

Rabi Season : यंदा कमी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ६७ हजार ५५८ हेक्टरपैकी ८० हजार ५७७ हेक्टरवर मका पीक घेतले आहे. येत्या काळात जनावरांसाठी काही प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो.
मागील काही वर्षांत दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल झाली आहे. त्यामध्ये दुधाला बऱ्यापैकी मिळणारा बाजारभाव आणि विविध तालुक्यांतील प्रत्येक गावामध्ये विविध डेअरी उद्योगाच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धोत्पादन व्यवसायात मोठी संधी आहे. त्याचा आर्थिक फायदा होत आहे.
मका पिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन दुधाची फॅट ही गुणवत्ता चांगली येते. त्यासोबतच मक्याच्या चाऱ्याचा वापर करून मुरघास मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात सुद्धा ओल्या चाऱ्याची उपलब्धता मुरघासामुळे जनावरांना होते.
त्यामुळे जनावरांच्या दुग्ध उत्पादनात कोणताही बदल होत नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक नफा मिळतो. यंदा नगरमधील श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, अकोले या तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, बारामती, इंदापूर तर सोलापूरमधील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड झाली आहे.
दाण्याच्या उत्पादनासाठी मक्याची लागवड
पुणे परिसरातील अनेक शेतकरी मक्याचे दाणे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या कणसाच्या मक्याची लागवड करतात. त्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात. मक्याची कणसे काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर फक्त कणसे काढून कंपनीला, मार्केटमध्ये विकतात.
त्यातून चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. त्यामुळे मका लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.
पुणे विभागात पीकनिहाय झालेली पेरणी ः हेक्टरमध्ये
जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- लागवड झालेले क्षेत्र--- टक्के
नगर -- १४,११८ -- २५,२५३ -- १७९
पुणे -- १६,९४७ -- १८,३१५ -- १०८
सोलापूर --- ३६,४९३ -- ३७,०१० -- १०१
एकूण -- ६७,५५८ --- ८०,५७७ -- ११९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.