Sangli News : जिल्ह्यात साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. परंतु ऊसवाढीच्या काळात उन्हाळी पावसाची दडी, मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर पडला. त्यातच पुरेसे पाणी उपलब्ध नाही. या साऱ्याचा फटका ऊस पिकाला बसला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप क्षमताही वाढवली असल्याचे चित्र आहे. यंदाच्या गाळप हंगामात ११ हजार ४१९ हेक्टर वाढ झाली आहे. सन २०२३-२४ च्या हंगामासाठी १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवरील उसाचे गाळप होणार आहे.
गतवर्षीच्या हंगामात पंधरा साखर कारखान्यांनी हंगाम सरू केला होता. पंधरा साखर कारखान्यांनी ८२ लाख २२ हजार ३१९ टन उसाचे गाळप करून ८२ लाख ५६५ हजार ७८२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते.
जिल्ह्यात यंदाच्या हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. मात्र मे महिन्यात उन्हाळी पावसाने दडी मारली. त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला. परिणामी, कृष्णा आणि वारणा नदीकाठी उपसा बंदी लागू केली. पाणी पुरेसे मिळाले नाही. त्यातच मॉन्सूनचा पाऊसही लांबणीवर पडला.
या साऱ्यामुळे ऐन ऊस वाढीच्या काळात पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यातच वाढती उष्णता आणि दमट वातावरणामुळे उसावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. या साऱ्यामुळे प्रामुख्याने आडसाली, पूर्वहंगाम, सुरू हंगाम आणि खोडवा या हंगामातील ऊस वाढीला फटका बसला आहे. परिणामी यंदा साखरेचे उत्पादन २० टक्क्यांनी घटणार अशी शक्यता साखर कारखानदारांनी व्यक्त केली आहे.
साखर कारखान्यांनी गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. गाळप हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो. परंतु अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. गतवर्षी एक नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू झाला होता. त्यामुळे कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचा निर्णय होईल, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात यंदा गाळपास उपलब्ध असणाऱ्या तालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज २१०३५
जत ९३७७.६
खानापूर १४१३७.४
वाळवा ३३२०८.२
तासगाव ८७२४.४
शिराळा १०२८५.९
आटपाडी ४४०८.४
कवठेमहांकाळ ४१८२.७
पलूस १३५१८.८
कडेगाव १६८०९.९
एकूण १३५६८८.९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.