Indian Agriculture : पुरंदर तालुक्यातील सुचिता निगडे यांनी घेतला शेतीतच करिअरचा ध्यास

पुणे जिल्ह्यातील गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सुचिता हिने बी एस्सी (कृषी व्‍यवसाय व्यवस्थापन) अभ्यासक्रम करत असल्यापासून स्वतःच्या अत्याधुनिक शेतीचे स्वप्न बघितले. हरितगृहातील शेती यशस्वी केली आहे. आता तर महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कांदा निर्यातीस प्रारंभ केला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Pune Agriculture News : कृषी पदवी घेत असतानाच सुचिता सुधीर निगडे हिच्या मनात शेतीतच करिअर करण्याचा विचार रुजत गेला. ती जिद्द धरून पदवीधर होताच वडिलांसह परिसरातील वाघापूर (ता. पुरंदर) आणि मावळ भागातील अनेक हरितगृहांना भेटी देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर पुणे, मुंबई, बंगलोर आणि हैदराबाद येथील फुलबाजारांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. बाजारपेठांचे सर्वेक्षण व व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

चर्चेतून कार्नेशनचे क्षेत्र गुलाब आणि जरबेराच्या तुलनेत कमी असून, चांगली मागणी असल्याचे समजल्याने तिचा एक एकर क्षेत्रावर हरितगृह उभारणी आणि त्यात कार्नेशन हे पीक घेण्याचा निर्णय पक्का होत गेला.

मग सुचिता व तिची आई सौ. मनीषा यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आधुनिक फुलशेतीसंदर्भात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा आजही हरितगृहाच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये होत आहे. चार महिन्यापूर्वी त्यांचे चेतन जगताप यांच्याशी लग्न झाले.

त्यांचे सासर जवळच (सासवड) असल्याने त्या आठवड्यातील दोन दिवस हरितगृहाचे व्यवस्थापन पाहतात. दरम्यानच्या काळात आई व्यवस्थापन पाहतात. कृषी शिक्षणानंतर स्वतःचा शेती व्यवसाय आधुनिक पद्धतीने करणाऱ्या सुचिताचा २०२१-२२ मध्ये ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ ने सन्मानही करण्यात आला.

Indian Agriculture
Indian Agriculture : देऊळगावराजातील विनोद चव्हाण यांनी संरक्षित शेतीतून शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

उभारणी, नियोजन आणि व्यवस्थापन

- खडकाळ व पडीक माळरानावर पॉलिहाउसची उभारणी केली. त्यासाठी ९ लाख रुपये खर्चून वेल्हे (जि. पुणे) येथून सुमारे ४०० ब्रास लाल माती मागवून वापरली.

- खते व पाणी व्यवस्थापनासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली. सुरुवातीला अधिक खर्च आला तरी मजुरावंरील खर्चात बचत होते. सध्या केवळ दोन कुटुंबांच्या (चार व्यक्ती) व्यवस्थापन केले जाते.

- कार्नेशन हे तापमानासाठी संवेदनशील पीक आहे. तापमान नियंत्रण व हवा खेळती ठेवण्यासाठी फॅन लावले आहेत. तसेच आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी फॉगर वापरले जातात.

- हरितगृहाच्या बाजूने मका आणि अन्य झाडांची लागवड केली आहे.

- मातीतील सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढवण्यासाठी फिल्टर केलेल्या शेणस्लरीचा वापर ठिबकद्वारे केला जातो. यासाठी बेडवर दोनऐवजी तीन ठिबक लॅटरल वापरल्या आहेत. ही अतिरिक्त लॅटरल बेडवरील तापमान नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते.

- सामान्यतः एकरी ७० हजार कार्नेशन रोपे लावली जातात. मात्र झिगझॅग पद्धतीने लागवड केल्याने व्यवस्थित अंतर ठेवूनही ९० हजार रोपे बसवली.

- मागणीनुसार पांढरा, फिकट गुलाबी, गडद गुलाबी, लाल, पिवळा, केशरी अशा पाच रंगांच्या फुलांची लागवड केली. त्यातही पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांना विशेष मागणी असून, अन्य रंगाच्या तुलनेमध्ये १० ते २० टक्के जास्त दर मिळतो.

Indian Agriculture
Mango Amboshi Production : अलिबागमध्ये आंबोशीच्या उत्पादनात घट

कोरोनाचा झाला फायदा

पॉलिहाउस उभारल्यानंतर कोरोना महामारीचे संकट आले. मात्र नुकतीच लागवड झालेली होती व अजून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू व्हायचे होते. कोरोना काळामध्ये फुलांना उठावच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फूल उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले.

परिणामी, टाळेबंदी शिथिल होत गेल्यानंतर कट फ्लॉवर विशेषतः कार्नेशनचा बाजारपेठेमध्ये मोठा तुटवडा निर्माण झाला. याच काळात निगडे यांचे उत्पादन सुरू झाले, त्यामुळे पुणे, मुंबई आणि हैदराबाद बाजारपेठेमध्ये या काळात आम्हाला सर्वाधिक २० रुपये प्रति फूल दर मिळाल्याचे निगडे यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपनी

सुचिताने परिसरातील १०० महिलांच्या सहभागातून ‘पुरंदर कृषी कन्या फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची (एफपीसी) स्थापना केली आहे. त्यात विशेषतः फुलशेतीसह अंजीर, सीताफळ फळबाग असणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

एका कंपनीच्या सहकार्याने कांदा खरेदी व निर्यातीच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्याच्या पहिल्या दोन कन्साईनमेंट दुबईला पाठवल्या आहेत. आता ‘स्वीटकॉर्न’वर प्रक्रिया आणि निर्यातीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

संपर्क - सुचिता निगडे - जगताप,- ८८३०८०२५८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com