अपंगत्वावर मात करीत यशस्वी शेळी-मेंढीपालन

खुपिरे (जि. कोल्हापूर) येथील बंडोपंत हराळे यांना पोलिओमुळे अपंगत्व आले. त्यावर जिद्दीने मात करीत नोकरी सांभाळून त्यांनी कुटुंबाच्या मदतीने शेळी-मेंढीपालन व्यवसाय जिद्दीने फुलविला आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

कोल्हापूर शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर खुपिरे (ता. करवीर) गाव आहे. गावातील बंडोपंत बाळू हराळे यांची केवळ अर्धा एकर शेती आहे. त्यांच्या वडिलांचा पारंपरिक शेळी- मेंढीपालनाचा व्यवसाय होता. यांच्याकडे दोनशेपर्यंत पशुधन होतं. दिवसभर त्यांना चरण्यासाठी न्यावे लागे. कालांतराने तब्येतीमुळे हा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. पुढे बंडोपंत यांनी तो सुरू ठेवण्याचे ठरविले. ते कोल्हापूर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात नोकरी करतात. त्यांना लहानपणीच अपंगत्व आले आहे. या सर्व मर्यादा असूनही जिद्दीने व्यवसायात पाऊल पुढे टाकले.

अपंगत्वावर केली मात

अपंगत्वामुळे शारीरिक हालचाली करण्यावर अनेक मर्यादा होत्या. पण याच मर्यादा इच्छाशक्तीला बळ देऊन गेल्या. पारंपरिक व्यवसायात दख्खन जातीच्या मेंढ्या होत्या. त्यात बदल करायचा ठरवले. बंडोपंत सांगतात, की सुरुवातीला भांडवल कमी होते. त्यामुळे शेड उभारणीवर पैसे खर्च न करता जातिवंत जाती घेण्यावरच अधिक भर दिला. फलटण येथे पाच दिवसांचे शेळीपालन प्रशिक्षण घेतले. तेथूनच नारी सुवर्णा जातीची मेंढी आणली. शेळीमध्ये आफ्रिकन बोअर जातीची निवड केली.

नारी सुवर्णाचे महत्त्व

नारी सुवर्णा ही मेंढी सुमारे १५ महिन्यांच्या काळात दोन वेळा विते. एका वितात जुळे देते. अशा रीतीने १५ महिन्यांमध्ये चार पिले मिळतात. अन्य मेंढ्यांमध्ये हे प्रमाण कमी असते. सुरुवातीच्या टप्प्यात चार मेंढ्या व चार शेळ्या होत्या. कृत्रिम रेतन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढत गेली. आजमितीला प्रत्येकी १५ शेळ्या व मेंढ्या असून, पिले धरून एकूण संख्या ३५ ते ४० पर्यंत आहे.

विना मजूर होतात सर्व कामे

बंडोपंत यांचा दिवस सकाळी सहा वाजताच सुरू होतो. खाली बसून काम करणे त्यांना कष्टाचे होत असले तरी आता बहुतांश कामांची सवय झाली आहे. व्यवसायातील आनंद शोधल्याने कष्टांची परिणामकारकता कमी झाली आहे. आई आनंदी व पत्नी योगिता यांची त्यांना समर्थ साथ मिळाली आहे. एकाही मजुराची मदत न घेता तिघे मिळून विविध कामे चुटकीसारखी पार पाडतात. सकाळी दहाच्या दरम्यान नोकरीला जाण्याचेही वेध लागतात. मात्र ही दुहेरी कसरत बंडोपंत लीलया पार पाडतात.

व्यवस्थापनातील बाबी

शेती फारशी नसल्याने जवळपास सर्व चारा बाहेरूनच आणावा लागतो. तूर व हरभरा यांची ट्रकद्वारे खरेदी केली जाते. सिमेंट काँक्रीटच्या गव्हाणी तयार केल्या आहेत. शेळ्यांना बसण्यासाठी आधुनिक पद्धतीचे प्लॅस्टिकचे पाट तयार केले आहेत. त्यांना चाके असल्याने स्वच्छता करताना ते कुठेही हलवणे सोपे होते. बंदिस्त पद्धतीत गाभण जनावरे, पिले असे कंपार्टमेंट्‌स आहेत त्यामुळे प्रत्येक जनावराची स्वतंत्र देखभाल करता येते. खिडक्यांना सरकत्या काचा आहेत. पाऊस आल्यास त्यापासून संरक्षण करता येते.

अर्थकारण

व्यावसायिक उत्पन्नास साधारण २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र पहिली तीन वर्षे अत्यंत संयमाची राहिली. नफा मिळवण्यापेक्षा शेळ्या-मेंढ्यांची चांगली वाढ होण्याकडे लक्ष दिले.आज मेंढी नराची विक्री प्रति किलो ३५० रुपये दराने (कटिंगसाठी) तर मादीची विक्री पैदाशीसाठी ५०० रुपये दराने केली जाते. शेळ्यांमध्ये नराची विक्री कटिंगसाठी किलोला ४०० रुपये, तर पैदाशीसाठी ८०० ते एक हजार रुपये दराने होते. गेल्या दीड वर्षात सुमारे ३० जनावरांची विक्री करण्यात व एकूण विक्रीतून सुमारे ६० ते ६५ टक्क्यापर्यंत नफा मिळवण्यात कुटुंबाला यश आले आहे. या शिवाय उपलब्ध होणारे लेंडीखत तीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विकण्यात येते.

‘सोशल मीडिया’द्वारे विपणन

बंडोपंतांनी फेसबुक व व्हॉट्‌सॲपद्वारे अधिकाधिक ग्राहक मिळवले आहेत. शिवाय आधीच्या ग्राहकांकडून झालेली ‘माऊथ पब्लिसिटी’देखील फायद्याची ठरली. मुंबई, पुणे, नाशिक याचबरोबर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानापर्यंत विक्री करण्यापर्यंत मजल मारली आहे. परराज्यांत जनावरे रेल्वेद्वारे पाठवण्यात येतात. तेथील व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतात.

प्रयत्नांची दखल

बंडोपंत यांना यंदा ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने पद्मश्री श्री. बी. व्ही. निमकर उत्कृष्ट मेष पालक पुरस्काराने पुणे येथे गौरवण्यात आले आहे. ही त्यांच्या प्रयत्नांची घेतलेली दखलच म्हणावी लागेल. बंडोपंत यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. त्यांनी ‘सॉफ्टवेअर’ विषयातील एक अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. योगिता यांचे शिक्षणही ‘कॉन्व्हेंट’मधून झाले असून, त्याही पदवीधर आहेत.

कोणतीही लाज न बाळगता काम करीत व्यवसायात प्रगती करणे त्यांनी शक्य केले आहे. वडिलांचा गाढा अनुभव असल्याने त्यांच्याकडूनही सूक्ष्म बारकावे शिकता आले. शेळ्या- मेंढ्यांसोबत लहानपणापासूनच नाते निर्माण झाल्याने आम्ही व्यवसायात पूर्णपणे रमून गेलो असल्याचे दांपत्याचे सांगणे आहे.

संपर्कः बंडोपंत हराळे, ९७६५१९६०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com