Jalgaon News : खानदेशात सतत पाऊस सुरू आहे. यात काही भागांत अतिवृष्टीही झाली आहे. यामुळे पीकहानी होत असून, नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. पंचनामे काही भागांत प्रशासनाने हाती घेतले नव्हते. या बाबत शेतकरी, लोकप्रतिनिधींनी शासनासह मंत्र्यांकडे तक्रार केली.
यामुळे पंचनामे काही भागांत हाती घेण्यात आले आहेत. खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर, जळगावातील जळगाव, चोपडा, धरणगाव, अमळनेर, पारोळा आदी भागांत अतिवृष्टी झाली आहे.
या भागातील काळ्या कसदार जमिनीतील पिकांची स्थिती बिकट बनली आहे. नुकसान ३५ टक्क्यांवर आहे. यात प्रशासन, तलाठी मंडळी पंचनामे कसे करायचे, अतिवृष्टी किंवा ६० मिलिमीटरवर पाऊस झाला नाही, असे सांगून पंचनामे टाळत होते.
या बाबत शेतकरी, ग्रामस्थांनी पालकमंत्री व शासनाकडे तक्रारी केल्या. तसेच पीकहानीची स्थिती कशी आहे, नुकसान किती व कोणत्या पिकाचे झाले आहे, याची माहिती दिली. यानंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंचनामे करा, अशा सूचना प्रशासनास दिल्या. यानंतर पंचनामे सुरू झाले आहेत.
घर, गोठ्यांसह पिकांची माहिती या पंचनामे कार्यवाहीत घेतली जाईल. यात पाणी साचल्याने, पिकांवर माती फिरल्याने, जमिनी खरडल्याबाबतही पंचनामे केले जातील. जिल्ह्यात सध्या पिकांत पाणी साचल्याने व सततच्या पावसाने पिकांची स्थिती खराब झाली आहे. पिकांची वाढ खुंटली असून, पिके पिवळी लाल पडत आहेत. उत्पादन घटणार आहे.
पुढे नुकसान अधिक होईल, अशीही शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन पंचनाम्यांची कार्यवाही सुरू झाली असून, प्रशासन लवकरच आपला अहवाल तयार करून प्रशासनास सादर करील, अशी माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.