माणिक रासवे
Parbhani News : परभणी येथील शेख तहेसीन शेख मुन्वर या तयार कपडे निर्मिती तसेच शिवणकाम वर्गाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून तयार कपडे निर्मिती व्यवसायाचा विस्तार करून त्यांनी वर्षभर चाळीस गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यशस्वी फॅशन डिझायनर म्हणून तहेसीन यांची ओळख निर्माण केली आहे.
परभणी शहरातील शेख तहेसीन शेख मुन्वर याचे माहेर काठोडा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथील आहे. तेथे त्यांच्या कुटुंबाची पाच एकर शेती आहे. परभणी येथील शेख मुन्वर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शेख मुन्वर हे भाडेतत्त्वावर वाहतुकीचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शेख तहेसीन यांनी २०१४ पासून घरगुती स्तरावर शिवणकामास सुरुवात करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षांत शिवणकाम व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आहे.
बचत गटाची मिळाली साथ...
लॉकडाउनच्या काळात व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेख तहेसीन या आर्थिक अडचणीत सापडल्या. शिवणकामासाठी कापड घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. या काळात शिवणकाम व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांनी शिफा महिला स्वयंसाह्यता गटाकडून पन्नास हजारांचे कर्ज घेतले. यामुळे त्यांना महिला बचत गटाचे महत्त्व समजले. आईचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्या या महिला गटाच्या सदस्य झाल्या. तहेसीन यांच्या आई तस्लिम बेगम या महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत नयी रोशनी लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत शिफा महिला स्वयंसाह्यता गट चालवतात. या महिला बचत गटामध्ये दहा महिला सदस्या आहेत. या सदस्या प्रतिमहिना १०० रुपये जमा करतात. सेंट्रल बँकेत बचत गटाचे खाते आहे. तस्लिम बेगम या घरगुती पिठाची गिरणी चालवतात. तहेसीन यांच्याकडे आईकडून उद्यमशीलतेचा वारसा आला आहे.
फॅशनेबल कपड्यांची निर्मिती ः
शेख तहेसीन यांनी शिवणकामामध्ये विविधता आणण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या परभणी येथील स्वयंरोजगार प्रशिक्षण आधुनिक शिवणकाम तसेच नांदेड येथून फॅशन, ड्रेस डिझाइन, पेंटिंग, भरतकाम, कलाकुसरीचे प्रशिक्षण घेतले. शिवणकाम करत असताना त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी शिवण क्लास सुरू केला. प्रशिक्षणार्थी महिलांची संख्या वाढल्यामुळे घरातील जागा अपुरी पडू लागली. घराशेजारील मोठ्या जागेत स्थलांतर करुन त्यांनी शिवणकाम व्यवसायाचा विस्तार केला.
तहेसीन यांच्या तुबा लेडिज गारमेंट एम्पोरियमद्वारे महिला, मुलींसाठी लेगीन्स, टॉप, प्लाझो, लांचा, वन पीस, घागरा चोली तसेच विविध प्रकारचे ब्लाउज मागणीनुसार घाऊक प्रमाणात शिवून दिले जातात. गेल्या काही वर्षांत टॉप आणि लेगीन्स स्पेशालिस्ट म्हणून तहेसीन यांची ओळख तयार झाली आहे. रेडिमेड गारमेंट निर्मिती सुरू केल्यानंतर त्यांना विविध शाळांचे गणवेश शिवून देण्याचे काम मिळाले. कपडे निर्मितीसाठी आवश्यक कापड सुरुवातीला परभणी येथून खरेदी करत असत. त्यानंतर नांदेड, हैदराबाद येथून कापड तसेच शिलाईचे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली. अलीकडच्या काळात इतर बाजारपेठांच्या तुलनेत गुजरात राज्यातील सुरत बाजारपेठेत कापड आणि शिलाई साहित्य योग्य दरात मिळत असल्याने त्यांनी तेथून घाऊक प्रमाणात खरेदी सुरू केली.
चाळीस महिलांना रोजगार ः
महिला बचत गटाकडून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन तहेसीन यांनी शिवणकाम व्यवसायाचा विस्तार केला आहे. सध्या त्यांच्याकडे तीस शिलाई यंत्रे आहेत. दैनंदिन शिवणकाम तसेच इतर कामांसाठी ४० महिला त्यांच्या उद्योगामध्ये कार्यरत आहेत. महिलांना कौशल्य आणि कामानुसार प्रतिदिन २०० रुपये मेहताना दिला जातो. महिन्याच्या उलाढालीतून बँकेच्या कर्जाचा दहा हजार रुपये हप्ता त्या नियमित भरतात.
शेख तहेसीन या महिला, मुलींना शिवणकाम, नक्षीकाम, ब्लाऊज, पंजाबी ड्रेस आदी कपडे शिवण्याचे प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण तीन महिने कालावधीचे असते. या शिवणकाम क्लासमध्ये दीडशेच्या वर महिलांनी प्रशिक्षण घेतले असून घरगुती शिवणकाम व्यवसायाला सुरुवात देखील केली आहे.
ऑनलाइन विक्री व्यवस्थेवर भर ः
शेख तहेसीन यांनी मराठवाड्यातील शहरी तसेच ग्रामीण बाजारपेठांचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी तयार कपड्यांच्या विक्रीसाठी शहरातील दुकानदार, फिरत्या विक्रेत्यांशी संपर्क साधला. गेल्या काही वर्षांत परभणी शहराच्या बरोबरीने जिंतूर, पाथरी, औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील दुकानदारांना तयार कपड्यांचा त्या पुरवठा करतात. याचबरोबरीने त्या ऑनलाइन प्लॅटफार्मवर तयार ड्रेसची विक्रीदेखील करतात. तुबा फॅशन डिझाइनर नावाने त्यांचे स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक आदी शहरांतील ग्राहकांकडून त्यांनी शिवलेल्या विविध कपड्यांना मागणी वाढली आहे. दरमहा शिवणकाम तसेच प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शेख तहेसीन यांची पन्नास हजारांची उलाढाल होते. याबरोबरीने अनेक महिलांनी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा कपडे निर्मिती व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्याकडे पावले टाकली आहेत.
कुटुंबाची मिळाली साथ...
तयार कपड्यांची विक्री व्यवस्था वाढविण्यासाठी शेख तहेसीन या विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होतात. या ठिकाणी चांगली विक्री होते, नवीन ग्राहक जोडले जातात. शेख तहेसीन यांची दोन मुले आणि एक मुलगी शिक्षण घेत आहे. व्यवसाय वाढीसाठी पती शेख मुन्वर, आई तस्लिम बानो यांची प्रेरणा तसेच शेख साबेर यांचे चांगले सहकार्य मिळते. प्रदर्शन आणि विक्रीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजार्डे, नयी रोशनी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा शाहिन बेगम, व्यवस्थापक जयश्री टेहरे, सहयोगीनी मीरा कऱ्हाळे, कविता देवस्थळे, सत्यशीला उघडे, वेणू बलखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. येत्या काळात तयार कपडे निर्मिती व्यवसायाचे आधुनिकीकरण तसेच गटाच्या माध्यमातून मसाला निर्मिती उद्योगाचे त्यांनी नियोजन केले आहे. विविध संस्थांतर्फे पुरस्कार देऊन शेख तहेसीन तसेच त्यांच्या महिला गटाचा गौरव करण्यात आला आहे.
संपर्क ः
- शेख तहेसीन ः ९८३४६८३६३५
- जयश्री टेहरे ः ८६६८२८७३८७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.