Solapur News : ‘‘पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. अनेक भागांत पिके करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना पीकविम्यातून २५ टक्के अग्रिम देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जवळपास ७४ मंडलांत पिकांची स्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले. पण तरीही येत्या दोन दिवसांत यासंबंधीचा अंतिम अहवाल तयार होईल. तेव्हा नेमकी परिस्थिती पुढे येईल, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.
जिल्ह्यात या वर्षी पावसाने प्रदीर्घ ओढ दिली आहे. आज जवळपास तीन महिने उलटूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पण तो सरसकट नाही, शिवाय त्यात जोरही नाही.
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेत पीकविमा कंपन्यांना सलग २१ दिवसांचा खंड पडल्यास अग्रिम म्हणून विम्याच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देता येते. या नियमानुसार त्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले. सध्या प्रत्येक तालुकानिहाय ५ ते १० ठिकाणे त्यासाठी निश्चित केली आहेत. पीकविमा कंपनी, कृषी आणि महसूल विभागाचे संयुक्त पथक हे सर्वेक्षण करत आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ९१ पैकी ७४ मंडलांतील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वच ठिकाणी खरीप पिके शेवटच्या घटका मोजत आहेत, अशी स्थिती आहे. याचा अहवाल तयार केला जात आहे. दोन दिवसांत हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८९ हजार ५७ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा एकूण ३ लाख २३ हजार ५७८ हेक्टरवर म्हणजे १११.१४ टक्के पेरणी झाली आहे. त्या सर्वाधिक १ लाख २९ हजार ५२३ हेक्टरवर सोयाबीन आहे. त्यानंतर ६२ हजार ६३३ हेक्टरवर तूर आणि ४८ हजार हेक्टरवर उडदाचे क्षेत्र आहे. पण यापैकी बहुतेक सर्व पिके आता हातची गेली आहेत. त्यातही सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याचे सांगण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.