State-Level Crop Competition: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत पाटील, राजोळे, खोत प्रथम

Agriculture Department: कृषी विभागाने २०२३ मधील रब्बी हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूरचे शेतकरी चंद्रसेन पाटील ज्वारीत तर नाशिकचे गोरखनाथ राजोळे गहू उत्पादनात प्रथम आले आहेत.
Crop Competition Result
Crop Competition ResultAgrowon
Published on
Updated on

Pune News: कृषी विभागाने २०२३ मधील रब्बी हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूरचे शेतकरी चंद्रसेन पाटील ज्वारीत तर नाशिकचे गोरखनाथ राजोळे गहू उत्पादनात प्रथम आले आहेत. तसेच, रब्बी हरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या नवनाथ खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्यस्तरीय समितीकडून छाननी

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील निकाल समितीने पीकस्पर्धेतील प्रस्तावांची अंतिम छाननी केली. त्यानंतर विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांनी राज्यस्तरीय विजेत्यांची नावे जाहीर केली. ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस अशा पाच पिकांमधील उत्पादनासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात आला.

राज्यातील सर्व तालुक्यांमधील उत्पादकतेची तुलना करीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्यात जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रमी पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन दिले जात असते. त्यांच्या कष्टाचा गौरव झाल्यास इच्छाशक्ती आणखी वाढते व ते उमेदीने नवतंत्राचा वापर करीत प्रयोगशील शेतीला आणखी पुढे नेतात, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.

Crop Competition Result
Crop Competition : शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे

जिल्हा, तालुक्याचे निकाल लवकरच

स्‍पर्धेक शेतकऱ्यांची उत्पादकता तालुक्यामधील पिकाच्‍या सरासरी उत्पादकतेच्या (त्‍या पिकाची मागील पाच वर्षांची सरासरी उत्‍पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक असावी, अशी मुख्य अट होती. केवळ या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते. राज्यस्तरीय निकालात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या शेतकऱ्यांना वगळून जिल्हास्तरीय पीकस्पर्धेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

जिल्हास्तरीय निकाल समित्या आता त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटाकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करतील, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. तालुक्याचे विजेते निवडण्यासाठी पुन्हा राज्य आणि जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते वगळून तालुकास्तरीय पीकस्पर्धांमधील विजेते निवडले जातील. त्यामुळे संबंधित समित्यांकडून जिल्हा व तालुका स्तरावरील निकाल लवकरच जाहीर होतील, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.

ज्वारी गटात पाटील, पवार, ढगे विजेते

ज्वारी सर्वसाधारण गटात कोल्हापूरच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगीचे शेतकरी चंद्रसेन नारायण पाटील यांनी हेक्टरी ८०.५५ क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळवला. याच तालुक्यातील रांजणीचे शेतकरी विशाल वसंत पवार यांनी ८०.५० क्विंटल उत्पादन घेत दुसरा क्रमांक मिळवला. तिसरा क्रमांक लातूरच्या लोहा भागातील सायाळचे शेतकरी रत्नाकर गंगाधर ढगे (७६.४० क्विंटल) यांनी मिळवला. ज्वारीच्या आदिवासी गटात प्रथम क्रमांक लक्ष्मण सजन पाडवी (३६.१८ क्विंटल, मु.पो.बंधारा, ता.तळोदा, जि. नंदूरबार) यांनी मिळवला. दुसरा क्रमांक शिवाजी मिचरा गावित (३१.५९ क्विंटल, मु. पो. कुकरान, ता. नवापूर, जि. नंदूरबार) तर तिसरा क्रमांक विक्रम बळवंत मावची (३०.६८ क्विंटल, मु. पो. खेकडा, ता. नवापूर, जि. नंदूरबार) यांनी मिळवला.

Crop Competition Result
Rabi Crop Competition : रब्बी पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा

राजोळे, पेखळे, करंजकरांची गव्हात आघाडी

गव्हाच्या सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक मिळवणारे गोरखनाथ पोपटराव राजोळे नाशिकच्या एकलहरे गावातील शेतकरी आहेत. त्यांनी ९६.२८ क्विंटल उत्पादन घेतले आहे. गव्हात दुसरा क्रमांक श्रीमती लिलाबाई मधुकर पेखळे (९३.०१ क्विंटल, मु. पो. माडसांगवी, ता. जि. नाशिक) यांनी तर तिसरा क्रमांक रामदास विठोबा करंजकर (९१.५९ क्विंटल, मु. पो. भगूर, ता. जि. नाशिक) यांनी मिळवला. गव्हाच्या आदिवासी गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे त्र्यंबक सुका बेंडकोळी नाशिकच्या धोंडेगावचे शेतकरी आहेत. त्यांनी ५५.२१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. गहू पिकात दुसरा क्रमांक यमुनाबाई विठ्ठल मोहरे (५०.९९ क्विंटल, मु. पो. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी, तर तिसरा क्रमांक कालू नंदा भुसुम (५०.९१ क्विंटल, मु. पो. कारदा, ता.चिखलदरा, जि. अमरावती) यांनी मिळवला आहे.

हरभरा गटात खोत, केदार यांची बाजी

हरभरा सर्वसाधारण गटात हेक्टरी ५२.५० क्विंटल उत्पादन घेत कोल्हापूरच्या कवठे महांकाळ भागातील लोणारवाडीचे शेतकरी नवनाथ दत्तू खोत यांनी पहिला क्रमांक पटकवला. दुसरा क्रमांक ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील (४९.१० क्विंटल, मु. पो. कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी तर तिसरा क्रमांक प्रशांत जानराव क्षीरसागर (४९ क्विंटल, मु. पो. खारतळेगाव, ता. भातकुली, जि. अमरावती) यांनी मिळवला आहे. हरभऱ्याच्या आदिवासी गटातील पहिला क्रमांक ३२.५२ क्विंटल उत्पादन घेत अरुण कवडजी केदार (शेगाव खुर्द, ता. भद्रावती, जि.चंद्रपूर) यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक सुंतरशहा सोनू जमुनाके (३१.४१ क्विंटल, मु. पो. चकखापरी, ता.पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) यांनी, तर तिसरा क्रमांक रणजित श्रीराम पावरा (३०.९२ क्विंटल, मु. पो. खैरखुटी, ता.शिरपूर, जि.धुळे) यांनी मिळवला आहे.

करडई उत्पादनात पाटील प्रथम

करडई सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे शेतकरी माधव शंकरराव पाटील नांदेडच्या देगलूर भागातील चेनपूरचे आहेत. त्यांनी ३८.५४ क्विंटल उत्पादन घेतले आहे. करडईत दुसरा क्रमांक सुनील नामदेव चिमणपाडे (२९.१४ क्विंटल, मु. पो. कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड) यांनी, तर तिसरा क्रमांक विश्वनाथ भाऊराव माडजे (२९.०८ क्विंटल, मु. पो. येरोळ, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी मिळवला आहे.

जवस उत्पादनात चंद्रपूरकरांची आघाडी

जवस सर्वसाधारण व आदिवासी गटात सर्व बक्षिसे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्याच्या चकखापरी गावातील शेतकऱ्यांनी प्राप्त केली आहेत. सर्वसाधारण गटात हेक्टरी ८.९६ क्विंटल उत्पादन घेत लिलाराम उध्दव पिदुरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक तुळशीराम भिवाजी मोरे (८.५० क्विंटल) यांनी, तर तिसरा क्रमांक यशवंत विश्वनाथ काळे (८.२८ क्विंटल) यांनी मिळवला आहे. जवस आदिवासी गटातील पहिला क्रमांक ८.८७ क्विंटल उत्पादन घेत हरिश्चंद्र आनंदराव कोडापे यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक तुळशीराम गोसाई जुमनाके (८.३८ क्विंटल) यांनी तर तिसरा क्रमांक श्रीमती कुसुमबाई आनंदराव कोडापे (७.६१ क्विंटल) यांनी प्राप्त केला आहे.

राज्यस्तरीय पीकस्पर्धेसह जिल्हा व तालुका पातळीवरील विजेते शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. उत्पादनाची तंत्र त्यांनी इतर शेतकऱ्यांना शिकवल्यास प्रयोगशील शेतीचा विस्तार वेगाने होऊ शकतो.
रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com