सौ. मोहिनी गायकवाड, सचिन पाटील, डॉ. अशोक कडलगSustainable Farming: हवामान बदलाच्या परिस्थितीत ऊस पिकातील पाणी व्यवस्थापन हे पारंपरिक ‘ठरावीक दिवसांनी सिंचन’ या पद्धतीपुरते मर्यादित राहू शकत नाही. आता ‘गरजेनुसार सिंचन’ ही संकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे. पाऊस किती झाला, जमिनीत किती ओलावा आहे, पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता किती आहे, तापमान किती आहे आणि ऊस कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे, या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून सिंचनाचा निर्णय घ्यावा..पावसातील अनिश्चितता, अतिवृष्टी, दीर्घ पावसाचा खंड आणि वाढते तापमान यामुळे ऊस पिकाच्या पाणी व्यवस्थापनाचे गणित बदलत आहे. त्यामुळे ठरावीक दिवसांनी सिंचन करण्याऐवजी पिकाची अवस्था, जमिनीतील ओलावा, पाऊस आणि हवामान अंदाज यांचा विचार करून पाणी देणे गरजेचे आहे. पावसाचे बदललेले स्वरूप, कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, पावसातील दीर्घ खंड, वाढते तापमान आणि बाष्पीभवन-बाष्पोत्सर्जनात होणारी वाढ यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज आणि सिंचनाचे वेळापत्रक बदलत आहे. त्यामुळे ‘पाणी उपलब्ध आहे म्हणून सिंचन’ करण्याऐवजी ‘पिकाला जेव्हा आणि जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढेच पाणी देणे’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. .Crop Management: पावसाच्या खंड काळातील उपाययोजना.ऊस शेतीत पाऊस आणि सिंचन यांचा योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असताना लगेच सिंचन केल्यास पाण्याचा अपव्यय होतो. दुसरीकडे, पावसाचा मोठा खंड पडल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकावर पाण्याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे सिंचनाचा निर्णय घेताना मागील पावसाचे प्रमाण, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकाची वाढीची अवस्था आणि पुढील हवामानाचा अंदाज या चार बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. हवामान बदलामुळे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. अतिवृष्टीमुळे ऊस शेतात पाणी साचल्यास मुळांच्या क्षेत्रात ओलावा वाढतो आणि हवा कमी होते. .परिणामी, मुळांच्या श्वसनक्रियेत अडथळा येतो आणि पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. काही परिस्थितीत रोगांचा प्रादुर्भावही वाढू शकतो. त्यामुळे ऊस शेतीत सिंचनाइतकेच जलनिचरा व्यवस्थापनालाही महत्त्व द्यावे. शेताचा उतार, सरींची दिशा आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन निचऱ्याची व्यवस्था करावी. अतिवृष्टी झाल्यानंतर अतिरिक्त पाणी शक्य तितक्या लवकर शेताबाहेर काढणे आवश्यक आहे. पाणी कमी पडू नये, तसेच पाणी जास्त काळ साचूही नये, हे ऊस पाणी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्त्व असावे..वाढत्या तापमानात पाण्याची गरजतापमान वाढल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन आणि पिकातून होणारे बाष्पोत्सर्जन वाढते. या दोन्ही प्रक्रियांना एकत्रितपणे बाष्पीभवन-बाष्पोत्सर्जन म्हणतात. तापमान वाढल्यास जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो आणि पिकाची पाण्याची मागणी वाढते. विशेषतः उन्हाळ्यातील उच्च तापमानाच्या काळात ऊस पिकावर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असते. पाण्याचा ताण आल्यास पानांची वाढ, प्रकाशसंश्लेषण आणि कांड्यांची वाढ यावर परिणाम होतो. परिणामी ऊस उत्पादनात घट होऊ शकते..पिकाच्या अवस्थेनुसार पाणीऊस पिकाला संपूर्ण हंगामात समान प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे.लागवडीनंतरची अवस्थालागवडीनंतर बेण्याची उगवण आणि नवीन मुळांची निर्मिती सुरू होते. या काळात जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र जास्त पाणी दिल्यास पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे गरजेनुसार हलके सिंचन करावे..फुटवा अवस्थाफुटवा अवस्थेत कांड्यांची संख्या निश्चित होण्यास सुरुवात होते. या काळात पाण्याचा ताण आल्यास फुटव्यांची वाढ आणि संख्या प्रभावित होऊ शकते. त्यामुळे जमिनीत आवश्यक ओलावा टिकवणे महत्त्वाचे आहे.जोमदार वाढीची अवस्थाजोमदार वाढीच्या काळात उसाची पाने, खोड आणि मुळे वेगाने वाढतात. या अवस्थेत पिकाची पाण्याची गरज मोठी असते. त्यामुळे नियमित निरीक्षण करून पिकाच्या गरजेनुसार सिंचन करावे..Pola Festival: पोळ्याच्या परंपरतेतून जोपासलेली जैवविविधता.पक्वता अवस्थापीक पक्वतेकडे जात असताना पाण्याचे नियोजन बदलावे. काढणीच्या जवळ अनावश्यक अतिसिंचन टाळावे. जमिनीतील ओलावा, पिकाची स्थिती आणि काढणीचे नियोजन लक्षात घेऊन अंतिम सिंचनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे..ठिबक सिंचनाचा वापरबदलत्या हवामानात उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन प्रभावी तंत्रज्ञान आहे. ठिबकद्वारे पाणी पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात नियंत्रित प्रमाणात देता येते. त्यामुळे पाण्याचे वितरण अधिक कार्यक्षमपणे होते.ठिबक सिंचनामुळे पाणी बचतीबरोबरच फर्टिगेशन करणे शक्य होते. विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यासोबत पिकाच्या मुळांपर्यंत देता येतात. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा समन्वय साधता येतो. मात्र ठिबक सिंचनाचा फायदा मिळण्यासाठी प्रणालीची नियमित देखभाल आवश्यक आहे. फिल्टर स्वच्छ करणे, लॅटरलची तपासणी करणे, ड्रीपरमधून समान प्रवाह होत आहे का हे पाहणे, पाण्याचा दाब तपासणे आणि गळती दुरुस्त करणे या बाबी नियमितपणे कराव्यात..पाचट आच्छादनपाचट न जाळता त्याचा आच्छादन म्हणून वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते. पाचटाच्या आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन कमी होते. तसेच जमिनीचे तापमान तुलनेने नियंत्रित राहते आणि तणांची वाढही कमी होण्यास मदत होते. पावसातील खंड आणि वाढते तापमान या दोन्ही परिस्थितीत पाचट आच्छादन हा पाणी व्यवस्थापनाचा प्रभावी उपाय ठरतो.मृदा आर्द्रतेनुसार सिंचनकिती दिवसांनी पाणी द्यायचे? यापेक्षा जमिनीत सध्या किती ओलावा आहे? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मृदा आर्द्रता तपासण्यासाठी प्रत्यक्ष मातीची तपासणी, टेन्शिओमीटर तसेच मृदा आर्द्रता सेन्सरचा वापर करता येतो. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार सिंचनाचा निर्णय घेता येतो. यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळता येते आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो..हवामान अंदाजाचा वापरआगामी काही दिवसांचा हवामान अंदाज हा सिंचन नियोजनासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो. पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक सिंचन पुढे ढकलता येते. दीर्घ पावसाचा खंड अपेक्षित असल्यास पिकाच्या अवस्थेनुसार सिंचनाचे नियोजन करता येते. यामुळे पाणी, वीज आणि मजुरी या तिन्हींची बचत होण्यास मदत होते.ऊर्जेची बचतसिंचनासाठी पाणी उपसताना ऊर्जा खर्च होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय म्हणजे अप्रत्यक्षपणे ऊर्जेचाही अपव्यय आहे. योग्य क्षमतेचा पंप, पाइपलाइनमधील गळती कमी करणे, योग्य दाब राखणे आणि गरजेनुसार सिंचन करणे यामुळे पाणी आणि ऊर्जा दोन्हींची बचत करता येते..स्वयंचलित सिंचन तंत्रभविष्यात ऊस शेती अधिक अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करणे आवश्यक आहे. मृदा आर्द्रता सेन्सर, स्वयंचलित सिंचन नियंत्रक, हवामान केंद्र आणि मोबाईल आधारित हवामान माहिती यांचा वापर वाढविणे गरजेचे आहे.ठिबक सिंचन + फर्टिगेशन + मृदा आर्द्रता सेन्सर + हवामान माहिती यांचा एकत्रित वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार सिंचन करता येते. फर्टिगेशनमध्ये ईसी आणि सामू सेन्सरयुक्त स्वयंचलित प्रणालीचा वापर केल्यास खतांचे द्रावण योग्य गुणवत्तेत आणि आवश्यक प्रमाणात देण्यास मदत होऊ शकते..बाष्पीभवन आधारित सिंचन नियोजनशास्त्रीय पद्धतीने सिंचनाचे नियोजन करताना संदर्भ बाष्पीभवन (ETo) आणि पीक गुणांक (Kc) यांचा वापर करता येतो..सूत्र ःपिकाची पाण्याची गरज = संदर्भ बाष्पीभवन (ETo) × पीक गुणांक (Kc)पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पीक गुणांक बदलत असल्यामुळे संपूर्ण हंगामासाठी एकच सिंचन वेळापत्रक ठेवण्याऐवजी पिकाच्या अवस्थेनुसार सिंचन करणे अधिक योग्य ठरते.- मोहिनी गायकवाड,८३०८८२०५४५(शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.