Soybean Procurement Delay : सोयाबीन खरेदी अडकली बारदाना दरातील तफावतीत

Agricultural Issue : राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (नाफेड) खरेदी केंद्रांवर गेल्या ४० दिवसांपासून बारादाना तुटवडा आहे.
Gunny Bags
Gunny BagsAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (नाफेड) खरेदी केंद्रांवर गेल्या ४० दिवसांपासून बारादाना तुटवडा आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्युटचे दर वाढल्याने बारदाना दरातही वाढ झाली आहे. परिणामी नव्याने कंत्राट देऊन वाढीव दराने बारदाना खरेदी केल्यानंतरच तो ‘नाफेड’मार्फत पुरवठा करण्यात येणार आहे.

बारदाणा तुटवडा जाणवत असल्याने काही खरेदी केंद्रे बंद आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या केवळ २५ टक्के शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी करण्यात आली. उरलेल्या ७५ टक्के शेतकऱ्यांची आणि ६ जानेवारीपर्यंत नव्याने नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीसाठी किमान २ महिने लागतील, असे काही खरेदी केंद्र चालकांनी सांगितले. त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत किमान दोन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

Gunny Bags
Soybean Procurement : सोयाबीनची खरेदी थांबवू नये

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीत केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादकांना मधाचे बोट दाखवत १५ टक्के ओलावा ग्राह्य धरण्याचे परिपत्रक काढले खरे मात्र, आजवर १५ टक्के ओलावा ग्राह्य धरून क्विंटलभरही खरेदी केली नसल्याचे वास्तवही समोर येत आहे. अद्याप राज्य सरकारने या बाबत अधिकृत निर्देश दिलेले नाहीत. नागपूर अधिवेशनात या बाबत केवळ भाषणबाजीच झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करता आली नाही. सध्या पुरेसे ऊन आणि हवेतील उबदारपणामुळे ओलावा कमी झाला असून १२ टक्क्यांच्या आत ओलावा आल्याचे सांगितले जात आहे.

यंदा राज्यात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे. तर खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने हमीभावाने खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. नोव्हेंबरपासून खरेदी होणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील पणन विभागाने तयारीही केली होती. मात्र, नाफेडने नेहमीप्रमाणे घोळ घालत सोयाबीन खरेदीचा फज्जा उडवला आहे.

Gunny Bags
Soybean MSP Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदी केवळ २६ टक्के

सध्या राज्यातील सोयाबीन खरेदी बंद असून नाफेडकडे मागणी केलेला बारदाना अद्याप आलेला नाही. मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी नाफेडकडे २० लाख बारदान्याची मागणी केली होती. त्यापैकी केवळ १७ लाख बारदाना पुरविण्यात आला. हा बारदाना पूर्णपणे संपला आहे. गेल्या ४० दिवसांपासून नाफेडकडे तगादा लावूनही केंद्र सरकारने या मागणीकडे फारशा गांभीर्याने पाहिलेले नाही. राज्याला पुरवठा करण्यात येणारा बारदाना हा ज्युटपासून बनविण्यात येत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात ज्युटच्या किमतीत वाढ झाल्याने बारदाना दरातही वाढ झाली आहे. परिणामी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरचा बारदाना खरेदी केला जाईल. त्यानंतर खरेदी केंद्रांना बारदाना पुरवठा होईल. तोवर सोयाबीन खरेदी पूर्णपणे बंद राहणार आहे.

बारदानाचा तिढा

बारदान्याचा तुटवडा जाणवण्यामागे दरावरून निर्माण झालेला तिढा कारणीभूत आहे. खरेदी संस्थांना नाफेडकडून बारदानासाठी पैसे मिळतात. हा बारदाना नाफेड किंवा पुरवठादार पुरवतात. नाफेड एका बारदानाला जवळपास ५४ रुपये देते. पण जूट कमिशनने बारदानाचे भाव जवळपास ७२ रुपये केल्याची माहिती आहे. म्हणजेच नाफेड देत असलेले पैसे आणि प्रत्यक्ष भाव यात १८ रुपयांचा फरक आहे. मग हा १८ रुपयांचा भार कुणी उचलायचा? हा खरा प्रश्न आहे. खरेदी संस्थांनी नाफेडकडे वाढलेल्या दराप्रमाणे बारदान्याचे पैसे मिळावे, अशी मागणी केली. पण त्यावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.

खरेदी केंद्रचालकांची कोंडी

हमीभावाने खरेदीतील अनागोंदीत केंद्र चालकांची कोंडी होत असल्याचे दिसत आहे. बारदाणा नसल्याने खरेदी करता येत नाही, खरेदीचा मॅसेज गेल्याने शेतकरी माल आणतात. पण प्रत्यक्षात खरेदी बंद असल्याने वाद होत आहेत. खरेदी बंद असल्याने हमालही परत जाण्याच्या मनस्थितीत असल्याने केंद्र चालकांना एकतर त्यांना खर्च द्यावा लागत आहे किंवा पगार द्यावा लागत आहे. नोंदणी करून दोन महीने झाले तरी खरेदीसाठी नंबर आला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत असल्याचे काही केंद्र चालकांनी सांगितले.

राज्याला बारदाना पुरवठा व्हावा यासाठी आम्ही सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. गुजरात आणि राजस्थानवरून चार ट्रक बारदाना महाराष्ट्रात वळविला आहे. बारदाना तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आप्पासाहेब धुळाज, प्रभारी एमडी, पणन महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com