Akola News : सोयाबीन हंगाम वेग पकडत असतानाच हा पाऊस यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो. तर दुसरीकडे सोयाबीन सोंगणीचा दर कुठे तीन हजार, कुठे साडेतीन हजार, तर काही भागांत थेट ३८०० ते ४००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एवढा दर देऊनही स्थानिक मजूर मिळत नसल्याने मध्य प्रदेशातून मजुरांची मागणी केली जात आहे.
जूनच्या सुरुवातीला लागवड झालेले बहुतांश सोयाबीन काढणीला आले आहे. काही ठिकाणी गेल्या आठवड्यापासून सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली. आता सार्वत्रिक सोंगणी लवकरच सुरू होत असून, मजुरांची जुळवाजुळव शेतकरी करू लागले आहेत. यंदा मजुरीचा दर एकरी दोनशे रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत वाढला आहे. शिवाय सततच्या पावसाने जमीन ओलसर असल्याने हार्वेस्टर वापरावर मर्यादा आल्या. आता मजुरांशिवाय कापणी शक्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मेहकर तालुक्यात सोयाबीन सोंगणीचा दर ३१०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या तालुक्यात बोरी शिवारात ४००० रुपये एकराने सोयाबीन सोंगणी दिल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तर उतारा एकरी पाच क्विंटलपर्यंत होत आहे. मोताळा तालुक्यातील वरूड येथील शिवानंद नारखेडे हे शेतकरी म्हणाले, की आम्ही २२ एकर सोयाबीन ३१०० रुपये एकर दराने सोंगणीला दिले आहेत.
योगेश लंबे म्हणाले, की ४००० रुपये एकर दराने सोयाबीन द्यायला परवडत नाही. प्रत्येक वर्षी सोयाबीन सोंगणीचा दर वाढत आहे. यावर लवकरच यांत्रिकीकरणाची गरज आहे. अन्यथा शेतकरी कोलमडून पडेल. देऊळगाव माळी येथील डॉ. गजानन गिऱ्हे म्हणाले, की सोंगणीचा दर ३२०० ते ३५०० रुपये आहे.
सोंगणी दरवाढ, बाजारात दर कमी
सोयाबीनला बाजारात ३८०० पासून ४६०० पर्यंत दर मिळतो आहे. नवीन सोयाबीन बहुतांश प्रमाणात चार हजारांच्याच आत विकत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकरी उत्पादन चार ते पाच क्विंटलपासून सुरू होत आहेत. बाजारभावाने सोंगणीसाठी किमान एक क्विंटल सोयाबीन जात आहे. पाच क्विंटल उत्पादनापैकी एक क्विंटल मालाचे पैसे सोंगणीवरच खर्च करावे लागत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.