Soybean Crop Kolhapur : अस्मानी अन् सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे फिरवली पाठ!

Soybean Crop : लहरी हवामान, राज्य कर्त्यांचे सोयाबीन पिकाबाबत आडमुठे धोरण आणि पिकांवर पडणाऱ्या किडीमुळे सोयाबीन पीकपेरा घटला आहे.
Soybean Crop Kolhapur
Soybean Crop Kolhapuragrowon

Kolhapur Soybean Farming : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका ऊसपट्ट्यासह भाजीपाल्याचे मूख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. तसेच खरिपाच्या हंगामात आडसाली उसाबरोबर सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु मागच्या काही वर्षात लहरी हवामान, राज्यकर्त्यांचे सोयाबीन पिकाबाबत आडमुठे धोरण आणि पिकांवर पडणाऱ्या किडीमुळे सोयाबीन पीकपेरा मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे.

शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना नद्यांनी वेढा घातल्याने शेती पाण्याखाली जाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी भुईमुगाच्या पेरणीकडे जास्त वळत आहे. त्यातच लहरी हवामान, सोयाबीन पिकावर पडणारी कीड घटत चाललेले उत्पादन व दराची अनिश्‍चितता यामुळे शेतकरी सोयाबीनकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. जून महिन्याच्या अखेर साडेतीनशे हेक्टर क्षेत्रांत सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर १५०० हेक्टरपर्यंतच पेरणी होण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी टी. ए. जांगळे यांनी माहिती दिली.

शिरोळ तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते यानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे तर मुबलक पाणी व  कष्ट घेणारा शेतकरी यामुळे सोयाबीनचे अमाप पीक शिवारात मोठ्या प्रमाणात घेत. एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याचा येथील शेतकऱ्यांनी विक्रम नोंदवला. मे महिन्यात पेरणी करायची अन् ऑगस्टमध्ये मळणी करायची व लगेचच ऊस लागवड करण्याचा शिरस्ता अनेक वर्षे पाहायला मिळायचा.

चार पैसे तर हातात मिळावेत

सोयाबीनचा अस्थीर भाव तसेच येलो मोझॅकसारखे तसेच तांबेरा यासारख्या रोगांमुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे पीक परवडत नाही. कोणतेही पीक करत असताना शेतकऱ्यांना चार पैसे हातात मिळाले पाहिजे या  उद्देशाने पिकाचे उत्पादन घेतलं जाते परंतु मागच्या १० वर्षात उत्पादन खर्च जास्त अन् पीक कमी येत असल्याने सोयाबीन शेती ऐवजी शेतकरी सध्या भुईमूग शेतीकडे वळत आहे. तसेच मागच्या काही वर्षात दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने शतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही यामुळे सध्या भुईमूग, झेंडू फूल यासारख्या आंतरपिकांना प्राधान्य देत आहे.

सागर शंभुशेटे, प्रगतशील शेतकरी, नांदणी

भुईमूग शेती वाढली

सोयाबीन क्षेत्र कमी होत असताना भुईमूग क्षेत्रात मात्र चांगली वाढ होत आहे. यंदा १५०० ते २००० हेक्टरपर्यंत भुईमूग पीक होईल असे चित्र आहे. भुईमुगास पाणी कमी लागते, शिवाय रोग किडींचाही प्रादुर्भाव कमी असतो. तसेच सोयाबीनच्या तुलनेत दर चांगला मिळतो. जमिनीचा पोतही सुधारतो. त्यामुळे शेतकऱ्‍यांचा कल भुईमुगाकडे वाढला आहे. आंतर पीक म्हणूनही भुईमूग चालतो, त्यामुळे भुईमूग क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.

कुरुंदवाड, जयसिंगपूर ही हक्काची बाजारपेठ. मळणी झाल्यानंतर शिवारातच सोयाबीनचे व्यापारी रोख पैसे देऊन सोयाबीन खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना पावसाळ्यातच पुढील शेतीकामासाठी पैसे मिळायचे. मात्र, २०१९ नंतर तालुक्याला दोन वेळा महापुराला सामोरे जावं लागलं यात तांबेरा रोगाच्‍या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे होत्याचे नव्हते झाले. तरीही शेतकऱ्‍यांनी हिमतीने पीक घेतले.

मात्र, दराची घसरण सुरू झाली. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकापासून दूर जाऊ लागले आहेत. दहा वर्षांपूर्वी असलेला ३५०० ते ४००० या दरात अपवाद वगळता कधीच वाढ मिळाली नाही. तसेच बियाणे, खते, औषधे महागली. याउलट उत्पादनात घट होत गेली यामुळे शेतकरी सोयाबीन पीक लागवडीपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरोळ तालुक्यात खरीप हंगामात बहुतांश सर्वच भागात सोयाबीनचे क्षेत्र हजारो हेक्टरांत दिसायचे. मात्र, यंदा आजअखेर केवळ साडेतीनशे हेक्टरमध्‍ये पेरणी झाली असून, आणखीन हजार ते बाराशे अशी एकूण जेमतेम १५०० हेक्टर क्षेत्रांत पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com