Parbhani News : यंदाच्या हंगामातील सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रतिहेक्टरी ७९ हजार ५४८ रुपये, तर प्रतिक्विंटल ४ हजार ९७२ रुपये आला आहे. हेक्टरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले. तर सध्याच्या बाजारभावानुसार हेक्टरी ८ हजार १५० रुपये, तर हमीभाव (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) नुसार १ हजार २७८ रुपये नुकसान झाले आहे, असे रावराजूर (ता. पालम, जि. परभणी) येथील शेतकरी तथा शेती प्रश्नांचे अभ्यासक हेमंचद्र शिंदे यांनी ए२ अधिक एफएल या सूत्रांनुसार काढलेल्या स्वतःच्या शेतातील यंदाच्या सोयाबीनच्या उत्पादन खर्चावरून स्पष्ट केले आहे.
परभणी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पीक आतबट्ट्याचे ठरत आहे. त्यामुळे येत्या (२०२५-२६) हंगामातील सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (हमीभाव) निश्चित करताना महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील सोयाबीनच्या उत्पादन खर्चाच्या सत्यतेची पडताळणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्राद्वारे केली आहे.
ए२ (A२) खर्चामध्ये बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, सिंचन, मजुरी, बैलजोडी पोषण खर्च, यांत्रिक मशागत, वाहतूक खर्च याशिवाय अवजारांची देखभाल दुरुस्ती व घसारा, शेतसारा, एकूण गुंतवणुकीवरील व्याज आदीचा समावेश होतो. एफएल (FL-Family labour) खर्चामध्ये शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या श्रमाचा समावेश होतो. शिंदे यांनी यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यात ९ हेक्टरवर सोयाबीनच्या एमएयूएस- ६१२ वाणांची पेरणी केली होती.
यंदा रावराजूर मंडलात सरासरीहून अधिक पाऊस झाला. पीक वाढी काळात पाने खाणारी अळी त्यानंतर शेंग करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. मागील आठवड्यात त्यांनी सोयाबीनची काढणी मळणी केली. शिंदे यांना सरासरी हेक्टरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले. सध्या परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये दरम्यान आहेत. खेडा खरेदीचे दर त्याहून कमी आहेत.
शिंदे यांनी प्रतिक्विंटल ४४०० रुपये दर गृहीत उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद मांडला असता त्यांचे हेक्टरी ८ हजार १५० रुपये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) विक्री केली, तरी त्यांना हेक्टरी १ हजार २७८ रुपये नुकसान सोसावे लागणार आहे. यंदा यलो मोझॅक, कीड, रोगाचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट आली आहे. अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी ६ ते ७ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले. फुलगळ झाल्यामुळे तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.