Kolhapur Agriculture News : विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला उसाचा गळीत हंगाम अखेर सुरू झाला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागील गळीत हंगामासाठी २०० रूपये अंतिम हप्ता तर पुढील हंगामासाठी ३ हजार ७०० रूपये प्रतिटन मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासन आणि साखर कारखानदारांनी लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार (ता.२५) दिली. साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना त्यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे.
शेतकरी संघटनेकडून पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद पार पडली. यामध्ये गळीत हंगाम सन २०२३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता देण्याची मागणी केली. तर गळीत हंगाम २०२४-२५ साठी ३ हजार ७०० रूपयांच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती.
परंतु याचा विचार न होता राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. आम्ही केलेल्या मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या १५ दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचेकडे केली. तसेच याबाबत कोणताही निर्णय न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचाही इशारा देण्यात आला.
चालू वर्षीचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अनेक साखर कारखानदार निवडणूक लढविण्यात गुंतल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. नुकताच येवून गेलेला महापूर व लांबलेला गळीत हंगाम यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे ऊसतोडीसाठी मजूराकडून व ऊस तोडणी मशिन मालकाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असून एकरी ५ ते १० हजार रूपयाची मागणी केली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १०.८० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने ३ हजार ५०० रूपये पहिली उचल दिली. तर १२ ते १२.३० टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता ३ हजार ७०० रूपये पहिली उचल जाहीर करण्यास काहीच अडचण नाही. येत्या १५ दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.