Balaji Sutar Story : हाकामारीचे अदृश्य पाश..

आपल्या लोकांना काहीही खरं वाटतं, कशावरही त्यांचा विश्वास बसतो आणि कशामुळेही धीर सोडून बसण्याची थोर परंपरा आपल्याकडे अटीतटीने जपली जाते. तीस पस्तीस वर्षांपूर्वीची माझ्या बालपणीची अशीच एक गंमत मला आठवली.
Story
Story Agrowon

लेखक - बालाजी सुतार

‘परवा  गावाकडे होतो. एक दोस्त म्हणाला, "ये आनेवाली बारा तारीखकू रातच होनेवाली नय बोलके सुना.. सच्चीय क्या?"

"किदरकू सुन्या?" अतोनातच अचंबित होत्साता मी भयंकर घाबरून विचारलं.

"वो व्हाट्सप क्या क्या आस्ताय उस्पे भौत फिररी कते बातमी.. लोग घबरे गयेय भौत.." दोस्त म्हणाला.

"व्हाट्सपपे फिररी बोलेतो सच्चीच हुईंगी बातमी.." मी म्हणालो, "वो बातम्या शिद्धे 'नासा'सेच आते रह्यत्या. शंभर टक्केसे सच्च्याच रह्यत्या वो खबरा.."

"आरउस्केमारीमी!" दोस्त म्हणाला, "तो फिर? क्या करनेका बारा तारीखकू.. रातभर दिनच रह्या तो सोनेका कब लोगोन्ने?"

"कायकू सोनेका?" मी म्हणालो, "सोनेका नैच. हौर आग्गेकी आनेवाली बारा तारीखकू अयसाच हुनेवाला है करके म्याशेज तय्यार करनेका का, हौर उस्कू व्हाट्सपपेच फारवड मारते बैठनेका.."

“कायकू?” दोस्त विचारता झाला.

“कायकू बोलेतो 'नासा' के खबरा अयसे फारवड मारनेका कंपलसरीच रह्यता.. कानूनीच हय नं वैसा.. राज्यघटनाकेनुसारीच वैसा फिक्स कियेवाला हय..” मी सांगितलं.

'अशानं असा कायदाच आहे' म्हटल्यावर भाबडा दोस्त चिंतेत पडून घाबरून हसला. त्याला उत्तर म्हणून मीही घाबरून चिंतेत पडून हसलो.

बारा तारखेला रात्रच झाली नाही तर कसं? च्यायला कशाचं काय कसं होईल याची कुणी ग्यारंटी द्यावी या कलयुगात’?

ही गावाकडच्या मित्रासोबत झालेल्या संवादाची पोस्ट लिहिली फेसबुकवर. असा संवाद खरोखरच झाला होता. त्या पोस्टवर अनेक मित्रांनी हसून घेतलं. अनेकांना गंमत वाटली. काहीजणांना हे खरंच आहे असंही वाटून गेलं असेल. काहींनी काही हिंदी दैनिकांतल्या कात्रणांच्या लिंक्स दिल्या. त्या मीही वाचल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की ऑगस्टच्या दहा, अकरा आणि बारा अशा तीन तारखांच्या रात्री उल्का वर्षाव होणार आहे. त्यापैकी बारा तारखेला हा वर्षाव सर्वाधिक असेल, त्यामुळे ब-याच प्रमाणात आकाश उजळून निघेल, पण दिवसाइतका लख्ख उजेड अर्थातच नसेल. त्या कथित वृत्तपत्रांचे मथळे पाहिले तर ते मात्र ‘96 साल में पहली बार बार अगस्त को नही होगी रात’ अशा स्वरूपाचे होते. हे वाचलेले भाबडे लोक काहीसे घाबरून गेले असतील तर त्या नवल काहीच नाही.

आपला देश ही एक विशाल गंमत आहे.

आपल्या लोकांना काहीही खरं वाटतं, कशावरही त्यांचा विश्वास बसतो आणि कशामुळेही धीर सोडून बसण्याची थोर परंपरा आपल्याकडे अटीतटीने जपली जाते. तीस पस्तीस वर्षांपूर्वीची माझ्या बालपणीची अशीच एक गंमत मला आठवली. आकाशात एक बलूनसारखं उपकरण कायम तरळत असलेलं दिसायला लागलं आणि लोकांमध्ये चर्चांना उधाण आलं. हे बलून फक्त आमच्याच गावावरच्या आभाळात दिसायचं असं नाही. ते सगळ्याच गावांवर घिरट्या घालत होतं. आजच्या काळाच्या तुलनेने तेव्हाचे लोक तर अधिकच भाबडे होते.

Story
Rural Social Structure : गावगाड्यात जागा हुडकणाऱ्या माणसांची गोष्ट!

गावावर ‘बांबगोळा’ पडणार असल्याची अफवा वा-याच्या वेगाने पसरू लागली. तेव्हा फेसबुक, व्हाट्सअप सोडाच, साधा टेलीफोनही गावात नसे; तरीही ही अफवा सबंध अवकाशाला व्यापून उरली, हे आता सांगितलं तर हल्लीच्या पिढीला अचंबा वाटेल. गावोगावचे लोक भेदरून गेले. आता बॉम्बगोळा पडणार आपण सगळेजण मरून जाणार अशा भीतीने लोक घाबरून गेले. आता मरण अटळ आहे अशा भावनेने लोकांनी एकाहून एक धमाली करायला सुरुवात केली. आमच्या शेजारचे एकजण होते ते म्हणाले, शेतात विहिरीच्या तळाशी एक आडवी कपार खोडून घेतो आणि त्यात राहायला जातो.

पाणी असलेल्या विहिरीच्या तळाशी आडवी कपार ते कशी खोदणार होते कुणास ठाऊक. (‘त्याकाळी विहिरीत बारा महिने कमीअधिक पाणी असायचं’ याही माहितीचा चालू पिढीला धक्का बसण्याची शक्यता आहे.). काहीजणांनी रोज पंचपक्वान्ने करून खायला सुरुवात केली तर काहीजण जवळचे सगळे पैसे खर्च करून रोज चैनी करत राहिले. एवीतेवी हा बॉम्बगोळा पडून आपण मरूनच जाणार आहोत तर निदान चैन करून तरी मरावं असा अत्यंत ऐहिक विचार करून लोकांनी चैनचमन सुरु केली. नाना प्रकारांनी आपल्या आजवर अपु-या राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घेण्याची लोकांची धडपड होती.

असे बरेच दिवस गेले पण हा लेकाचा बॉम्बगोळा काही केल्या कुठेही पडेना. तो रोज आकाशात दिसायचा मात्र. नंतर या बलून उर्फ बॉम्बगोळ्याबाबत काहीकाही माहिती रेडिओतून येऊ लागली आणि मग लोकांना कळलं की ती ‘स्कायलॅब’ नावाची प्रयोगशाळा आहे आणि तिच्यावरचं नियंत्रण सुटलं आहे किंवा तिचं आयुष्य संपलं आहे आणि आता ती प्रयोगशाळा मनुष्यवस्ती विरहित अशा जागा किंवा समुद्रात कोसळवली जाणार आहे वगैरे. आता हे असं इतकं स्पष्ट झाल्यावरही हा बॉम्बगोळा उर्फ स्कायलॅब आपल्याच गावावर किंवा आपल्याच डोक्यात पडली तर कसं अशा शंकेने बरेच जण आपला मरण्याआधी चैन करून जाण्याचा कार्यक्रम पुढे राबवत राहिलेच. यथावकाश ती स्कायलॅब समुद्रात कुठेशी कोसळवली गेली आणि लोक पुन्हा ‘आपण वाचलो एकदाचे’ अशा भावनेने आनंदोत्सव साजरा करत राहिले.

Story
Wheat Fungus : गव्हावरील बुरशीजन्य रोगावर नवा उपाय सापडणार?

आपल्या लोकांना निमित्तं हवी असतात. आनंदासाठी हवी असतात, तशी घाबरून जाण्यासाठीही.

मागे पंतप्रधान मोदींनी लोकांनी बँकेत ‘जनधन’ खाती उघडून घ्या असं आवाहन केलं तेव्हा आता त्या खात्यात मोदी निवडणुकांत कबूल केलेले पंधरा लाख रुपये भरणार आहेत अशी जोरदार अफवा उठली आणि परवा पीक-विम्याचे अर्ज भरण्यासाठी बँकांच्या आणि इंटरनेट कॅफेंच्या बाहेर लागल्या तशाच आडमाप लांबीरुंदीच्या रांगा बँकांसमोर लागल्याचं मला आठवतं आहे. सकाळी लवकर नंबर लागावा म्हणून अगदी बायाबापड्यांसहित लोक भल्या पहाटेच बँकांसमोर येऊन आपापला नंबर धरून बसत होते. फुकटचे पंधरा लाख कोण सोडणार नं? मोदी ते पैसे अकौंटमध्ये भरणारच आहेत अशा आशेने आपल्या भाबड्या लोकांनी दणादण खाती उघडून घेतली. ती पंधरा लाखांची गाजराची पुंगी नंतर वाजलीही नाही आणि मोडून खाताही आली नाही.

नोटाबंदीनंतर आलेल्या दोन हजाराच्या नोटेत काहीतरी इलेक्ट्रॉनिक चीप बसवलेली आहे आणि तिच्यामुळे नकली नोटा लगेचच ओळखता येतील इथपासून ते नोटा खिशात असलेला माणूस कुठल्या एरियात बागडत आहे यःची माहिती थेट दिल्ली सरकारला कळत राहणार आहे इथपर्यंत काहीही अफवांचा बाजार गरम झालेला होता. त्या सावल्या गोंधळात कुणी बहाद्दराने बनवलेले एक स्मार्टफोन अॅपही धमाल करून गेले होते. नोट आडवी धरून त्यावर मोबाईल रोखला की मोबाईलच्या स्क्रीनवर मोदींचे भाषण चालू होई. असे भाषण चालू होत असले तरच ती नोट खरी. असं मानण्याचा एक काळही तेव्हा येऊन गेला होता.

आपल्या लोकांना अफवांनी आनंदित होण्याची सवय आहे की घाबरण्याची? मला वाटतं आपल्याला मूर्ख बनवून घेण्याची सवय लागली आहे. आणि ही सवय आजची नाहीय.

दुस-या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जर्मनीत जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली, त्यावेळी ते आकाशवाणीच्या बर्लिन स्टेशनवरून भाषणे करत. काश्याच्या भांड्यात समुद्राचं पाणी घालून त्यात स्टेथॉस्कोप बुडवून ऐकलं तर सुभाषबाबूंची ती भाषणं आपल्याला ऐकू येतात अशी अफवा उडून ऐन मुंबईतले उदंड लोक हा काश्याच्या भांड्यात समुद्राचं पाणी आणि त्यात स्टेथॉस्कोप हा प्रयोग करून पाहत होते, असं मी एका पुस्तकात वाचलं आहे.

आमच्या लहानपणी एक ‘हाकामारी’ नावाचा प्रकार होता. रात्री घराचं दार ठोठावून हाका मारणारं एक भूत. त्या हाकांना ओ दिली ते भूत ओ देणा-याला ‘घेऊन’ जातं अशा अफवेने रात्र रात्रभर न झोपणारे लोक होते. गणपतीला दूध पाजणारे लोकही आपल्याच समाजातला एक मोठा भाग बनून राहिलेले आहेत.

रात्रच न होणारा दिवस असो, बॉम्बगोळा असो, पंधरा लाखांची आशा किंवा नोटेतली चीप, सुभाषबाबूंची भाषणं ऐकण्यासाठीचा उपद्व्याप किंवा गणपतीला दूध पाजणं असो; आपला समाज चौफेर ‘हाकामारी’ने ग्रासलेला आहे.

यातून सुटणं अशक्य नसलं तरी अवघड आहेच.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com