
माणिक रासवे
BBF Sowing Technology : ब्रम्हपुरी (ता. जि. परभणी) येथील रामराव आळसे यांनी सुधारित लावण तंत्रज्ञान- व्यवस्थापन, यांत्रिकीकरण यावर भर देत सोयाबीनची एकरी उत्पादकता १३ ते १६ क्विंटलपर्यंत पोचवली आहे. पेरू बागेतही दोन छाटण्यंच्या काळात सोयाबीन व हरभरा आंतरपिके तंत्राचा वापर करीत पेरूतील नफा वाढविला आहे.
अलीकडील काळात पावसाचे असमान वितरण, खंड, अतिवृष्टी, पावसाचा खंड आदींमुळे उत्पादनाची शाश्वती राहिलेली नाही. यातील काही उपायांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे (परभणी) ‘बीबीएफ’ तंत्राचा प्रसार केला जात आहे. अनेक शेतकरी सुधारित लागवड तंत्रज्ञान पध्दतीचा वापर करून पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रामराव आळसे हे त्यापैकी एक आहेत.
आळसे यांची शेती
परभणीपासून ३० किलोमीटरवरील ब्रम्हपुरी गावचे गोदावरी नदीच्या पुरामुळे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी झाले. येथील रामराव आळसे यांची गावापासून दोन किलोमीटरवर खोल काळी माती असलेली सुपीक १६ एकर जमीन आहे. सिंचन व्यवस्था सक्षम असल्याने पूर्वी त्यांच्याकडे १० ते १२ एकर ऊस असे. परंतु वाहतूक अडचणी, पाणी या बाबींचा विचार करता खरिपात सोयाबीन व रब्बीत हरभरा ही पीक पद्धती त्यांनी स्वीकारली. विविध प्रयोग करून प्रतिकूलतेत पीक वाचवणे, ते यशस्वी करणे व उत्पादकता वाढवणे यात ते यशस्वी झाले आहेत. दरवर्षी १० ते १२ एकरांत सोयाबीन असते. रामराव स्वतः शेती राहातात. परभणी येथे महापारेषण कंपनीत कंत्राटी कर्मचारी असलेला मुलगा नृसिंह शनिवार, रविवार व अन्य वेळी शेतीत मोठी मदत करतो.
केले यांत्रिकीकरण
शेतीकांमासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी आळसे यांच्याकडे दोन बैलजोडी होत्या.
पण कामांना गती नव्हती. सन २००७ मध्ये ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला. त्यानंतर यांत्रिकीकरणावर भर दिला. आजमितीला ट्रॅक्टर चलित नांगर, वखर, मोगडा, तिर्ही, रोटाव्हेटर, पेरणी तसेच सरी यंत्र, जमीन सपाटीकरण यंत्र, ट्रॉली, मनुष्यचलित बियाणे टोकण यंत्र, ‘एचटीपी’ पंप
आदी सामग्री आहे. त्यातून मजुरांवरील अवलंबित्व व त्यावरील वर्षाकाठीचा दीड ते दोन लाख रुपये खर्च कमी केला आहे. कामे वेगाने होत आहेत. शिवाय बैलजोडी आहेच.
तंत्रज्ञान वापर, व्यवस्थापन
पूर्वी ट्रॅक्टरचलित यंत्राव्दारे दोन ओळींत १८ इंच ठेवून सोयाबीनची लावणी व्हायची. बियाणे वापर एकरी ३० किलो होता. पुढे ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र पद्धतीने पेरणी केली. बियाणे वापर एकरी २२ किलोपर्यंत आला. या पध्दतीचे फायदे मिळून उत्पादन एकरी १० क्विंटलपर्यंत मिळू लागले. मागील दोन वर्षापासून मानवचलित टोकण यंत्राचा वापर खरिपात सोयाबीन व रब्बीत हरभऱ्यात सुरू केला. दोन बेडमधील अंतर अडीच फूट, उंची सुमारे एक फूट तर रुंदी १८ इंच असते. दोन बियाणे वा झाडांमध्ये
६.५ इंच अंतर असते. या पद्धतीने एकरी बियाण्याचे प्रमाण १३ किलोपर्यंत आले आहे. त्यातून बियाणे वापर व खर्चात मोठी बचत झाली आहे.
गादीवाफा पध्दतीचे झालेले फायदे
-जमीन खोल काळी असल्यामुळे जलधारण क्षमता अधिक. त्यामुळे गादीवाफ्यावरील पीक अतिवृष्टीच्या स्थितीत तग धरुन राहते.
-गेल्यावर्षी अनेकदा अतिवृष्टी झाली. अतिरिक्त पाणी सऱ्यांव्दारे वाहून गेले. पाण्याचा निचरा झाल्याने पीक नुकसान झाले नाही.
यंदाची स्थिती
यंदा पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत तरी खूप कमी आहे. त्यामुळे वखराव्दारे दोन ओळीमध्ये २१ इंच अंतर ठेवून खत पेरणी केली. त्यानंतर टोकण यंत्राव्दारे सोयाबीनची लावण केली. एकरी १६ किलोप्रमाणे बियाणे वापर केला. टोकण यंत्राव्दारे दोन मजूर दिवसभरात चार एकरांवर लागवड करतात. टोकण केल्यानंतर पाऊस पडला तर उगवण व्यवस्थित होते. परंतु यंदा पावसाअभावी तुषार संचाव्दारे पाणी द्यावे लागले. त्यामुळे उगवण चांगली झाली.
पीक व्यवस्थापन तंत्र (ठळक बाबी)
-दरवर्षी जैविक घटकांची बीजप्रक्रिया करूनच लावण. पूर्वी जेएस ३३५ या वाणाची निवड असे.
मात्र त्याची उत्पादकता कमी येऊ लागल्याने मध्यम ते दीर्घ कालावधीच्या, रोगप्रतिकारक्षम वाणाची लागवड. यात फुले किमया (९५ दिवस) व फुले संगम (११० दिवस) यांचा समावेश.
-पेरणीच्या वेळी एकरी ५० किलो डीएपी, १० किलो गंधक, सात किलो सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा देण्यात येते.
-आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी.
उत्पादन वाढले
पूर्वी एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत मिळत असलेले उत्पादन आता एकरी १३ ते १६ क्विंटलपर्यंत पोचले आहे. एकरी खर्च किमान १० हजार ते १२ हजार रुपये असतो. मागील वर्षी दोन्ही वाणांचे बिजोत्पादन घेत ५० क्विंटल बियाण्याची प्रति क्विंटल १० हजार रुपये दराने विक्री केली.
पेरू बागेत सोयाबीन, हरभरा
सन २०२० मध्ये ‘पोकरा’ अंतर्गत दोन एकरांत पेरू (सरदार-एल ४९) ची दहा बाय सहा फूट अंतरावर लागवड केली आहे. गेल्या वर्षापासून उत्पादन सुरु झाले आहे. पेरूची मे मध्ये व ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान अशी दोनवेळा छाटणी होते. त्याद्वारे झाडाची उंची मर्यादित होते. त्यामुळे त्यावेळी खरिपात सोयाबीन व रब्बीत हरभरा यांचे आंतरपीक घेणे सोयीचे होते. मागील वर्षी या पद्धतीने सोयाबीनचे एकरी नऊ क्विंटल उत्पादन मिळाल्याचे नृसिंह यांनी सांगितले. दोन्ही पिकांमुळे जमिनीला नत्र पुरवठा होण्याचाही फायदा होतो.
पाण्याची शाश्वती
गोदावरी नदीवरून पाईपलाईनव्दारे शेततळ्यामध्य़े पाणी साठविण्यात येते. खंड काळात तुषार संचाव्दारे संरक्षित पाणी देण्यात येते. त्यातून पाण्याअभावी होणाऱ्या नुकसानीची जोखीम कमी केली आहे. पोकरा अंतर्गत ठिबक, पाइपलाइन, मोटरपंप आदींचा लाभ तर कृषी विभागाच्या योजनेतून अनुदानावर अवजारे घेतली आहेत. रामराव यांचे बंधू डॉ.उद्धवराव आळसे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त विस्तार कृषी विद्यावेत्ता आहेत. त्यांच्यासह कृषी सहाय्यक अतुल चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळते. विविध कृषी प्रदर्शने, प्रशिक्षणाव्दारे नृसिंह नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात.
नृसिंह आळसे- ९९२२६९२८५४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.