Latest Agriculture News : तालुक्यात पावसाअभावी करपलेले सोयाबीनवरील संकटाची मालिका सुरूच असून शेवटी ‘येलो मोझॅक’च्या प्रादुर्भावाने काही ठिकाणी सोयाबीन वाळू लागल्याचे चित्र असून, उत्पादन घटणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
या तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन हे मुख्य पिक बनले आहे. खरिपात एकूण २९ हजार १३५ हेक्टरपैकी सर्वाधिक म्हणजे २२ हजार १३२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अाहे. नगदी पैशाचे पीक म्हणून सोयाबीन व कपाशीकडे शेतकरी वळला आहे. या पिकावर सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू आहे.
उगवण झालेल्या सोयाबीन पिकाची हरणांनी नासाडी केली. रात्रंदिवस जागता पहारा देत शेतकऱ्यांनी सोयाबीन वाचवले. सुरुवातीला पेरणीनंतर मुळालाच पाणी लागल्याने पिकाची वाढ खुंटली, त्यानंतर महिना सव्वा महिना पावसाअभावी ते करपले. त्यात तणनाशक फवारणीनंतर पूर्ण तण नष्ट न झाल्याने पुन्हा मजुरीवर मोठा खर्च करत खुरपणी करावी लागली. त्यात महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
त्यात शेवटच्या टप्प्यात ‘येलो मोझॅक’ने गाठले. लातूरच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात सोयाबीनची पाहणी करून आता येलो मोझॅक वर फवारणी करून उपयोग नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सोयाबीन कसेही असले तरी काढणीसाठी मजुरीचे दर वाढले असून ट्रॅक्टरच्या मळणीयंत्राचा खर्च वेगळा करावा लागतो. अशा अवस्थेत शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे.
सद्यःस्थितीत सोयाबीन पीकस्थिती पाहून २५ टक्के पीकविमा शेतकऱ्यांना कधी मिळेल याची प्रतिक्षा आहे. येणाऱ्या पिकांचे नुकसान व त्यातून पीकविमाही न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.