
Seed Purchase : निविष्ठा खरेदीत फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला तरच भरपाई मिळते हे शेतकरी सुकाणू समितीने हाताळलेल्या एका प्रकरणानंतर सिद्ध झाले आहे. सोलापूरच्या पंढरपूर भागातील मुंडेवाडीत आठ एकर शेती सांभाळणाऱ्या रोहन गोपाळ घाडगे या कृषी पदवीधर युवक शेतकऱ्याची बियाणे खरेदीत फसवणूक झाली होती.
१७ गुंठ्यावर हिरवी मिरची लावण्यासाठी त्याने एका बियाणे कंपनीकडून ३२०० रोपे खरेदी केली. ही रोपे बोकड्या रोगाला प्रतिकारक असल्याचे सांगत कंपनीने रोहनकडून विक्रीपोटी ३२०० रुपये घेतले. परंतु, रोगग्रस्त रोपे दिल्यामुळे सर्व पीक वाया गेले.
शेतकरी सुकाणू समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० हजार रुपयाचे पीक वाया गेल्यामुळे हतबल झालेला रोहन आधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाद मागण्यासाठी गेला होता. कंपनीशीदेखील त्याने संपर्क साधला.
मात्र, कोणीही त्याला दाद दिली नाही. तरीही रोहन हताश झाला नाही. बियाण्यासाठी घामाचा पैसा दिल्याने अन्याय सहन करायचा नाही व कोणत्याही स्थितीत नुकसानभरपाई मिळवायची, असा निर्धार केला.
रोहनने अखेर शेतकरी सुकाणू समितीशी संपर्क साधून कायदेशीर मार्गदर्शन मागितले. समितीने त्याला या प्रकरणी नियमानुसार तक्रार देण्याची तसेच कृषी खात्याकडून पंचनामा करुन मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला.
सुकाणू समिती व रोहन यांनी संयुक्तपणे पाठपुरावा केल्यामुळे कृषी खात्याला अखेर पंचनामा करावा लागला. पंचनाम्यात मिरची पिकात बोकड्या रोगाने ७० टक्के नुकसान केल्याचे म्हटले होते. त्यामुळे रोहनची तक्रार योग्य ठरली.
मात्र, कंपनी प्रतिसाद देत नव्हती. नुकसानभरपाई न दिल्यास मी उपोषण करणार आहे व माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास कंपनी जबाबदार राहील, असा इशारा संतप्त रोहनने दिला. त्यामुळे कंपनीने धावपळ सुरू केली. रोहनला या प्रकरणी कंपनीने अखेर नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये व अर्धा किलो भाजीपाला बियाणेदेखील दिले.
समितीचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत करे म्हणाले की, निविष्ठा क्षेत्रात शेतकऱ्यांची लूट होत असते. कृषी खातेही अनेकदा बोटचेपे भूमिका घेत असते. बलदंड कंपन्या व अधिकारी यांच्याशी शेतकरी जास्त लढू शकत नाही.
कारण, कंपन्यांसमोर गरीब शेतकरी नेहमी दुबळा ठरतो. त्यामुळे अनेकदा तक्रारी दाबल्या जातात. या प्रकरणात मात्र रोहन घाडगे हा शेतकरी ठाम राहिला होता. त्यामुळेच त्याला न्याय मिळाला आहे.
अन्यायाला वाचा फोडल्याने मिळाली भरपाई
रोहन म्हणाला की, अन्यायाच्या विरोधात मी पाठपुरावा केल्यामुळे नुकसानभरपाई मिळवू शकलो. गावातील अजून तीन शेतकऱ्यांचे माझ्यासारखेच नुकसान झाले होते. परंतु, अन्याय सहन करीत ते गप्प बसले.
त्यामुळे त्यांना भरपाई मिळाली नाही. राज्यात रोज कुठे तरी निविष्ठांमधून फसवणूक होत असते. शेतकऱ्यांनी अन्याय सहन करण्यापेक्षा कृषी खात्याकडे लेखी तक्रार करावी व त्यासाठी पाठपुरावादेखील करायला हवा.
अन्याय झाल्यास पुराव्यांसह साधा संपर्क
राज्यात निविष्ठा खरेदीत कोणावरही अन्याय झाल्यास शेतकऱ्यांनी पुराव्यांसह शेतकरी सुकाणू समितीशी संपर्क (९९६०७५५०८७) साधावा. आम्ही शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडू व अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ, असे समितीचे अध्यक्ष अॅड. करे यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.