Agriculture Spentwash : स्पेंटवॉश : प्रदूषणातून मुक्ती, सुपीकतेची युक्ती

Spentwash Treatment : सध्या कारखान्यातून तयार होणारे स्पेंट वॉश हे प्रदूषणामध्ये भर घालत आहे. त्याची विल्हेवाट आणि त्यातून जमिनीची सुपीकता दोन्ही बाबी साध्य होऊ शकतात.
Spentwash
SpentwashAgrowon

सतीश खाडे

Agriculture Spentwash Treatment : सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख १५ हजार हेक्टर जमीन नापिकीकडे वेगाने जात आहे. हे प्रमाण एकूण लागवडीखाली जमिनीच्या ४२.५% भरते. या नापिकीमागे पाणी उपलब्धता, जमिनीत सूक्ष्मजीवांची कमी संख्या, वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटकांची तीव्र कमतरता अशी अनेक कारणे दिसून येतात.

पृथ्वीवर एक इंच मातीचा थर बनण्यास ४५० वर्षे लागतात. हे लक्षात घेतल्यानंतर दरवर्षी पावसाच्या पाण्यात हेक्टरी ३२ ते १०० टन माती वाहून जाते याची नेमकी भयावहता समजू शकेल. त्यातही पावसाला दोष देण्यापेक्षा आपल्या बेजबाबदारीमुळे हे नुकसान होते. तुकडेकरणामुळे व्यवस्थित बांधबंदिस्ती न करता क्षेत्र जास्तीत जास्त पिकाखाली आणण्याकडे लोकांचा कल असतो.

परिणामी, मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते. त्यातच जमिनीत सेंद्रिय कार्बन व अन्य घटकांच्या अभावामुळे मातीत पाणी मुरण्याची क्षमताही कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे पाणी वाहण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यासोबत माती वाहून जाण्याचे प्रमाणही अधिक राहते. आजही व्यवस्थित बांध बंदिस्ती व तत्सम उपाययोजना न केल्यास पुढील पंचवीस वर्षांत शेतीयोग्य माती संपलेली असेल, असे एक अहवाल सांगतो.

या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम पद्धतीने मुरुमापासून मातीनिर्मिती किंवा नापिक जमिनी सूक्ष्मजीवांच्या साह्याने जिवंत करून सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरणार आहे. त्यातील खडकांची व मुरुमाची झीज रासायनिक पद्धतीने केल्यास माती निर्मितीचा वेग वाढवता येईल. याच माती निर्मितीमध्ये सौम्य स्पेंट वॉश प्रमुख भूमिका बजावू शकते. सौम्य स्पेंट वॉश जमिनीत फवारल्याने त्यात अन्नघटक वाढते. त्याकडे सूक्ष्मजीवांची साठवणूक होऊन माती हळूहळू सुपीकतेकडे जाऊ शकते.

परदेशातील उदाहरणे ...

विविध देशांमध्ये शेतजमिनीमध्ये स्पेंट वॉश नियमित वापरले जाते. ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, ब्राझील, न्यूझीलंड, इंग्लंड अशा देशामध्ये त्याचा वापर खत म्हणून केला जातो. गरजेप्रमाणे त्यात युरिया व काही सूक्ष्मघटकही मिसळून त्याची विक्री केली जाते. ब्राझीलमध्ये उसाचे पाचट व अन्य अवशेषांच्या विघटनासाठी स्पेंट वॉशची फवारणी केली जाते.

परिणामी, त्यातून खत निर्मितीची प्रक्रिया वेगाने घडते. काही ठिकाणी शेण व सौम्य स्पेंट वॉश यांचे एकत्रित कंपोस्ट करून वापरले जाते. मेक्सिकोत स्पेंट वॉश हे सिंचनाच्या पाण्याबरोबरच शेताला दिले जाते. त्यातून पाणी बचत साधते. रुमानियात कुरणामधील गवतामध्ये स्पेंट वॉशमध्ये पाचपट पाणी मिसळून फवारणी केली जाते. त्यामुळे गवत उत्पादनात ५० ते ८० टक्के वाढ होते. सौम्य स्पेंट वॉशमध्ये जिप्सम मिसळून खारवट जमिनी सुधारण्यासाठीही उपयोग केला जातो.

Spentwash
Agriculture Technology : कृषी पर्यटन, शेती-प्रक्रिया उद्योगाचे प्रेरणादायी मॉडेल

भारतातील स्पेंट वॉश वापराची शिफारस

आपल्याकडेही केंद्रीय प्रदूषण मंडळाने स्पेंट वॉशला अतिघातक प्रदूषण यादीत घातले आहे. हे खरे असले तरी त्यातील मिथेन काढून व आम्लतेची तीव्रता कमी केल्यानंतर खत म्हणून वापरण्यासाठीही परवानगी दिलेली आहे.

त्यासाठी बोर्डाने मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे स्पेंट वॉशचा ‘बीओडी’ हा ७००० पेक्षा कमी हवा. त्याचा पीएच सातपेक्षा अधिक असावा. यासोबत त्याचा नमुना घेणे, नमुना तपासणी, त्याचे मूल्य, साठवणूक व वाहतूक कशी करायची, पीकनिहाय त्याचे प्रमाण यासंदर्भात त्यात उत्तम मार्गदर्शन आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाला भारतीय कृषी संशोधन परिषदेने दुजोरा दिला असून, त्याप्रमाणे शिफारशी जाहीर केल्या आहेत.

एकरी पाच हजार लिटर सौम्य स्पेंट वॉश (तो ही बायोमिथेनेटेड) मातीवर फवारणी करावी. जमिनीच्या प्रतवारीनुसार त्याचे प्रमाण (लिटर) ठरवावे. मुरमाड वा मातीचा थर कमी असलेल्या शेतात ही मात्रा कमी करावी.

ही फवारणी उभ्या पिकात वा उभ्या फळबागेत करू नये.

खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी आठ ते दहा दिवस फवारणी करावी.

ही फवारणी दर तीन वर्षांतून एकदाच करावी. (दरवर्षी करू नये.)

स्पेंट वॉशमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यांचा जमिनीत किंवा भूजलात साठा वाढून जमीन व पिके यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ही भीती लक्षात घेऊन स्पेंट वॉश फवारणीपूर्वी जमिनीतील क्षारांच्या तीव्रतेचे मोजमाप करणे अत्यावश्यक आहे.

वाढत्या क्षारांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून ताग किंवा धैंचा या सारख्या हिरवळीच्या खत पिकांचा समावेश आपल्या पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी केल्यास फायदा होतो.

Spentwash
Wastewater Treatment : सांडपाणी प्रक्रियेसाठी रीड बेड पद्धत

शेतकऱ्यांपासून सरकारपर्यंत सर्वांचा फायदा

डिस्टलरी व्यस्थापनांना स्पेंट वॉशचे व्यवस्थापन हे केवळ संकटच नव्हे, तर डोकेदुखी वाटते. काहीजण त्यातून इंधनाच्या निर्मितीचा पर्याय निवडत असले, तरी अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार इंधनाऐवजी खतनिर्मितीच्या पर्यायात सर्वांचाच अधिक आर्थिक फायदा आहे.

केवळ कारखाना कार्यक्षेत्रातीलच नव्हे तर अन्य शेतकऱ्यांनाही हे स्पेंट वॉश योग्य मार्गदर्शनासह पुरवल्यास विल्हेवाटीची समस्याच शिल्लक राहणार नाही. कारखाना परिसर, जलस्रोत प्रदूषणमुक्त राहील. उसाचे उत्पादन आणि साखरेच्या उताऱ्यामध्ये वाढ होईल. इतकेच नव्हे, अन्य पिकांच्या उत्पादनामध्येही वाढ होईल. शेतकऱ्यांच्या खत खर्चात बचत साधेल. सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरीही हे वापरू शकतात.

नापीक, पडीक जमिनी उपजाऊ करण्यास मदत होईल. कारखाने व शेतकऱ्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे स्पेंट वॉशचा पुरवठा, वाहतूक किंवा त्याच्या शेतावर फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा यांच्या उपलब्धतेचा भार घ्यावा लागेल. सरकारला ‘स्पेंट वॉश मुक्त आवार आणि खतयुक्त शिवार’ असे धोरण आखता येईल.

डिस्टलरीत बनणारे इथेनॉल तेल कंपन्यांना दिले जाते. या तेल कंपन्यांच्या सामाजिक दायित्व खर्चातून शेतकऱ्यांवरील थोडाफार भार उचलला तरी शेतामध्ये स्पेंट वॉश वापरण्याचे प्रमाण वाढले. सरकारही त्यांच्या पातळीवर यात मदतीची भूमिका घेऊ शकते. २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगमुळे आयात इंधनामध्ये, रासायनिक खतांच्या आयातीमध्ये बचत होईल.

पर्यायाने परकीय चलनामध्ये मोठी बचत होईल. यात राज्याचे साखर संचालक, राज्य प्रदूषण मंडळ, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन यांनी लक्ष घातल्यास अनेक प्रश्‍नांची सोडवणूक होईल. राज्यात तयार होणाऱ्या हजारो कोटी लिटर स्पेंटवाशने हजारो हेक्टर क्षेत्र सुपीकतेकडे जाईल. नापिक जमीन सुपीक होवू शकतील.

सध्या लागवडीखालील जमिनीही कसदार होतील. सामान्य शेतकऱ्यांपासून सरकारपर्यंत सर्वांचा लाभ होईल. फक्त त्यासाठी कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ व स्थानिक कृषी अधिकारी याबरोबरच कारखान्याच्या पर्यावरण अधिकारी, शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी यांचा सहभाग आणि समन्वय महत्त्वाचा आहे. यातील प्रत्येकाची जबाबदारी व प्रदूषणाचे उत्तरदायित्व ठरविणे हे प्राथमिकतेने ठरवले पाहिजे.

गेल्या वर्षी रिलायन्स कंपनीने साखर कारखान्यांच्या प्रेसमडपासून बायोगॅस (Compressed Bio Gas) बनवण्याच्या मोठ्या व्यावसायिक उपक्रमाची घोषणा केली आहे. या प्रेसमड इतकाच इंधन, खत आणि जैविक पाणी देणाऱ्या स्पेंट वॉश संबंधित व्यवसाय उपक्रमांनाही खूप मोठी संधी व वाव आहे.

यासाठी प्रत्येक डिस्टलरीच्या स्पेंट वॉश प्रक्रिया प्रकल्प अगदी BOT तत्त्वावरही उभारता येईल. सर्व कारखान्यांना पुढील आठ - नऊ वर्षांत ‘झीरो लिक्विड डिस्चार्ज’ या दिशेने जावेच लागणार आहे. त्यांनी थोडा पुढाकार घेतल्यास यातून पर्यावरणासोबत सर्वांचेच भले होण्याची शक्यता आहे.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८, (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com