Sugarcane Bill : सोलापुरात गाळप हंगामा समाप्तीकडे, पण ऊस उत्पादकांची बिले थकीतच

Sugarcane Season : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही अनेक कारखान्यांकडून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत.
Sugar Factory
Sugarcane Season Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही अनेक कारखान्यांकडून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. ऊसबिलासाठी शेतकरी कारखान्यांवर हेलपाटे मारून लागले आहेत. जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांकडे १५ फेब्रुवारीअखेर एफआरपीचे ६७५.६४ कोटी रुपये थकले आहेत.

कारखान्यात गाळप झालेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना १५ दिवसांत देण्याची कायद्यात तरतूद आहे. यावर्षी जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर ८८ लाख ५३ हजार २३० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. १०.२५ टक्के पायाभूत साखर उताऱ्याप्रमाणे तोडणी वाहतूक धरून जिल्ह्यातील कारखान्यांची तीन हजार ४०० रुपये एफआरपी होते.

Sugar Factory
Sugarcane FRP : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही?

तोडणी वाहतूक वजा जाता १५ फेब्रुवारीअखेर देय असलेल्या रकमेपैकी एक हजार ६२९ कोटी रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. तरीही पायाभूत साखर उताऱ्यानुसार एफआरपीचे ६७५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे अडकले आहेत.

१५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जवळपास ९८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. म्हणजे १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान गाळप झालेल्या उसाचे पैसे देखील कारखान्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे लागणार आहेत.

एफआरपीपेक्षा अधिकचा दर कधी मिळणार?

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा जिल्ह्यात असलेला उसाचा तुटवडा, जिल्ह्यातील कारखान्यांची अधिकची संख्या, जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना जाणारा ऊस यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागली.

त्यासाठी हंगामाच्या सुरवातीला काही कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला\ तर काही कारखान्यांनी जास्तीचा पहिला हप्ता दिला. तथापि, हंगाम जसजसा पुढे सरकू लागला, तसतसा जाहीर केलेला ऊसदर किंवा पहिला हप्ता देणे कारखान्यांना कठीण बनू लागले.

Sugar Factory
Sugarcane FRP: एकरकमी एफआरपी शक्य नाही

सहा कारखान्यांनीच दिली शंभर टक्के एफआरपी

जिल्ह्यातील पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर व करकंब), ओंकार (चांदापुरी), व्ही. पी. शुगर्स या सहा कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. मातोश्री कारखान्याने एक छदामही शेतकऱ्यांना दिला नाही.

सिद्धेश्वर, लोकनेते, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), सिद्धनाथ, जकराया, इंद्रेश्वर, भैरवनाथ(लवंगी), जयहिंद, धाराशिव (सांगोला), आवताडे शुगर्स या कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. तीन हजार ५०० रुपये ऊसदर जाहीर केलेल्या विठ्ठल (वेणूनगर) कारखान्याने केवळ ०.५६ टक्के एफआरपी दिली आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांनी यावर्षी ऊस नेण्यासाठी स्पर्धा केली. अनेक कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे ऊसदराची स्पर्धा होऊन तीन हजार रुपये दर मिळणे आवश्यक होते. थकीत एफआरपीबद्दल साखर सहसंचालकांना निवेदने दिली आहेत. मार्च, एप्रिलमध्ये ऊसदरासाठी मोठी आंदोलने होतील.
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
थकीत एफआरपी प्रकरणी आरआरसी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठवले आहेत. त्यांच्या स्तरावर सुनावण्या घेऊन कार्यवाही सुरू आहे. सुनावणीनंतर वसुलीचे दाखले साखर आयुक्तांकडून मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- प्रकाश अष्टेकर, साखर सहसंचालक, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com