Kenya Tourism : केनियामधील शाश्‍वत पर्यटन

International Tourism : आफ्रिका खंडातील केनिया देशामधील जंगल सफारीसाठी जगभरातील पर्यटक येतात. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था आहे. याचबरोबरीने महत्त्वाचे म्हणजे निसर्ग, वन्य प्राण्यांच्या सहचराचे कोणतेही नुकसान न करता त्यांनी चांगल्या पद्धतीने पर्यटन उद्योगाला चालना दिली आहे.
Kenya Tourism
Kenya Tourism Agrowon

Tourism of Kenya Country : काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यातील सर्व मीडियामधून एक फोटो, व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला. तो असा होता, की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘टी ११४’ या वाघिणीची वाट वाहनचालकांनी अडवली होती. त्यातील काही पर्यटकांनी त्याचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केले. मग नेहमीप्रमाणे संबंधित व्यवस्थापनाने दहा वाहन चालक आणि मार्गदर्शकांना निलंबित केले.

प्रत्येक वाहनामागे रुपये तीन हजार दंड केला वगैरे वगैरे... हे सर्व खूप प्रकर्षाने मला जाणवत आहे, कारण नुकताच मी आठ दिवस केनिया देशातील जंगल सफारी करून आलो. केनियामध्ये जंगल पर्यटनाची चांगली सुविधा आहे, त्यांनी निसर्ग आणि वन्य जिवांची चांगली काळजी घेतली आहे. त्यांची नियमावली तयार केली आहे. आपण देखील पर्यटनाच्या बरोबरीने पर्यावरण आणि वन्यजीवांचे संवर्धन करू शकतो,त्यासाठी इच्छा शक्तीची गरज आहे.

जंगल परिसरातील पर्यटन

केनियामध्ये जंगलांचा परिसर हा गवताच्या कुरणांनी वेढलेला आहे. या जंगलांचा आकाराने देखील लहान आहे. ॲम्बोसेली राष्ट्रीय उद्यान हे ३९२ चौरस किलोमीटर, नाकुरू राष्ट्रीय उद्यान हे १८८ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहेत. विपुल कुरण आणि जंगलातून वाहणारे ओढे, नाले, नद्यांमुळे भरपूर पाण्याची उपलब्धता असल्याने हरिण, काळवीट, डुक्कर, हत्ती, जिराफ, गेंडे, वाइल्ड बिस्ट, रानगव्यांची संख्या प्रचंड आहे.

त्यावर गुजराण करणारे वाघ, सिंह, चित्ते, बिबटे हे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या वन्य समृद्धीचा या देशाने व्यावसायिक पर्यटनासाठी चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासोबत पर्यटकांची काळजी देखील चांगल्या प्रकारे घातली जाते. जंगल सफारीसाठी रस्त्यांचे जाळे देखील खूप सुंदर आहे. मुळातच या देशात लोकसंख्या कमी असल्यामुळे तुरळक शिकारीचे प्रकार वगळता स्थानिक जमातींचे जंगल आणि वन्य प्राण्यांवर चांगले लक्ष असते, हे विशेष.

Kenya Tourism
Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

मसाईमारा या राष्ट्रीय पातळीवरील संरक्षित जंगलामध्ये हॉट एअर बलूनच्या साहाय्याने पर्यटकांना अवकाशातून जंगल आणि प्राण्यांचे दर्शन घडविण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. नाकुरू तलावाच्या नावाने ओळखले जाणाऱ्या अभयारण्यात एक हजाराहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात.

आपल्याकडे देखील मोर, हॉर्नबिल यांच्याबरोबरीने विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात. रणथंबोर, काझीरंगा, गीर राष्ट्रीय उद्यान अनुक्रमे वाघ, एकशिंगी गेंडा आणि सिंह यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत.

केनियामध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर हे प्रशिक्षित असतात. नियमित प्रशिक्षणामुळे जंगलातील प्राणी, पक्षी जगताबद्दल ते शास्त्रीय माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे देतात. येथील जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय, मीट चाटण, खनिज द्रव्यांच्या विटा टांगलेल्या असतात. केनिया देशाला वन्यजीव संरक्षणासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था, सेवाभावी संस्था, काही इतर देश मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात.

जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि विविध वन्य प्राणी संवर्धनकेंद्रित स्वयंसेवी संस्थादेखील मदत करतात. जगातील अनेक श्रीमंत व्यक्ती, प्रतिष्ठान व कॉर्पोरेट कंपन्या वन्यजीव संरक्षण उपक्रमांना मदत देतात. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटीचा देखील समावेश असतो. या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यात प्रवेश शुल्क आकारले जाते.

Kenya Tourism
Agriculture Tourism : गावच चालवतंय कृषी पर्यटन केंद्र

शाश्‍वत पर्यटनाची संधी

आफ्रिका खंडातील जंगल सफारीचा अनुभव घेतल्यानंतर असे लक्षात आले, की आपल्या देशातील तसेच राज्यातील काही जंगलांचा परिसर हा घनदाट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्राणी, पक्षी शोधणे आणि पाहणे खूप अवघड ठरते. अनेक प्राणी निशाचर आणि पहाटे, सायंकाळी सक्रिय होत असल्यामुळे त्यांना नेहमीच्या सफारीवेळी शोधणे फार अवघड होते. आपली सर्व अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प ही आकाराने खूप मोठी आहेत.

आपल्या अभयारण्यातून होणारे मानवाचे अतिक्रमण हा देखील खूप चिंतेचा विषय आहे. चोरटी शिकार, आसपास होणारा अनिर्बंध औद्योगिक विकासामुळे प्राणी, पक्षी यांची संख्या कमी होत असावी. त्यामुळे त्यांचे दर्शन फार दुर्मीळ होते. भारतात अनेक वन्यजीव जसे की बेंगाल वाघ, आशियायी हत्ती, हरिण, काळवीट, गेंडे यांची संख्या लक्षणीय आहे. तथापि, त्यांचे सुलभ दर्शन पर्यटकांना होण्यासाठी संबंधित विभागांनी पाऊल टाकणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातही शाश्‍वत पर्यटनाला चांगली संधी आहे.

स्थानिकांचा सहभाग आणि रोजगार उपलब्धता

ॲम्बोसेली राष्ट्रीय उद्यान, नाकुरू राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील स्थानिक जमातींना या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे लोक हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी जंगलांच्या प्रवेशद्वारावर उभे असतात.

अनेक पर्यटक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करतात, त्यामुळे मोठ्या रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. केनिया टुरिझम बोर्ड हे वेगवेगळ्या जाहिराती, सोशल मीडियाचा वापर तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात सहभागी होऊन वन्यजीव सफारी बाबत जाहिराती करत असते. अनेक लुप्तप्राय प्रजाती जागरूक पर्यटकांना नैसर्गिक अधिवासात पाहता याव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत.

अॅबसेली नॅशनल पार्क येथे ‘हत्ती दत्तक योजना’ राबवून संवर्धनाबाबत जागरूकता व निधी तयार केला जातो. त्यामुळे केनियाची जबाबदार पर्यटन स्थळात गणना होते. वन्यजीवांसोबत त्यांच्या सांस्कृतिक वारसादेखील पर्यटकांसमोर सादर करतात. स्थानिक परंपरा, संगीत, नृत्य, कलाकुसर दाखवण्याचे कार्यक्रम यांचा समावेश असतो.

त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उत्सवाचे आयोजन केले जाते. मसाईमारा येथील मारा नदीतील वाइल्ड बीस्ट स्थलांतर पाहण्यासाठी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेला महत्त्व दिल्याने पोलिस यंत्रणा व तत्काळ सेवा उच्च दर्जाची आहे. केनियातील वन्यजीव संवर्धनाबाबत माहितीपट तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, प्रसारक यांचे मोठे योगदान आहे.

वन्यजीव संवर्धनात स्थानिक जमातींचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रतिनिधींना निर्णय व व्यवस्थापन प्रक्रियेत सामील करून घेतले जाते. शिकार प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक रहिवाशांना रेंजर्स आणि स्काउट म्हणून नियुक्त केले आहे.

त्यांच्याकडील पारंपरिक वन्यजीवाबाबतचे ज्ञान आणि शिकार मागोवा कसा घेतला जातो, याबाबतच्या ज्ञानाचा वापर केला जातो. स्थानिक संस्था आणि सेवाभावी संस्था या वन्यजीव संवर्धन व संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवितात. लहानपणापासूनच वन्यप्राणी संवर्धन व संरक्षण याबाबतची मानसिकता वाढवण्यासाठी शाळांमधून विशेष उपक्रम राबविले जातात.

स्थानिक जमातींना शाश्‍वत शेती व पशुपालनाचा आधार आहे. शाश्‍वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाल्याने शिकारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. स्थानिक जमातीमध्ये वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. त्यावर त्यांचा दृढ विश्‍वास आहे. त्यांच्या संस्कृतीचा तो भाग आहे. त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातात, यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्यास मदत झाली आहे.

स्थानिकांना वन्यजीव संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतले जाते. त्यांच्या ज्ञानाचा वापर शास्त्रज्ञ करून घेतात. नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक समित्या कार्यरत आहेत. त्या मानव आणि वन्यजीवांच्या गरजा भागवतात. अनेक ठिकाणी ‘इको लॉज’ कार्यरत आहेत. त्यांना मार्गदर्शित जंगल सफारी चालवण्यासाठी परवाना उपलब्ध करून दिल्याने वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. काही स्थानिक जमाती समुदायांना शासनामार्फत निधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या संरक्षक व संवर्धनविषयक कामासाठी प्रोत्साहन देतात.

डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५

(सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com