ॲग्रोवन वृत्तसेवा
Soybean Chana : अमरावती ः मार्चअखेरचा फिव्हर आटोपून सुरू झालेल्या बाजार समितीत धान्याची चांगलीच आवक नोंदविण्यात आली. सोयबीनचे बाजार उघडल्यानंतर हमीदरापेक्षा सरासरी दीडशे रुपये कमी म्हणजे ४४५० रुपये दर मिळाला. तर हरभऱ्यास सरासरी ५४०० व तुरीस १० हजार ८०० रुपये दर मिळाला. सोयाबीन दरात सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मार्चअखेर व शासकीय सुट्ट्यांमुळे पाच दिवस बाजार समितीमधील व्यवहार व उलाढाल मंदावली होती. शेतकऱ्यांनीही या कालावधीत फारशी आवक न आणल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले नाहीत. बाजार समिती पुन्हा सुरळीत सुरू झाली. शेतकऱ्यांनी अडत्यांशी संपर्क साधत आवक आणली. सकाळी सर्व धान्यांचे लिलाव पुकारण्यात आले. सद्यःस्थितीत ११ हजार ९११ पोत्यांची आवक झाली असून खरिपातील तुरीसह सोयाबीन व रब्बीतील हरभऱ्यास हमीदराच्या तुलनेत चढे दर मिळाले.
यावर्षीच्या हंगामात सोयाबीनला नीचांकी दर मिळाल्याने शेतकरी निराश होता. हमीदरापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकला आहे. गुरुवारी (ता. ४) झालेल्या लिलावातही सरासरी ४४५० रुपये दर मिळाले. ३४०७ पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. हमीदरापेक्षा तब्बल दीडशे रुपये कमी दराने सोयाबीन विकावे लागल्याने आगामी खरिपात या पिकाचा पेरा कमी होण्याची शक्यता आहे.
तुरीने मात्र १० हजारांवर दराची झळाळी कायम ठेवली आहे. मंगळवारी २६६७ पोत्यांची आवक झाली असून लाल तुरीस १०१०० ते १०८०३ रुपये भाव मिळाला. केंद्राने तुरीस ७००० रुपये हमीदर जाहीर केला असून सध्या तुरीला सुगीचे दिवस आहेत. हंगामाच्या प्रारंभापासूनच तुरीला उच्चांकी दर मिळाले आहेत. सरासरी १० हजार रुपयांवरच विक्री झाली असून अजूनही हे दर टिकून आहेत.
सत्तर टक्के हरभऱ्याची विक्री
रब्बी हंगामातील निम्म्याहून अधिक सत्तर टक्के हरभरा बाजारात विक्री झाला आहे. तीस टक्के हरभरा अद्याप यायचा असला तरी त्याला फार चढे दर मिळालेले नाहीत. येथील बाजार समितीत हरभऱ्यास सरासरी ५४५० रुपये दर मिळाले. हे दर हमीभावापेक्षा केवळ ११५ रुपये अधिक आहेत. एकंदरीत बाजारात तूर वगळता सोयाबीन व हरभऱ्यास शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार दर मिळालेले नाहीत. संपूर्ण हंगामात शेतीमालास चढे दर मिळाले नसले तरी शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीऐवजी खुल्या बाजारास पसंती देत विक्री केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.