटबॉल (सॉकर) आणि जिम्नॅस्टिक्स हे आवडते खेळ आहेत. स्वीडनने टेनिस आणि गोल्फमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे.

Agriculture In Sweden
Dairy Sector : डेअरी क्षेत्रात ६ टक्के वाढ झाल्याचा मोदींचा दावा|कापूस-सोयाबीन दरावरून वड्डेटीवारांची जोरदार | राज्यात घडलं?

शेती, पशुपालनाला चालना :

१) स्वीडन देशातील ६८ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. देशातील ३० लाख हेक्टर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७ टक्के जमीन कृषी उत्पादनासाठी उपलब्ध आहे. देशाचे उत्तरेकडील स्थान आणि भिन्न हवामान लक्षात घेता, स्वीडनमधील शेती तुलनेने लहान पण कार्यक्षम आहे. कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देते. ग्रामीण भाग आणि सांस्कृतिक परंपरा राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.

२) स्वीडनचे हवामान उत्तरेकडून दक्षिणेकडे बदलते. उत्तरेला थंड आणि दक्षिणेला सौम्य परिस्थिती असते. थंड हवामानामुळे उत्तरेकडील प्रदेशांमध्ये पीकवाढीचा हंगाम लहान असतो. दक्षिणेस २४० दिवसांचा, तर उत्तरेकडे १२० दिवसांपर्यंतचा हंगाम असतो. दक्षिण स्वीडनमध्ये बहुतेक शेती योग्य जमीन असून येथे गहू, बार्ली, शुगर बीट, तेलबिया, बटाटे आणि विदेशी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. उत्तरेकडे गवत आणि बटाटे ही मुख्य पिके आहेत. संपूर्ण स्वीडनमध्ये, तृणधान्य शेतीपेक्षा पशुपालन मोठ्या प्रमाणात आहे. देशाच्या सर्व भागांत दुभत्या गाई कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. दक्षिणभागात वराह आणि कुक्कुटपालनाला गती मिळाली आहे. उच्चगुणवत्तेच्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. हा भाग स्वीडन डेअरी प्रक्रिया आणि चीज उत्पादनासाठी जगभरात ओळखले जाते.

३) शाश्‍वत कृषी पद्धतींवर स्वीडनचा भर असतो. सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक तंत्रांना प्रोत्साहन दिले जाते. पीक फेरपालट, रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि जमीन व्यवस्थापन अशा काही पद्धती पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी अवलंबल्या जातात.

४) स्वीडिश शेती तांत्रिक प्रगती आणि नवकल्पनांसाठी ओळखली जाते. पिकांचे शाश्‍वत व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक कृषितंत्र वापरले जाते. अनेक युरोपीय देशांप्रमाणे, स्वीडनने ऐतिहासिकदृष्ट्या युरोपीय संघाच्या सामाईक कृषी धोरणाद्वारे आपल्या कृषी क्षेत्राला अनुदान आणि समर्थन दिले आहे. शाश्‍वत शेतीपद्धती आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा या अनुदानांचा उद्देश आहे.

५) स्वीडनमध्ये कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला लोकप्रियता मिळाली आहे. अनेक फार्म पर्यटकांसाठी उपक्रम राबवतात. शेतामध्ये मुक्काम, खाद्य महोत्सव आणि शैक्षणिक सहल या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. स्वीडनच्या कृषी क्षेत्राला उत्तरेकडील हवामानामुळे आव्हानांचा सामना करावा लागत असताना, ते भविष्यासाठी त्याची व्यवहार्यता सुनिश्‍चित करण्यासाठी शाश्‍वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींवर लक्ष केंद्रित करून, परिस्थितीशी जुळवून घेत नवनवीन शोध लावत आहे.
- डॉ. राजेंद्र सरकाळे,९८५०५८६२२०
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com