
Kolhapur News: यंदा देशात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी पुढील वर्षाच्या प्रारंभी देशात पुरेसा साखर साठा उपलब्ध असेल, असा दावा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) केला आहे. केंद्राच्या मानकानुसार किमान तीन महिन्यांचा शिल्लक साखर साठा पुढील हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक असणे गरजेचे असते. ५० ते ६० लाख टन साखरेचा साठा प्रत्येक हंगाम सुरू होण्याअगोदर देशात असेल या दृष्टीने केंद्र विक्री धोरण आखत असते. साठ्यानुसार कारखान्यांना विक्री कोटा देऊन पुरेशी साखर शिल्लक राहण्याकडे लक्ष दिले जाते.
यंदा साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० लाख टन कमी उत्पादित होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या हंगामावर नजर टाकता ही तूट प्रकर्षाने जाणवून येत आहे. यातच केंद्राने दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिल्याने पुढील हंगामाच्या प्रारंभी साखर कमी शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘इस्मा’ने आकडेवारीचा आधार घेत स्थिती स्पष्ट केली आहे.
त्यांच्या मते २०२४-२५ हंगामासाठी सुरुवातीचा साठा ८० लाख टन होता. २०२४-२५ साठी साखर उत्पादनाचा अंदाज २७२ लाख टन आहे, जो २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या ३२० लाख टनांपेक्षा सुमारे १५ टक्के कमी आहे. ८० लाख टनांचा सुरुवातीचा साठा आणि २७२ लाख टन उत्पादनाचा अंदाज असल्याने, २०२४-२५ मध्ये एकूण साखर उपलब्धता ३५२ लाख टन असेल. भारतात दरवर्षी सुमारे २८० लाख टन साखर वापरली जाते.
यामुळे पुढील हंगामासाठी सुमारे ६० लाख टन साखरेचा साठा सुरुवातीच्या काळात उपलब्ध होईल. २०२३-२४ हंगामात साखर व्यापारावर निर्बंध घातल्यानंतर, केंद्र सरकारने या वर्षी २१ जानेवारीला साखर उत्पादकांना १० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली. देशांतर्गत बाजारपेठेत किंमत स्थिरता राखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी साखर निर्यातीवर निर्बंध घातले होते.
यंदा १० लाख टन निर्यात केल्यानंतरही, भारत हंगाम ६० लाख टनांवर संपवेल. साधारणपणे, सरकारला ५०-५५ लाख टन सामान्य साठा म्हणून ठेवायचा असतो. निर्यातीला परवानगी दिल्यानंतरही पुरेसा साठा असेल. सध्या सहा ते सात लाख टन साखर निर्यातीच्या प्रक्रियेत आहे. सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याने दहा लाख टन साखर पूर्णपणे निर्यात होऊ शकते. यानंतरही पुरेसा साठा शिल्लक राहील, असा ‘इस्मा’चा आशावाद आहे.
साखर निर्मितीवरही प्रतिकूल परिणाम
सध्या देशातील हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना साखर निर्मितीत घट कायम आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातही साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. येत्या दोन महिन्यांत देशातील हंगाम संपण्याची शक्यता आहे. मात्र कडक उन्हाळा, व सुरुवातीच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे उसाच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी घट होत असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम साखर निर्मितीवरही होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.