राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Rate : कोल्हापूर ः केंद्र सरकारने सप्टेंबरसाठी २३.५ लाख टन साखरेचा कोटा बुधवारी (ता. २८) जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दीड लाख टनांनी कमी कोटा आहे. याचा सकारात्मक परिणाम साखर दर वाढीवर दिसून येणार आहे. येत्या काही दिवसात साखरेच्या दरात क्विंटलला शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा केंद्र सरकारने दिला होता. जुलैमध्ये न विकलेली साखरही पंधरा ऑगस्टपर्यंत विकण्यासाठी परवानगी दिली होती. यामुळे ऑगस्टमध्ये जुलै व ऑगस्टचीही साखर बाजारात आल्याने अपेक्षित दरवाढ झाली नव्हती. अनेक कारखान्यांनी ऑगस्टच्या पूर्वाधातही जुलैचा कोटा विकला. परिणामी ऑगस्टमध्ये साखरेचे दर बहुतांश करून स्थिरच राहिले. सप्टेंबरच्या कोटा जाहीर करताना मात्र ऑगस्टच्या साखर कोट्यास मुदतवाढ दिलेली नाही. यामुळे सप्टेंबरची साखर सप्टेंबरमध्येच कारखान्यांना विकावी लागेल.
येत्या काही दिवसामंध्ये गणेशोत्सवासारखे सण येत असल्याने किरकोळ बाजारातून साखरेला मागणी वाढेल अशी चिन्हे आहेत. सध्या दर ३५०० ते ३६०० रुपयांपर्यंत आहेत. येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात ३७०० रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. सणाबरोबर काही अन्य निर्णयामुळेही साखरेची विक्री गतीने होऊ शकेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सप्टेंबरपासून रेल्वेने माल वाहतुकीच्या खर्चात क्विंटलला चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत सुट जाहीर केली आहे.
ही सवलत सप्टेंबरअखेरच आहे. यामुळे आसाम आणि पश्चिम बंगालमधून देशाच्या अन्य भागांतील साखरेला चांगली मागणी येईल, अशी शक्यता आहे. या काळात मुख्यत्वे करून दुर्गापूजेसारखे उत्सव आहेत. यामुळे या भागात साखरेला मागणी कायम राहील, अशी शक्यता आहे. बहुतांशी भागात पाइपलाइनमधील साखर शिल्लक नाही. त्यामुळे मागणीमध्ये एकदम वाढ हेाऊन मागणी पुरवठा तत्त्वानुसार मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दरातही वाढ हेाण्याची दाट शक्यता आहे. सध्या रस्ते वाहतूकही सुरळीत असल्याने याचाही चांगला परिणाम साखरेच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कोट्यात कपात करण्यात आली आहे. सप्टेबरमध्ये देशात विविध भागांत सणांचा माहोल असल्याने साखरेला निरंतर मागणी राहील, असा सध्याचा अंदाज आहे. ऑगस्टपेक्षा निश्चितपणे सप्टेंबरमध्ये साखरेच्या दरवाढीला वाव आहे. दर वाढल्यास साखर उद्योगासाठी ही समाधानाची बाब आहे.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.